Parasik Sandibandar slums will be transformed, Nelladurusti, Pavata, Rangarangoti work started | पारसिक रेतीबंदर झोपडपट्यांचे रुपडे पालटणार, नेलादुरुस्ती, पायवाटा, रंगरंगोटीच्या कामांना सुरवात
पारसिक रेतीबंदर झोपडपट्यांचे रुपडे पालटणार, नेलादुरुस्ती, पायवाटा, रंगरंगोटीच्या कामांना सुरवात

ठळक मुद्देप्रशासन आणि आमदाराचा समन्वयस्वच्छतेची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

ठाणे - मागील कित्येक वर्षे विकासापासुन वंचित राहिलेला पारिसक रेती बंदरच्या डोंगराळ भागात नव्या विकासाला चालना मिळाली आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समन्वयातून हा विकास शक्य झाला असून लोकप्रतिनिधी आणि एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय झाल्यास विकासाचा नवीन पॅटर्न कसा निर्माण होतो याची प्रचिती आता रेतीबंदर येथे आल्यावर होते.
                      पारिसक चौपाटीसारख्या ऐतिहासिक प्रकल्पानंतर ठाणे महानगरपालिका आणि मिसाल मुंबई या संस्थेच्या सहकार्याने रेतीबंदर येथील आठ झोपड्या विविध आकर्षक रंगात न्हावून निघणार आहेत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या या प्रकल्पाची सुरूवात आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि मिसाल मुंबई या संस्थेच्या रूबल नागी यांच्या उपस्थितीत शुक्र वारी विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आव्हाड आणि जयस्वाल या दोघांनीही एकमेकांचे भरभरून कौतुक केले असून हम साथ साथ है असा संदेश दिला आहे. या कामाअंतर्गत परिसरात जवळपास ५३ विद्युत पोल बसविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ स्थानिक आमदार आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नाले दूरूस्ती, रस्ते पायवाटा बनविणे, कल्व्हर्ट बांधणे आणि नाल्यांची साफसफाई करणे आदी कामांना जुना गवळीपाडा येथून सुरूवात करण्यात आली. मिसाल मुंबई या संस्थेच्यावतीने येथील झोपडपट्ट्यांना रंगरंगोटी करण्यास सुरूवात झाली असून आता या सर्व झोपडपट्ट्या कात टाकायला लागल्या आहेत. डोंगरीपाडा, इंदिरानगर या झोपडपट्टीनंतर आता रेतीबंदर येथील आठ झोपड्यांना नवी झळाळी मिळणार आहे. दरम्यान यानिमित्ताने रेतीबंदरच्या जुना गवळीपाड्याच्या झोपडपट्यांमधील नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबीराचे आयोजनही करण्यात आले होते.
रेतीबंदर प्रकल्पाचे देशभरात नाव होईल - जितेंद्र आव्हाड
संजीव जयस्वाल हे पहिले आयुक्त आहेत की ज्यांनी या झोपडपट्टीला भेट देवून तेथील मुलभूत कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. या परिसराला एक नवे रूप प्राप्त होत असून नाशिक रोड वरून जाताना व मुंबईच्या दिशेने प्रवास करताना या परिसराचे सौंदर्य पाहून नक्कीच प्रत्येक प्रवासी सुखावला जाणार आहे. या प्रकल्पाचे देशभरात नक्कीच नाव होईल, कालांतराने या परिसराला संजीव जयस्वाल नगर म्हणावे लागेल असेही ते म्हणाले.


‘’स्वच्छ सर्वेक्षण २०१९’’ सुरु झाले असून ठाणे शहराला ‘स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे’ करण्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेच्याशाळा क्र .४९ मधील विद्यार्थ्यांना केले आहे. 


Web Title: Parasik Sandibandar slums will be transformed, Nelladurusti, Pavata, Rangarangoti work started
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.