पुर्नविकासाच्या नावाखाली महिलेस फसवणाऱ्या बिल्डर विरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 11:28 AM2019-07-16T11:28:33+5:302019-07-16T11:31:20+5:30

२००० साली दहिसरला राहणारा अनंत जाधव या बिल्डरने आम्रपाली डेव्हलपर्स या नावाखाली जयश्री यांची आजी, आई व दोन भावांसोबत जुनं घर पाडून इमारत बांधण्याचा करार केला

In the name of rehabilitation, the woman filed an offense against a fraudulent builder | पुर्नविकासाच्या नावाखाली महिलेस फसवणाऱ्या बिल्डर विरोधात गुन्हा दाखल

पुर्नविकासाच्या नावाखाली महिलेस फसवणाऱ्या बिल्डर विरोधात गुन्हा दाखल

Next

मीरारोड - जुनं घर मोडून त्या ठिकाणी इमारत बांधून मुळ मालकासच दिलेली सदनिका परस्पर दुसऱ्याला विकणाऱ्या बिल्डरवर अखेर ठाणे न्यायालयाच्या आदेशाने भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर पुर्वेच्या गोडदेव गावातील साई नेत्रा इमारतीत राहणाऱ्या जयश्री विश्वनाथ पाटील (५५) यांच्या पतीचे सुमारे २५ वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांनी घरकाम व लोकांची धूणीभांडी करुन घर संसार चालवला. सद्या त्या अकरा वर्षाच्या नातवा सोबत राहतात. साई नेत्रा इमारतीच्या जागी जयश्री यांच्या आजोबांचे जुने कौलारु घर आणि जमीन होती. आजोबांच्या मृत्युनंतर सदर जमीन व त्यावरील घर हे आजी आणि वडिलांच्या नावे झाले.

२००० साली दहिसरला राहणारा अनंत जाधव या बिल्डरने आम्रपाली डेव्हलपर्स या नावाखाली जयश्री यांची आजी, आई व दोन भावांसोबत जुनं घर पाडून इमारत बांधण्याचा करार केला. जयश्री देखील वारस असल्याने बिल्डर जाधव याने त्यांना देखील इमारतीत सदनिका देण्याचे आश्वासन देऊन इमारत बांधून झाल्यावर त्यात सदनिका दिली.

जयश्री यांनी बिल्डरकडे सदनिका दिल्याचा करारनामा व आवश्यक कागदपत्रे मागितली असता बिल्डरने सदनिका तुमच्यातच ताब्यात आहे असे सांगून कागदपत्रे कशाला हवीत म्हणत टोलवाटोलवी चालवली. जयश्री देखील मुळ जमीन - घर आपलंच असल्याने बिल्डरवर विश्वास ठेऊन सदनिकेत सुमारे १३ वर्षांपासून रहात होत्या. मात्र एप्रिल २०१८ मध्ये युनियन बँकेचे कर्मचारी जयश्री यांच्या घरी आले आणि त्यांनी सदर सदनिका चंद्रभान गुप्ता याच्या नावे असून त्याने बँकेकडून १२ लाखांचे कर्ज घेतले आहे. त्याचा एकही हप्ता भरलेला नाही म्हणुन जप्तीची नोटीस बजावली. या घटनेने हादरलेल्या जयश्री यांनी नोटीसवर मुदत मिळवत दुसरीकडे ठाणे न्यायालयात बिल्डर जाधव विरोधात दावा दाखल केला. न्यायालयाने बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर जयश्री यांनी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शनिवारी पोलीसांनी बिल्डर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: In the name of rehabilitation, the woman filed an offense against a fraudulent builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस