कवी वयाने वाढतो तशी कविता देखील वाढली पाहिजे : अशोक बागवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 03:59 PM2019-06-10T15:59:54+5:302019-06-10T16:03:03+5:30

कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ कवी, गीतकार अशोक बागवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Poetry should also grow as a poet continues to grow: Ashok Bagwe |  कवी वयाने वाढतो तशी कविता देखील वाढली पाहिजे : अशोक बागवे 

 कवी वयाने वाढतो तशी कविता देखील वाढली पाहिजे : अशोक बागवे 

Next
ठळक मुद्दे कवी वयाने वाढतो तशी कविता देखील वाढली पाहिजे : अशोक बागवे एक नवी खळबळ आपल्याला अस्वस्थ करते : डॉ वीणा सानेकर नऊ विजेत्या कवींचा सत्कार

ठाणे : रंग जेव्हा बोलतो तेव्हा चित्र निर्माण होते आणि शब्द जेव्हा अबोल होतो तेव्हा कविता निर्माण होते. कवी वयाने वाढतो तशी कविता देखील वाढली पाहिजे. कविता ही दोन प्रकारचीच असते चांगली आणि वाईट. कवयित्री सुजाता राऊत यांच्या 'उगमाकडे जाताना' या कविता संग्रहाच्या शीर्षकातच अर्थ भरून राहिला आहे. उगम म्हणजे निर्मितीचा उद्गार. उगम आणि निगम या दोन अवस्था आहेत. समुद्रात विसर्जित होणे म्हणजे निगम तर स्वतःमधला 'स्व' जेव्हा विसर्जित होतो तेव्हा खऱ्या अर्थाने उगम होतो. उगम -निगम हे एक सुंदर आवर्तनच आहे, पुनःनिर्मिती आहे. उगमाकडे जाताना या संग्रहाच्या कवयित्री सुजाता राऊत या समाज माध्यमांपासून दूर राहून खऱ्या अर्थाने व्रतस्थपणे लेखन करीत आहेत. ही कवयित्री म्हणजे झाकलेले एक माणिक आहे. सुजाताच्या कवितेत आस्था आहे, तिच्या कवितेत तिने जिद्दीने टाकलेली आश्वासक पाऊलं देखील दिसतात. गीतेश आणि सुजाता यांच्या दोन्ही कविता भिन्न वृत्तीच्या आहेत. समाजाला काही वेगळं सांगणाऱ्या आहेत असे मत ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी मांडले. 

           कवयित्री सुजाता राऊत यांच्या 'उगमाकडे जाताना' या पहिल्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने तसेच कवी गीतेश शिंदे यांच्या 'निमित्तमात्र' या कविता संग्रहाच्या चवथ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ  कवी, गीतकार अशोक बागवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका, संपादिका डॉ वीणा सानेकर याही उपस्थित होत्या. त्यांनी देखील या दोन्ही कवींच्या एकूण लेखन प्रवासावर आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या " सुजाता राऊत यांचा संग्रह वाचल्यावर प्रत्येक टप्प्यात काही जुन्या कवितांचे स्मरण होते त्याचवेळी आयुष्यात वेगवेगळ्या वळणांवर पडझड झाली असली तरीही  ठामपणे उभे राहण्याचा तिचा प्रयत्न हा कौतुकास्पद आहे. कवितांची दबलेली स्पंदने या कवयित्रीला ऐकू येतात. तिच्या कविता वाचताक्षणी मनाचा ठाव घेतात. कवितेत मानवी मनांचे अनेक गुंते, विचित्र नाती, सोडवणूक, संवाद,विसंवाद, वेदना यांच्या संमिश्र अनुभूती वाचकाला गवसतात. 'झाडांची कविता' मनाला स्पर्शून गेली. सुजाता यांच्या कविता अर्थाच्या छटांसकट वेगवेगळ्या अनुभूतींसह काळजाला थेट भिडतात. तर गीतेश शिंदे यांच्या तरुणाईची वेगळ्या भाषेची आजची कविता थक्क करणारी आहे. एक नवी खळबळ आपल्याला अस्वस्थ करते. या दोन्ही कवींची जातकुळी वेगळी आहे. गीतेशने या संग्रहातून 'त्रिमिती' या दमदार काव्यशैलीची ओळख सुंदरपणे करून दिली आहे." 

