सुर्वेंच्या कवितेद्वारे महिलांनी पंतप्रधानांची मिळवली वाहवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:52 AM2018-10-20T00:52:44+5:302018-10-20T00:52:52+5:30

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केला ई-गृहप्रवेश : आवास योजनेत ठाणे जिल्हा अव्वल; २२ महिलांनी साधला संवाद

PM Praise women through the poem of Survey | सुर्वेंच्या कवितेद्वारे महिलांनी पंतप्रधानांची मिळवली वाहवा

सुर्वेंच्या कवितेद्वारे महिलांनी पंतप्रधानांची मिळवली वाहवा

googlenewsNext

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शिर्डी दौऱ्यात शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील आवास योजनेच्या लाभार्थी २२ महिलांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हीसीडीसी सभागृहात हा ई-गृहप्रवेश कार्यक्रम पंतप्रधानांच्या साक्षीने पार पडला. याप्रसंगी ठाण्यातील महिलांनी नारायण सुर्वे यांची कविता सादर करून पंतप्रधानांची वाहवा मिळवली.


पंतप्रधानांच्या उपस्थितीत राज्यातील २९ जिल्ह्यांमधील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश करणारा कार्यक्रम शिर्डी येथून पार पडला. या वेळी राज्यातील सुमारे दोन लाख ४४ हजार ४४४ घरकुलांमध्ये ‘ई-गृहप्रवेश’ पार पाडत असताना पंतप्रधानांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.


राज्यातील अन्य जिल्ह्यांतील तुलनेत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांमध्ये ठाणे जिल्हा अव्वल आहे. यामुळे ठाणे जिल्ह्याचे कौतुक करून पंतप्रधानांनी या २२ महिला लाभार्थ्यांशी सर्वाधिक वेळ संवाद साधला. ‘रहने के लिए न था मकान पक्का, न था खुद की पहचान का शिक्का, फिर मोदीजी ने दिया कृपाप्रसाद, प्रधानमंत्री ग्राम योजना से मिला आवास!... अशा आशयाची कविता सादर करून ठाणे जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी महिलांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुसंवाद साधून ई-गृहप्रवेश केला.


पारंपरिक वेशभूषेत आलेल्या या महिलांना पंतप्रधानांनी एखादी कविता किंवा गाणे सादर करा, असे मराठीतून सांगितले. त्यावेळी उपस्थित महिलांपैकी हिरा गुरु नाथ वाघ यांनी डोंगरी शेत माझं बेनु गं कसी... आलंय वरीस राबवून मरावं किती... हे कवी नारायण सुर्वे यांचे गीत सादर करून वाहवा मिळवली.


सुरेखा सुनील भगत या महिलेने कविता गाऊन दाखवली. महिलांनी गृहप्रवेशासाठी केलेली घटस्थापना, तुळशी वृंदावन आदींना फुलांनी सजवून मांडलेली गृहप्रवेश पूजा पाहून पंतप्रधान फार खूश झाले. यावेळी सुनीता प्रदीप बराफ या महिलेने पंतप्रधानांशी थेट संवाद साधून घरकुलांचा लाभ मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.


‘आवास योजनेमुळे घरातील वातावरण सुखी, समाधानी झाले असून पक्क्या घरात राहायला मिळाले. मोदीजी तुम्हाला धन्यवाद! अशा शब्दांत पंतप्रधानांचे त्यांनी आभार व्यक्त केले. मोदींनीदेखील टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या घरी मी प्रवेश केल्याचे सांगून गरिबीशी मुकाबला करण्यासाठी मुलांना शिक्षण द्या, असे आवर्जून सांगितले.

वारली कलेचे केले कौतुक
जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागांत बांधण्यात आलेल्या घरकुलांचा व्हिडीओदेखील पंतप्रधानांनी आत्मीयतेने पाहिला. या घरकुलांवर जगप्रसिद्ध ‘वारली’ चित्रांची रंगरंगोटी पाहून पंतप्रधानांनी भावुक होऊन जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधण्यासाठी भरपूर वेळ देऊन समाधान व्यक्त केले. ‘वारली’कलेचा वापर केल्याने घराला आधुनिक रूप आल्याचे सांगून वारलीकलेचे पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी रूपाली सातपुते यांनी सांगितले.


जिल्ह्यात ३७४० घरे : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन हजार ७४० घरकुले बांधण्यात आली. तसेच शबरी, रमाई, आदिम या राज्य पुरस्कृत योजनांतर्गतसुद्धा पक्की घरे बांधण्यात आली आहेत. यंदाचा असणारा ४६२ लक्ष्यांकदेखील पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: PM Praise women through the poem of Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.