चौकटीबाहेरचं शिक्षण - पाया भक्कम असेल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:50 PM2019-06-14T23:50:34+5:302019-06-14T23:51:01+5:30

चंदाराणी कुसेकर पल्या मुलांतून आपल्याला कशाप्रकारची माणसं घडवायची आहेत, यावर या संस्कारांचं स्वरूप ठरवायला हवं आहे. समतेवर नुसता विश्वास ...

Outside the box - If the foundation is strong ... | चौकटीबाहेरचं शिक्षण - पाया भक्कम असेल तर...

चौकटीबाहेरचं शिक्षण - पाया भक्कम असेल तर...

Next

चंदाराणी कुसेकर

पल्या मुलांतून आपल्याला कशाप्रकारची माणसं घडवायची आहेत, यावर या संस्कारांचं स्वरूप ठरवायला हवं आहे. समतेवर नुसता विश्वास ठेवणारे नागरिक आता नको आहेत, तर समतेचं आचरण करणारे लोक हवे आहेत. स्त्री-पुरुष समानता, जाती-धर्म समानता, गरीब-श्रीमंत समानता, दिव्यांग आणि हातीपायी धड यांची समानता प्रत्यक्षात आणणारी माणसं आपल्याला हवी आहेत. लहान मुलांच्या ठिकाणी अनुकरण ही सामान्य प्रवृत्ती प्रबळपणे आढळून येते. अनुकरण या सामान्य प्रवृत्तीचा उपयोग करून मुले अनेक गोष्टी शिकत असतात. अनुकरण हे स्वयंशिक्षणाचे सोपे, सरळ आणि प्रभावी असे साधन आहे. घरामध्ये आईवडील, मोठी भावंडे यांचे तर शाळेमध्ये शिक्षकांच्या हावभावाचे, आवाजाचे आणि कृतींचे अनुकरण ही मुले करत असतात. मुलांच्या या अनुकरणप्रवृत्तीला पूरक असे वातावरण आणि परिस्थिती उपलब्ध करून देणे, ही शाळेबरोबरच पालकांची जबाबदारी ठरते. उदा. मुलं घरात शाळाशाळा खेळत असतील, तर त्यांना घरात छोटासा फळा आणि खडू, डस्टर आणून दिले, तर मुलांच्या अभ्यासाच्या सवयीत बदल घडवून आणता येईल. शाळेत दिलेला घरचा अभ्यास, अंकलेखन, अक्षरलेखन सराव, गणित सोडवण्याची क्रिया, चित्रं काढणे, सुविचार लिहिणं इत्यादी मुलं आनंदानं करतील. अशा प्रकारे मुलांच्या सामान्य प्रवृत्तीला थोडासा वाव दिला असता, त्याचा नक्कीच फायदा होईल व त्यांचे शिकणे आनंदाचे होईल. मुलांमधील कलाविकास हा त्यांच्या बालपणापासूनच म्हणजेच त्यांच्या प्रारंभिक अवस्थेपासूनच सुरू होतो. याला मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ हे दोघेही सहमत आहेत. मुलं जेव्हा बोटाने काही गोल, आडव्या-उभ्या रेषा, टिंबं रेखाटतात, ही त्यांची पहिली कला. बोटात खडू, पेन पकडण्याची ताकद आली की, मूल रेघोट्या काढू लागते. या रेघोट्या अमूर्त, निराकार आणि उद्देशहीन असतात. त्यांना थोडीशी दिशा दिली की, मूल त्यांच्या मनातील भावनांना स्पष्ट आणि स्वयंस्फूर्तपणे आकार देऊ लागते. मूल पाच वर्षांचे होईपर्यंत अशा रेघोट्या मारते. त्याला त्याची हस्तप्रयोगी अवस्था असे म्हणतात.

मुलांच्या कलात्मक विकासाची पुढील पायरी वय वर्ष पाच ते सातच्या दरम्यान येते. तिला पूर्व प्रतीकात्मक अवस्था म्हणतात. वय सहा ते नऊदरम्यान प्रतीकात्मक पायरी, तर ९ ते १२ वयाच्या दरम्यान प्रारंभिक वास्तववादी पायरी येते. या टप्प्यांमधून मुलांच्या कलेचा विकास होत राहतो. त्यांच्या शारीरिक व मानसिकवाढीची परिपक्वता यातून प्रतिबिंबित होत असते.
‘बालान मानय’ या दोन शब्दांत मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची बूज राखा, असे शिक्षणशास्त्राने सांगितले आहे. मुले आपल्यासाठी नाहीत तर, आपण मुलांसाठी आहोत. मुलांना चांगल्या सवयी लावून त्यांचे शरीर समर्थ बनवणे, त्यांची वाणी शुद्ध करणे, त्यांची मने सत्प्रवृत्त करणे आणि त्यांच्या ठिकाणी ज्ञानाची आवड निर्माण करणे, हे आपले कार्य असते. सहानुभूती व प्रेमळपणा याशिवाय मुलांच्या अंत:करणात शिरून त्यांची विचारपूस करणे, त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणे, गरजेचे आहे. मुलांचे अंतर्मन आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे त्यांच्याशी समरसता निर्माण होत नाही.

