जितेंद्र आव्हाडांना नाईकांचा चेकमेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 03:31 AM2018-08-15T03:31:13+5:302018-08-15T03:31:42+5:30

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गेल्या काही दिवसांतील जवळीचा पहिला फटका आव्हाडांना बसला आहे.

Naik's checkmate to Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना नाईकांचा चेकमेट

जितेंद्र आव्हाडांना नाईकांचा चेकमेट

googlenewsNext

ठाणे - ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गेल्या काही दिवसांतील जवळीचा पहिला फटका आव्हाडांना बसला आहे. ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी त्यांचे निकटवर्तीय आनंद परांजपे यांना कायम ठेवतानाच आव्हाडांचे विरोधक गणेश नाईक यांचे निकटवर्तीय संजय वढावकर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ठाण्यात प्रथमच कार्याध्यक्षपदाची निर्मिती करण्यामागे आव्हाडांच्या राजकीय हालचालींवर लक्ष ठेवण्याची खेळी पक्षश्रेष्ठींनी खेळल्याची चर्चा सुरु झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात शिंदे आणि आव्हाड मैत्रीची चर्चा जोर धरू लागली आहे. आता या मैत्रीची पक्षश्रेष्ठींनीसुध्दा दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील इतर शहर अध्यक्षपदांच्या नियुक्त्या झाल्यानंतर ठाण्याच्या शहर अध्यक्षपदी परांजपे यांना कायम ठेवण्यात आले. परांजपे यांना हटविण्यासाठी मध्यंतरी नाईक गटाकडून हालचाली झाल्या. परांजपे यांच्याकडून पक्षाने खुलासा मागवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांनी शहर अध्यक्षपदाकरिता गुडघ्याला बाशींग बांधले होते. परंतु आव्हाडांच्या हट्टापुढे अखेर पक्षाने नमते घेत परांजपे यांना कायम ठेवले. मात्र कार्याध्यक्षपदी विरोधी गटाच्या वढावकर यांना नियुक्त करुन समतोल साधण्याचा प्रयत्न केला.
परांजपे यांनी आंदोलनांच्या माध्यमातून ठाण्यात पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे व आव्हाड यांचा आग्रह यामुळे त्यांना ही बक्षिशी देण्यात आल्याची चर्चा आहे. दुसरीकडे परांजपे यांचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्षपद काढून घेण्याच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. नाईक यांच्या गटाला खूष करण्याकरिता प्रथमच कार्याध्यक्षपदी कामगार नेते संजय वढावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वढावकर हे नाईक यांचे निकटवर्तीय मानले जातात. नाईक यांनी शहर अध्यक्षपदासाठी वढावकर यांच्या नावाची शिफारस श्रेष्ठींकडे केली होती. अखेर वढावकर यांना कार्याध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. शरद पवार हे ‘एक तीर मे दो निशान’ साधण्यात पटाईत असून येत्या निवडणुकीच्या निमित्ताने आव्हाड आणि नाईक यांना गोंजारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादीतील अध्यक्षपदाच्या नियुक्त्या
ठाणे शहर आनंद परांजपे, संजय वढावकर (कार्याध्यक्ष), दशरथ तिवरे (ठाणे ग्रामीण), रमेश हनुमंते (कल्याण डोंबिवली), ज्योती कालानी (उल्हासनगर) आणि खलिद गुड्डु - शहर अध्यक्ष आणि अनिल फडतरे (कार्याध्यक्ष) अशा नियुक्त्या झाल्या आहेत.

Web Title: Naik's checkmate to Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.