नंदूरबारच्या व्यावसायिकाचे अपहरण करुन दोन लाखांची खंडणी उकळणा-या पोलिसासह दोघे जेरबंद

By जितेंद्र कालेकर | Published: July 11, 2018 08:41 PM2018-07-11T20:41:27+5:302018-07-11T21:05:33+5:30

नंदूरबारच्या एका व्यापा-याबरोबर तरुणीला मैत्रिचे नाटक करण्यास भाग पाडून नंतर त्याच्याशी तिने ‘जवळीक’ साधल्यानंतर त्याला दहा लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेलिंग करणा-या दिपक वैरागडे या पोलिसासह दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दीड लाखांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

Nandurbar's businessman abducted and robbed two lakhs of ransom, | नंदूरबारच्या व्यावसायिकाचे अपहरण करुन दोन लाखांची खंडणी उकळणा-या पोलिसासह दोघे जेरबंद

ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाईआरोपींमध्ये एका तरुणीचाही समावेशनाटयमयरित्या केली अटक

ठाणे: एका तरुणीला हाताशी धरुन नंदूरबारच्या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करीत त्याचे अपहरण करुन त्याच्याकडून दोन लाखांची खंडणी उकळून आणखी दहा लाखांची मागणी करणारा वर्तकनगर पोलीस ठाण्याचा पोलीस कॉन्स्टेबल दिपक वैरागडे (३३, रा. वर्तकनगर पोलीस वसाहत, ठाणे) आणि त्याचा साथीदार सोहेल पंजाबी (२३, रा. राबोडी, ठाणे) या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्यांनी ओलीस ठेवलेल्या व्यापा-याच्या मुलाचीही त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
या अपहरण, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या काळया व्यवहारात ठाणे शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील एक पोलीस शिपाई अडकल्याने संपूर्ण ठाणे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नंदूरबार जिल्हयातील अक्कलकुवा येथील रिजवान मेमन (२२) याला खंडणीसाठी अपहरण केल्याची तक्रार त्याच्या पित्याने ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे मंगळवारी केली होती. त्यानंतर काशीमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख या दोन पथकांनी केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला हे प्रकरण ठाणे ग्रामीणच्या कार्यक्षेत्रातील काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. परंतू, या गुन्हयाची सुरुवात ठाणे शहर पोलिसांच्या वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील येऊरच्या एका बंगल्यातून झाल्यामुळे हे प्रकरण आता वर्तकनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आपल्या ओळखीच्या किंवा तोंड ओळख झालेल्या परंतू आपल्या जाळयात येऊ शकेल, अशा एखाद्या तरुणाचा मोबाईल क्रमांक पोलीस शिपाई दिपक वैरागडे आणि राबोडीतील त्याचा मित्र सोहेल पंजाबी (खासगी व्यक्ती) हे सोहेलच्या मैत्रिणीला द्यायचे. हा क्रमांक दिल्यानंतर संबंधित तरुणाबरोबर ती चॅटींग करायचे. त्याच्याशी मैत्रिचे नाटक करुन प्रेमाच्या जाळयात ओढायची. नंतर त्याला शरीरसंबंधासाठी तयार करायची. असे संबंध प्रस्थापित झाल्यानंतर पोलीस असलेला दिपक जाळयात आलेल्याला बलात्काराच्या गुन्हयात अडकविण्याची धमकी द्यायचा. मग, प्रकरण सोहेलच्या मदतीने मिटते घेण्यास भाग पाडले जायचे. यातच काही रक्कम संबंधितांकडून घेतली जायची. असे काही प्रकार केल्यानंतर सोहेलने आपल्याच एकेकाळच्या वर्गमित्राला या जाळयात ओढले.
