जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेची धडक; युती सरकारविरोधात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:29 AM2018-11-20T00:29:42+5:302018-11-20T00:30:05+5:30

‘फेकू सरकार हाय हाय’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’... अशा युती सरकारविरोधात घोषणा देत मनसेचा महामोर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यामध्ये जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी सहभागी झाले होते.

 MNS hits district collector's office; Declaration against the coalition government | जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेची धडक; युती सरकारविरोधात घोषणाबाजी

जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेची धडक; युती सरकारविरोधात घोषणाबाजी

Next

ठाणे : ‘फेकू सरकार हाय हाय’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’... अशा युती सरकारविरोधात घोषणा देत मनसेचा महामोर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यामध्ये जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी सहभागी झाले होते. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मंत्रालयावर यापेक्षा मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला.
तीनपेट्रोलपंप येथून दुपारी या मोर्चाला सुरुवात झाली. तेथून दगडी शाळा-चिंतामणी चौक या मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. त्यानंतर, मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चामध्ये सात ते आठ हजार लोक सहभागी झाले होते. मात्र, प्रत्यक्षात सभेच्या ठिकाणी चार हजारांच्या आसपास मोर्चेकरी असल्याचे पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. टोलचा झोल, शेतकऱ्यांची फसवणूक, २७ गावांची वेगळी नगरपालिका, दिवा क्षेपणभूमी, क्लस्टर योजना, कोपरी रेल्वे पूल, भिवंडी येथील वीजग्राहकांची लूट, ६५०० कोटींचे पॅकेज एक भले मोठे गाजर, स्मार्ट सिटी यासारखे अनेक मुद्दे यावेळी सभेत मांडण्यात आले. साडेचार वर्षांत नागरिकांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासनाकडून न्याय मिळणे बंद झाले आहे. पक्षाच्या वतीने याबाबत वेळोवेळी विविध विषयांवर पत्रव्यवहार केला. शिष्टमंडळाद्वारे प्रशासनाबरोबर पाठपुरावा केला. पण, नागरिकांच्या हाती काहीही लागले नाही, अशी टीका ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली.
मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मनसे नेते राजू पाटील, उपाध्यक्ष काका मांडले, सरचिटणीस प्रकाश भोईर, उपाध्यक्ष डी.के. म्हात्रे, सचिव इरफान शेख, सचिव राजन गावंड, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, उल्हासनगर शहराध्यक्ष बंडू देशमुख, अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर, बदलापूरचे विकास गुप्ते, नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे, मीरा-भार्इंदरचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे, कल्याण-डोंबिवलीच्या उपाध्यक्ष ऊर्मिला तांबे आदी उपस्थित होते. हे राज्य फक्त काही लोकांनी काही लोकांसाठी चालवलेले राज्य आहे आणि बाकी सगळे शांत आहेत. या राज्यातील विचारवंत काहीही बोलत नाहीत. कोणाला संताप येत नाही, असे सांगत मनसे नेते अभिजित पानसे यांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त करा, असे आवाहन उपस्थितांना केले.
राम मंदिराआधी कोपरीचा ब्रिज बांधा!
कोपरी-पाचपाखाडीचे आमदार असलेल्या पालकमंत्र्यांनी त्या विभागात काहीही काम केलेले नाही. राम मंदिरासाठी अयोध्येला जाण्यापेक्षा त्यांनी कोपरीचा पूल बांधावा. पालकमंत्र्यांना आयआरबी कंपनीने गाडी दिलेली आहे. जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी काहीही झालेले नाही, असा आरोप जाधव यांनी केला. कल्याण-डोंबिवलीचे खासदार फक्त नावाला डॉक्टर आहेत. त्यांचे स्वत:च्या वडिलांशिवाय पानही हलत नाही. कल्याण-डोंबिवलीकडे या पितापुत्राने दुर्लक्ष केले आहे. सध्या तेथे गाजराची शेती केली जात आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश कदम यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

मोर्चेक-यांच्या बससाठी गावदेवी, मनोरुग्णालय, वृंदावन सोसायटी, बाळकुम या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
‘दोघांनी केली युती, जनतेची केली माती’, ‘छोडो भारत अभियान’, ‘बुलेट ट्रेन नको’, ‘मुंबईची जीवनवाहिनी (रेल्वे) विस्कळीत’, ‘मूळ समस्या लपवण्याची खेळी’, ‘देऊ मंदिर... मशीद देशप्रेमाची गोळी, भाजून घेऊ सत्तेची पोळी’, ‘महाराष्ट्रात दुष्काळ, घोषणांचा सुकाळ, अजब तुझे सरकार’ अशा विविध घोषणांचे फलक घेऊन मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

Web Title:  MNS hits district collector's office; Declaration against the coalition government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.