ठाणे : विभागातील वाढत्या समस्या सोडवण्यासाठी तेथे नव्याने दिवा प्रभाग समिती सुरू करण्यात आली आहे. परंतु, या प्रभाग समितीत अधिकारी मात्र जाण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. काही अधिकाºयांच्या २० दिवसांपूर्वी आॅर्डर काढूनदेखील त्यांनी तेथे जाणे नापसंत केले आहे. त्यामुळे दिव्याला प्रभाग समिती मिळूनही अधिकाºयांअभावी तेथील समस्या कशा सुटणार, असा सवाल आता केला जाऊ लागला आहे.
दिव्याची लोकसंख्या आज झपाट्याने वाढत आहे. येथील अनधिकृत बांधकामांची वाढती संख्या पाहता तेथे देण्यात येणारे रस्ते, पायवाटा, गटारे, वीज, पाणी आदींच्या अपुºया सुविधांमुळे हा परिसर अनेक समस्यांनी ग्रासला आहे. स्थानिक नगरसेवक येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वारंवार प्रयत्नशील असल्याचे दिसते. परंतु, त्यांनादेखील फारसा प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, आता तर मागील एक ते दीड वर्षापासून या भागात विकासाची गंगा वाहू लागली आहे. येथील पाणीपुरवठा वाढवण्यात आला आहे. रस्ते, पायवाटा, मोठे रस्ते यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवाय, विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रस्तावदेखील मंजूर केले आहेत. तसेच या भागाला प्रभाग समिती मिळावी, अशी मागणी मागील कित्येक वर्षांपासून रहिवाशांची होती. मालमत्ताकर, पाणीकर आदींसह इतर काही पालिकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांसाठी येथील रहिवाशांना मुंब्रा प्रभाग समितीवर अवलंबून राहावे लागत होते.