सोहेल तीन वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्हयातील अक्कलकुवा येथे अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी होता. तिथेच रिजवान मेमन या सायकल व्यापा-याच्या मुलाशी त्याची ओळख झाली होती. रिजवानशी मोबाईलवर चॅटींग करुन त्याला मैत्रिच्या जाळयात ओढण्यास सोहेलने त्याच्या मैत्रिणीला सांगितले. तो जाळयात अडकल्यानंतर त्याच्याकडून पैसे काढण्याचे दिपक आणि सोहेलचे आधीच ठरले. त्यानुसार ९ जुलै रोजी रिजवानला अक्कलकुवा येथून ठाण्यात येण्यास तिने भाग पाडले. ठाण्यात आल्यानंतर हे दोघेही एका मॉलमध्ये फिरले. नंतर एका रिक्षातून दोघेही येऊरला गेले. तिथे एका बंगल्यावर रिजवानला तिने शरीरसंबंधासाठी गळ घातली. त्यासाठी ते एका खोलीत शिरल्यानंतर तिथे वर्तकनगर पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल वैरागडे याने धाडीचे ‘नाटय’ वठविले. ‘तुम्ही इथे काय करता? तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो?’ असे तो रिजवानला सांगत असतांनाच तिथे आणखी दोघेजण आले. वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिला तक्रार देण्यास सांगण्यात आले. वैरागडे आणि त्याच्या साथीदारांनी त्याला वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणले. त्याला बाहेरच थांबवून तक्रार दाखल करण्याचे नाटयही वठविले. तेंव्हा रिजवानने राबोडीतील त्याचा पूर्वाश्रमीचा वर्गमित्र सोहेल पंजाबीला बोलविले. मात्र आधीच या कटात सहभागी असलेल्या सोहेलने ‘सेटींग’ करुन देतो, असे सांगत १५ लाखातून १० लाखांवर ‘मॅटर’ सेटल केले. दरम्यान, त्याच्याकडे सतत पैशांची मागणी करीत त्याला काल्हेर (भिवंडीतील) एका लॉजवर त्यांनी डांबून ठेवले. प्रचंड भेदरलेल्या रिजवानने अक्कलकुवा येथे आपले वडील अब्दुल रहिम मेमन आणि काही नातेवाईकांना ही आपबिती फोनवरुन कथन करुन पैसे घेऊन येण्यास सांगितले. मुलाने सांगितल्याप्रमाणे काशीमीरा भागातील फाऊंटन हॉटेलवर ते १० जुलै रोजी दुपारी आले. आपल्या मुलाला पोलीस असल्याच्या नावाखाली कोणीतरी डांबून ठेवल्याचे अब्इुल यांनी ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) काशीमीरा युनिटच्या अधिकाºयांना सांगितले. या प्रकरणातील गांभीर्यता आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन एलसीबी आणि काशीमीरा पोलिसांनी वारंवार ठिकाण बदलणाºया वैरागडे आणि सोहेल यांना अखेर मानपाडा उड्डाणपूलाच्या परिसरातून मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. मधल्या काळात त्यांनी रिजवानकडून उकळलेल्या दोन लाख रुपयांपैकी दीड लाख रुपये आणि त्यांचे दोन मोबाईल त्यांच्याकडून हस्तगत केले. त्यांना रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अटक केल्यानंतर पहाटे २ वा. वर्तकनगर पोलिसांकडे सुपूर्द केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली. दिपक आणि सोहेल यांनी आणखी कोणाकडून अशा प्रकारे ब्लॅकमेलींग करुन पैसे उकळले आहेत का? याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

‘‘ रिजवानला खंडणीसाठी अपहरण करणा-या दिपक वैरागड आणि सोहेल पंजाबी या दोघांना अटक करण्यात आली असून या कटात सहभागी असलेली त्यांच्या मैत्रिणीचीही चौकशी करुन तिलाही अटक करण्यात येईल. हे प्रकरण बुधवारी पहाटे वर्तकनगर पोलीस ठाण्यात वर्ग झाले असून या बाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे.’’
प्रदीप गिरधर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे
 

 

Web Title: Nandurbar's businessman abducted and robbed two lakhs of ransom,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.