राष्ट्रवादीत आज होणार ‘सुसंवाद’, दिग्गज नेत्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 05:45 AM2018-10-05T05:45:05+5:302018-10-05T05:45:11+5:30

दिग्गज नेत्यांची उपस्थिती : गटबाजी, श्रेयवादामुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज

NCP will be organized today, will see 'harmony', presence of veteran leaders | राष्ट्रवादीत आज होणार ‘सुसंवाद’, दिग्गज नेत्यांची उपस्थिती

राष्ट्रवादीत आज होणार ‘सुसंवाद’, दिग्गज नेत्यांची उपस्थिती

Next

प्रशांत माने

कल्याण : गटबाजी आणि श्रेयवादाच्या वाळवीमुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसला घरघर लागली असून या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी १ वाजता पश्चिमेतील मराठा मंदिर हॉलमध्ये सुसंवाद विशेष सभा होणार आहे. स्थानिक नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेबनाव असताना, या सभेमध्ये दिग्गज नेते पक्षाच्या स्थितीवर काय बोलतात, याकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

केडीएमसीत एकेकाळी सत्ता भोगलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या २०१५ च्या निवडणुकीत अवघ्या दोनवर आली. त्यानंतरही संघटनात्मक बांधणीसाठी स्थानिक पातळीवर पक्षाने कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी गटबाजी, श्रेयवाद व वर्चस्ववादात पदाधिकारी गुंतल्याने पक्षाची प्रतिमा ढासळत आहे. २००० मध्ये केडीएमसीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १० नगरसेवक निवडून आले होते. २००५ मध्ये शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावत महापालिकेची सत्ता मिळवण्यात या पक्षाने यश मिळवले. त्यावेळी पक्षाचे २३ नगरसेवक निवडून आले. त्यावेळी काँग्रेसबरोबर झालेली आघाडी आणि अपक्षांच्या साहाय्याने राष्ट्रवादीच्या पुंडलिक म्हात्रे यांना महापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. डान्स बारबंदीचा धाडसी निर्णय घेतलेल्या तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची लोकप्रियता तेव्हा सत्ता येण्यास कारणीभूत ठरली होती. डोंबिवलीत झालेली आर.आर. यांची सभाही तेव्हा गाजली होती. परंतु, पुढे स्थानिक नेत्यांचा उद्दामपणा आणि अपक्षांनी युतीला साथ दिल्याने राष्ट्रवादीला सत्ता पूर्णपणे उपभोगता आली नव्हती. अडीच वर्षांमध्येच राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात येऊन युतीने महापालिका काबीज केली. त्यानंतरच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची घसरणच होत गेली.

२०१० च्या निवडणुकीत १४ आणि २०१५ मध्ये केवळ दोन नगरसेवक निवडून आले. २०१५ मध्ये अनेक नगरसेवकांनी भाजपाची वाट धरल्याने पक्षावर ही स्थिती ओढावली आहे. पक्षाची अशीच स्थिती जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीतही आहे. याचे चिंतन करण्याऐवजी सध्या पक्षात गटातटांचे राजकारण, श्रेयवाद आहे. हे चित्र अन्य पक्षांत असले, तरी राष्ट्रवादीत ही परिस्थिती टोकाला पोहोचली आहे. मंगळवारच्या मौनव्रत आंदोलनादरम्यान माजी पदाधिकाऱ्यांत घडलेल्या धक्काबुक्की प्रकरणातून याची प्रचीती आली. गटबाजी आणि श्रेयवाद सर्रासपणे सुरू असताना प्रोटोकॉलही पाळला जात नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्षाला बळकटी देईल, अशा समर्थ नेतृत्वाचा अभाव असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे बोलले जात आहे. पक्षात सक्षम नेते मोजकेच असून ते त्यांचे वर्चस्व कसे अबाधित राहील, यातच मश्गुल आहेत. पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत काय योगदान दिले, असा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. कल्याण-डोंबिवलीत नागरी समस्यांवर पक्ष रस्त्यावर उतरताना दिसत नाही. केंद्र आणि राज्यपातळीवरील विषय घेऊन पक्षाच्या आदेशाप्रमाणेच आंदोलने केली जातात. आंदोलनात कार्यकर्ते व पदाधिकाºयांची नगण्य उपस्थितीही चर्चेचा विषय ठरत आहे.

शुक्रवारच्या सुसंवाद सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित राहणार आहेत. पक्षबांधणी आणि वाढीसाठी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले असले, तरी पक्षाच्या स्थितीवर प्रदेश पातळीवरील नेते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नियुक्त्यांवरून होणार वाद?
शुक्रवारच्या सुसंवाद सभेच्या निमित्ताने नवीन नियुक्त्या घोषित केल्या जाणार आहेत. या नियुक्त्यांमध्ये नवख्यांना संधी दिली गेल्याने जुने कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे सुसंवाद सभेत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

Web Title: NCP will be organized today, will see 'harmony', presence of veteran leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.