कंत्राटदारांच्या खैरातीवर नव्या वर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:51 AM2017-12-30T02:51:12+5:302017-12-30T02:51:29+5:30

कल्याण : थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयातील सुरक्षारक्षकांनी कंत्राटदार, बिल्डरांकडून पैसे मागितल्याची तक्रार सुरू आहे.

New year reception on contractors' papers | कंत्राटदारांच्या खैरातीवर नव्या वर्षाचे स्वागत

कंत्राटदारांच्या खैरातीवर नव्या वर्षाचे स्वागत

Next

प्रशांत माने 
कल्याण : थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयातील सुरक्षारक्षकांनी कंत्राटदार, बिल्डरांकडून पैसे मागितल्याची तक्रार सुरू आहे. पालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांकडूनही पैसे उकळल्याने त्या धसक्यापोटी दोन दिवस ते पालिकेत फिरकलेले नाहीत. त्यामुळे सध्या मुख्यालय आणि पालिका भवन परिसरात शुकशुकाट आहे.
पैसे घेण्यावरून सुरक्षारक्षकांच्या दोन गटांमध्ये हमरीतुमरीचे प्रकारही याआधी घडले आहेत. दिवाळी असो अथवा गणपती-नवरात्र अशा सणांना काही जणांकडून स्वखुशीने पैसे दिले जातात. परंतु, आता गटारी आणि थर्टी फर्स्टसाठी पैशांचा तगादा लावला जात असल्याने सुरक्षारक्षकांची ही कृती चर्चेचा विषय ठरली आहे. सुरक्षा विभागाचे प्रमुख सु. रा. पवार आणि मुख्य सुरक्षा अधिकारी सुहास खेर हे सध्या रजेवर आहेत. दरम्यान, सुरक्षारक्षकांच्या पैसे उकळण्यासंदर्भात सहायक सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
राजकीय पक्षांप्रमाणे केडीएमसी मुख्यालयातील सुरक्षारक्षकांमध्येही दोन गट आहेत. एक मुख्यालयाच्या इमारतीत, तर दुसरा गट पालिका भवनात आहे. तेथे गरज नसतानाही मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. त्यांचे तेच चेहरे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ड्युटीवर दिसतात. पालिका मुख्यालयातील प्रवेशद्वारावर ते पाहायला मिळते. वरिष्ठांच्या आशीर्वादाने येथे तैनात असलेले कर्मचारी मुख्यालयाबाहेर अन्यत्र कुठेही न जात मोक्याच्या ठिकाणी ड्युटी घेण्यात यशस्वी होतात. कार्यालयीन वेळेत दाटीवाटीने कर्तव्य बजावणारे हेच रक्षक दुसरा, चौथा शनिवार आणि रविवारी दिसतही नाहीत. या दिवशी खाजगी वाहनचालक मुख्यालयाच्या आवाराचा पार्किंग म्हणून वापर करत असल्याने अक्षरश: सुरक्षेचे तीनतेरा वाजतात. कार्यालयीन वेळेनंतर बाहेरील नागरिकांना मुख्यालयात प्रवेश नाही. तरीही काही कंत्राटदारांना तसेच ‘जागरूकते’चा वसा घेतलेल्या काही नागरिकांना मात्र सुरक्षारक्षक प्रवेश देतात. काही वर्षांपूर्वी एका हत्येतील आरोपीने त्याची मोटारसायकल पालिका आवारात उभी केल्याचे बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासात समोर आले होते.
>वेतन मिळत असताना ही कृती योग्य नाही
आम्ही महापालिकेत कामासाठी येतो. आधीच कामांच्या थकीत बिलांमुळे हैराण असताना आमच्याकडे थर्टी फर्स्टच्या नावाखाली पैशांचा तगादा लावला जात आहे, हे चुकीचे आहे.
दिवाळीच्या वेळी खुशीने पैसे आम्ही देतोही, पण आता गटारी असो अथवा थर्टी फर्स्टसाठी पाठीमागे लावला जात असलेला ससेमिरा पाहता, अशा वेळी महापालिकेत न गेलेलेच बरे, असे वाटते.
सुरक्षारक्षकांना वेतन मिळतानाही त्यांची जी कृती सुरू आहे, ती योग्य नाही, असे कल्याणमधील एका कंत्राटदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title: New year reception on contractors' papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण