उल्हासनगर : माझ्या भाजपा प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची पहिल्यांदाच कबुली देताना उल्हासनगरच्या विकासासाठी पॅकेज द्यावे, अशी मागणी केल्याची माहिती ओमी कलानी यांनी दिली. तीन महिन्यांपूर्वीच ही चर्चा झाली होती. त्यात डम्पिंग ग्राऊंड, पाणी योजना, मलनिस्सारण केंद्र आदी योजनांसाठी पॅकेजची मागणी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्या पॅकेजची घोषणा होत नसल्यानेच माझा भाजपा प्रवेश लांबल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उल्हासनगरच्या राजकारणात गेले काही महिने ओमी कलानी आणि त्यांची टीम भाजपात जाणार का? या एकाच मुद्द्यावर चर्चा रंगली आहे. शिवसेना-भाजपा-रिपाइंची युती, राष्ट्रवादीचे अस्तित्व, साई पक्षाची भूमिका, मनसेचे ओमींसोबत जाणे हे सारे त्या निर्णयावर अवलंबून आहे. त्याला अखेर ओमी यांनीच पूर्णविराम दिला. ठाण्यातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान येत्या गुरूवारी ते भाजपात प्रवेश करतील, असा अंदाज त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.
गेल्या आठवडयात थेट मुख्यमंत्र्यांनीच प्रवेशाचा प्रस्ताव पाठविल्याचे ओमी यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शहर विकासासाठी विशेष पॅकेज जाहीर करा, अशी अट फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत घातली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
महापालिकेचे उत्पन्न मर्यादित आहे. त्यातून शहराचे मोठे प्रकल्प मार्गी लागू शकत नाहीत. त्यासाठी राज्य सरकारकडून पॅकेजची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांना पटवून दिल्याचे ते म्हणाले.
पालिकेला विकासासाठी पॅकेज मिळाले, तर पाण्याचा प्रश्न मार्गी लावता येईल. सांडपाण्याच्या प्रश्नावर काम करता येईल. तसेच उल्हासनगरच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या प्रश्नालाही न्याय देता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.त्यावर दोन दिवसांत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)