           याअगोदर प्रकाशक या नात्याने संवेदना प्रकाशन, पुणेचे नितीन हिरवे यांनी गीतेश शिंदेंचे अभिनंदन केले. केवळ पाच वर्षात चौथी आवृत्ती प्रकाशित होताना एक प्रकाशक म्हणून आनंद होत आहे. काही महिन्यांपूर्वी याच सभागृहात सुजाता राऊत यांच्या कवितांचे हस्तलिखित मिळाले. कविता वाचल्यावर संग्रह काढण्याचा लगेच निर्णयही घेतला. 'उगमाकडे जाताना' या संग्रहाचे मुखपृष्ठ साकारणारे आणि या कार्यक्रमाचे अतिथी श्री रामदास खरे यांनी चित्रकलेच्या प्रवासाबद्दल,मुखपृष्ठाच्या निर्मितीबद्दल  विवेचन केले तसेच सुजाता राऊत आणि गीतेश शिंदे यांच्या सुरवातीच्या प्रवासाच्या काही आठवणी जागवल्या. कवयित्री सुजाता राऊत यांनी आपल्या मनोगतात " शाळेच्या पाठपुस्तकात कवयित्री इंदिरा संत यांची 'बाहुली' या कवितेने माझे भावविश्व तरल केले,समृद्ध केले. त्या कवितेत व्यक्त झालेला भावनांचा कल्लोळ अस्वस्थ करून गेला. जुन्या-नव्या कवितांच्या अखंड वाचनाने मी समृद्ध झाली. ज्येष्ठ कवयित्री अरुणाताई ढेरे यांच्या भावस्पर्शी आणि निर्मळ कवितांचा परिचय पुढे कॉलेजजीवनात झाला. त्यांच्या कवितेने एकप्रकारचा समंजस्यपणा दिला. आयुष्यच्या विविध खडतर टप्प्यांवर, मनावर निराशेचे आभाळ दाटल्यावर कवितेनेच मला तारले." कवी गीतेश शिंदे यांनी आपल्या चवथ्या आवृत्तीच्या निमित्ताने या प्रवासात ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. आभार मानले. 

      सहयोग मंदिर मध्ये संपन्न झालेल्या या सुंदर प्रकाशन सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती सुखावणारी होती. डॉ अनंत देशमुख, अरविंद दोडे, सतीश सोळांकूरकर, चांगदेव काळे, पिनाकीन रिसबूड, विकास भावे, चित्रकार कासार ही मंडळी आवर्जून उपस्थित होती. याच सोहळ्यानंतर 'अक्षय रजनी' या कवितालेखन स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. एकूण १८४ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यामधून एकूण नऊ विजेत्या कवींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विजेत्यांची नावे अशी : 1 विजय जोशी डोंबिवली, 2 रजनी निकाळजे मीरा रोड, 3 संकेत म्हात्रे ठाणे, 4 वर्षा गटणे ठाणे, 5 रवींद्र मालुंजकर नाशिक, उत्तेजनार्थ बक्षीस ... 1 मानसी चापेकर रोहा, 2 जुई जोशी मेलबर्न, 3 अलका कुलकर्णी नाशिक, तर विशेष उल्लेखनीय बक्षीस कुमार नंदन कार्ले डोंबिवली याला मिळाले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी गीतेश शिंदे यांनी नाविन्यपूर्ण केले तर उपस्थितांचे आभार तपस्या नेवे यांनी केले. 

Web Title: Poetry should also grow as a poet continues to grow: Ashok Bagwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.