सतत प्रश्न विचारणारी घरातील छोटी मुले ही या पृथ्वीवरची पहिली शास्त्रज्ञ मंडळी आहेत. मुलांनी सतत स्वत:लाच प्रश्न विचारायला हवेत. माणसाला कृतिशील बनवणारा विचार ही त्याची संपत्ती आहे, म्हणून मुलांनी उत्तम विचारांची कास धरायला हवी. मुलांनी स्वप्नं पाहायला हवीत. स्वप्नं माणसाला विचारप्रवृत्त करतात. स्वत:लाच अनेक प्रश्न विचारत जाणाऱ्यांची ज्ञानसंपदा वाढते. आजकाल संस्कार केंद्रात संस्कार करणे, हा एक बाऊ झाला आहे. खरंतर, संस्कार म्हणजे काय तर अनुकरण. मग, ते चांगले किंवा वाईट हे प्रत्येकाच्या वागण्यावर, भाषेवर, आहारावर आणि त्या घरातल्या विहारावर अवलंबून असते. जसे की घरात कोणी वयस्क, प्रौढ माणसे असतील, तर त्यांच्याशी हळुवार बोलून, त्यांचा योग्य तो आदर ठेवून त्यांच्याशी आपण वागलो तर तेच अनुकरण आपली मुलं करतील. संपूर्ण दिवसात आपल्या हालचालीतून नकळत मुलं शिकत असतात. मुलांच्या समोर आपण एखाद्याबद्दल अनादराने बोललो, तर मुलेही त्याचा अनादर करतील. आपणच जर आपली जबाबदारी टाळली, अरेतुरेची भाषा केली, तर मुलेही त्याचप्रमाणे बोलतील. एखादा विद्यार्थी जेव्हा उनाडपणा करतो किंवा बिघडतो, तेव्हा त्या कुटुंबातील, शाळेतील आणि समाजातील सर्व घटक त्याला जबाबदार आहेत. शिक्षकांकडून किंवा पालकांकडून पाल्याला काय मिळते, हे आपण पाहायला हवे. पूर्ण विचारांती ठाम निर्णय हा प्रगतीचा मार्ग आहे. आपलं वागणं हेच संस्कार असतात.
आपण लहान मुलांशी कसं वागतो, पाया भक्कम असेल तर मंदिर भक्कम बनते आणि सुंदर कळस बांधला जातो. यासाठी पालकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. कारण, पालक त्यांना जसे जमेल, जसे वाटेल, त्याप्रमाणे आपल्या मुलांचा सांभाळ करत असतात. आपण कोणत्याही संस्थेत किंवा कार्यक्षेत्रात प्रवेश करण्याअगोदर त्या कार्याची माहिती घेतो, अद्ययावत प्रशिक्षण घेतो. इथे तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवायचे असते. पुढे ७० वर्षे तो जीवसृष्टीमध्ये, समाजामध्ये, कुटुंबामध्ये वावरणार असतो. पण, त्याच्याशी कसे वागावे, त्याला काय सांगावे, शिकवावे, आपल्यामध्ये काय बदल करावेत, याबद्दल कित्येक पालकांना माहीत नसते. म्हणूनच, आजची सामाजिक परिस्थिती धोक्याच्या पातळीवर आहे. व्यक्तीच्या प्रत्येक कृतीत, वर्तणुकीत, वृत्तीत, वाणीत त्याचे संस्कार हे मूळ असते. संस्काररूपी मुळांनी जे शोषले, त्यावर त्या व्यक्तीचा जीवनरस तयार होतो, इतके महत्त्वाचे संस्कार पालकांनी काही जाणीवपूर्वक तर काही अजाणतेपणी करायचे असतात. या दोन्ही संस्कारांचे संस्कार प्रथम पालकांवर व्हायला हवेत.


च्अनेक शास्त्रज्ञांनी आपली जिज्ञासा ठेवली. त्यातूनच नवे शोध लागले.
च्समुद्र निळा का असतो? असा प्रश्न पडल्यामुळे सर सी.व्ही. रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ किंवा ‘रामन थिअरी’ मांडली.
च्विश्वाच्या निर्मितीचे कोडे पडल्याने डॉ. आइनस्टाइन यांनी सापेक्षवादाचा सिद्धान्त मांडला.

मूल वाढवणं म्हणजे काय? तर संस्कार करणे असं अनेकांना वाटते. मुलांना चांगले कपडे, पोषक आहार, वैद्यकीय सुविधा देणे आणि मनाचे श्लोक, शुभंकरोती, रामरक्षा काही मराठी वा इंग्रजी बडबडगीते तोंडपाठ करून घेणं म्हणजे संस्कार नव्हे. या संस्कारातून मुलं चांगलं शिकतात का? हा एक प्रश्नच आहे. मुलांना चांगल्या सवयी लावून त्यांचे शरीर समर्थ बनविण्याची, त्यांची वाणी शुद्ध करण्याची, मने सत्प्रवृत्त करण्याची आणि त्यांच्या ठिकाणी ज्ञानाची आवड निर्माण करण्याची आज खरी गरज आहे. मूळातच पालकांनीही यादृष्टीने स्वत:च्या वागण्यात जाणीवपूर्वक बदल केले पाहिजेत. कारण आपलं वागणं हेच मुलांवर संस्कार ठरतात आणि शेवटी पाया भक्कम असेल तरच कळस भक्कम बनतो.

 

Web Title: Outside the box - If the foundation is strong ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.