उल्हासनगर : इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. आता त्यांची पुढील पिढी देशसेवेसाठी तत्पर आहे. अशा या गांधी घराण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली.


राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ गोलमैदान येथे सभा झाली, तेव्हा ते बोलत होते. या वेळी गणेश नाईक, संजीव नाईक, ज्योती कलानी, प्रमोद हिंदुराव आदी उपस्थित होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात रस्ते, धरणे, कारखाने उभारले गेले. तर इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी देशाचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली. राजीव गांधी यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती करून देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आज प्रत्येकाच्या हातात जो मोबाइल दिसत आहे, तो केवळ राजीव गांधी यांनी केलेल्या प्रगतीमुळेच, असे पवार यांनी सांगितले.


देशाच्या फाळणीनंतर उल्हासनगरमध्ये विस्थापित मोठ्या संख्येने आले. या निर्वासित मंडळींनी देशाच्या आर्थिक उभारणीत मोठा हातभार लावला. मात्र, आज सरकारच्या धोरणामुळे त्यांच्यावर रोजंदारीची वेळ आली आहे, असे पवार यांनी सांगितले. या वेळी नाईक, कलानी, पाटील यांनीही भाषणे केली.

‘अडीच कोटी कारखाने बंद झाले’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत काय केले, याचा हिशेब द्यावा. याबद्दल न बोलता ते वैयक्तिक टीका करत आहेत. मोदी यांना देशात दोन कारखानेही सुरू करता आले नाहीत, असे पवार यांनी नमूद केले. बोफोर्स घोटाळ्याबाबत चौकशी झाली होती, मात्र राफेलबाबत मोदी साधे उत्तरही देत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदींच्या काळात अडीच कोटी कारखाने बंद झाले. हे सरकार केवळ जुमलेबाज असून अशांना तुम्ही निवडून देणार का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

दहशतवादी ठरवण्याची मोदींची रणनीती
विकास हेच लक्ष्य असल्याचे सांगणारे आता हिंदू धोक्यात आहेत, असे बोलून हिंदू दहशतवाद सुरू करीत आहेत. काँग्रेसने कधीच धर्माच्या नावाखाली हिंदू धर्मावर अन्याय केला नाही. मात्र मोदींच्या बाजूने असलेली एखादी शक्ती त्यांच्याविरोधात गेली की त्या शक्तीला दहशतवादी ठरविण्याची नीती वापरली जाते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिलिंद देवरा यांच्या खेतवाडी येथील जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.


मिलिंद देवरा यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर भाषणातून त्यांनी भाजपवर हल्ला चढविला. मोदी यांनी आज ओमर अब्दुल्ला दहशतवादी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शरद पवार त्यांच्यासोबत कसे जातात, असा प्रश्न करण्यात आला आहे. मात्र एक वेळ होती जेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षासोबत भाजप होती. त्यांची सत्ता असतानाही भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होती. तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही फारुख अब्दुल्लांना स्थान होते, याची त्यांनी आठवण करून दिली.


मराठी भाषिकांच्या पाठीत शिवसेना-भाजपने सुरा खुपसला आहे, असा आरोप मिलिंद देवरा यांनी आपल्या भाषणातून केला. महाआघाडीची सत्ता येताच भाडेकरूंना पाचशे चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


Web Title: Modi does not have the right to speak on the Gandhi family
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.