लक्षवेधी - भूमिपुत्र विरुद्ध उच्चशिक्षित असा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 05:28 AM2019-04-06T05:28:45+5:302019-04-06T05:34:44+5:30

आमने-सामने । पदाधिकारी - कार्यकर्ते एकदिलाने काम करणार का?

Noteworthy - face-to-face against BPL kalyan lok sabhe election | लक्षवेधी - भूमिपुत्र विरुद्ध उच्चशिक्षित असा सामना

लक्षवेधी - भूमिपुत्र विरुद्ध उच्चशिक्षित असा सामना

googlenewsNext

प्रशांत माने 
२००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाले आणि कल्याण लोकसभा हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. कल्याण लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत दिवंगत माजी खा. प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले; परंतु परांजपे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. त्यावेळी सेनेचे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे, तर मनसेचे प्रमोद (राजू) पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. सेना-भाजपाची युती आणि मोदीलाटेचा प्रभाव, यामुळे शिंदेंनी तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा पराभव केला.



यंदाही सेनेतर्फे शिंदे हेच रिंगणात असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांचे आव्हान आहे. या दोघांमध्येच खऱ्या अर्थाने लढत पाहायला मिळणार आहे. आगरी, मराठा-कुणबी व अन्य बहुभाषिकांसह मुस्लिम, दलित आणि उत्तर भारतीयांची मते येथे निर्णायक असली, तरी भूमिपुत्र विरुद्ध उच्चशिक्षित आणि विकास हेच मुद्दे प्रचारात प्रामुख्याने राहणार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच सेना-भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. आधी जनसंघ आणि नंतर भाजपकडे असलेला हा मतदारसंघ चिमूर मतदारसंघाच्या बदल्यात सेनेने आपल्याकडे खेचून आणला.

२००९ च्या पुनर्रचनेत कल्याण लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर प्रकाश परांजपे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे पुत्र आनंद यांना शिवसेनेतून उमेदवारी देण्यात आली. ते निवडूनही आले; परंतु नंतर ते राष्ट्रवादीत गेले. २०१४ च्या निवडणुकीत मात्र परांजपे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. युती आणि त्यावेळच्या मोदीलाटेत शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे तब्बल दोन लाख ५० हजार ७४९ मताधिक्यांनी विजयी झाले.

या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेता कळवा-मुंब्रा-दिवा, कल्याण पूर्व-ग्रामीण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ अशा विधानसभेच्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. कळवा-मुंब्रा राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, कल्याण पूर्वचे भाजपा सहयोगी अपक्ष गणपत गायकवाड, डोंबिवली भाजपाचे रवींद्र चव्हाण, कल्याण ग्रामीण शिवसेनेचे सुभाष भोईर, उल्हासनगर राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी, तर अंबरनाथमधून शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर हे आमदार आहेत.

कळवा-मुंब्रा मतदारसंघ आणि उल्हासनगर हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने या मतदारसंघांतून राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना कितपत मते पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उल्हासनगरमध्ये ओमी कलानी गटाचा कलही महत्त्वाचा ठरणार आहे. सद्य:स्थितीला पाटील यांच्या समर्थकांकडून भूमिपुत्राचा नारा दिला जात असल्याने शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या, पण भूमिपुत्रांचे प्राबल्य असलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातूनदेखील पाटील यांना किती मते पडतात, याकडेही लक्ष लागले आहे.

ठाणे महापालिकेतील प्रभागही या मतदारसंघात येतात. आघाडी विरुद्ध युती, असे थेट चित्र कल्याण लोकसभा मतदारसंघात दिसत असले, तरी आघाडीतील बेबनाव नुकत्याच पार पडलेल्या कल्याणमधील नियोजन बैठकीच्या निमित्ताने समोर आला होता. काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांच्या मध्यस्थीनंतर आघाडीतील स्थानिक नेत्यांमध्ये दिलजमाई झाली असली, तरी पक्षांतर्गत गटातटांचे राजकारणदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



युतीमध्येही सर्व काही आलबेल आहे, असे नाही. भिवंडी लोकसभेतील भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्याबाबतीत शिवसैनिकांनी
उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. याचे पडसाद कल्याण लोकसभा मतदारसंघात उमटणार तर नाही ना, अशी भीती शिवसेनेला आहे. प्रचार मेळाव्यांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र दिसत असले तरी एकदिलाने काम करतील का, अशी शंका युतीसह आघाडीमध्येही
उपस्थित केली जात आहे.

मतदारसंघात येणाऱ्या महापालिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेत सेनेचे ५२, भाजपा ४२, मनसेचे १०, काँगे्रस ४, राष्ट्रवादी २, एमआयएम २, बसपा १ आणि अपक्ष ९ असे बलाबल आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे ३२, शिवसेना २५, राष्ट्रवादी ४, काँग्रेस १, साई पक्ष १२, आरपीआय (आठवले गट) २, भारिप १, पीआरपी (कवाडे गट) १ असे, तर अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना २२, भाजपा १०, काँगे्रस ८, राष्ट्रवादी ५, मनसे १ आणि अपक्ष १० असे चित्र आहे.

 

Web Title: Noteworthy - face-to-face against BPL kalyan lok sabhe election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.