मीरा रोडमध्ये फेरीवाल्यांचा जाच दिवसेंदिवस वाढताच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 08:20 PM2017-11-16T20:20:12+5:302017-11-16T20:20:30+5:30

मीरा रोडच्या शांती पार्क, गोकूळ व्हिलेज भागात फेरीवाल्यांचा जाच मोठा असताना कारवाई तर दूरच उलट दिवसागणिक त्यांची संख्या वाढत असल्याने स्थानिक रहिवाशांसह भाजपाच्या महिला पदाधिकारी सुरेखा शर्मा यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.

Mira Road hawkers are increasing day by day | मीरा रोडमध्ये फेरीवाल्यांचा जाच दिवसेंदिवस वाढताच

मीरा रोडमध्ये फेरीवाल्यांचा जाच दिवसेंदिवस वाढताच

googlenewsNext

मीरा रोड - मीरा रोडच्या शांती पार्क, गोकूळ व्हिलेज भागात फेरीवाल्यांचा जाच मोठा असताना कारवाई तर दूरच उलट दिवसागणिक त्यांची संख्या वाढत असल्याने स्थानिक रहिवाशांसह भाजपाच्या महिला पदाधिकारी सुरेखा शर्मा यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. विशेष म्हणजे पालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी येथेच सभा घेतली होती. प्रभागात चार ही नगरसेवक भाजपाचे निवडून आल्यानंतर हा प्रकार घडत असल्याने शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेत सत्ताही भाजपाची असल्याने भाजपाला मिळालेला घरचा अहेर मानला जातोय.

मीरा रोडच्या आरएनए ब्रॉड वे-जांगीड सर्कलपर्यंतच्या मुख्य मार्गावर बसणा-या फेरीवाल्यांवरून तत्कालीन नगरसेविका वंदना चक्रे यांच्यावर टीका केली जात होती. पालिका निवडणुकीत सदर प्रभागातून चक्रेसह सेनेच्या पॅनलचा पराभव झाला व भाजपाच्या दीपिका अरोरा, हेमा बेलानी, प्रशांत दळवी व आनंद मांजरेकर हे चारही नगरसेवक निवडून आले. महत्वाचे म्हणजे निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील संत झेव्हियर्स शाळेजवळच जाहीर सभा घेतली होती.

भाजपाचे सर्व नगरसेवक असताना येथील रस्ते, पदपथ आदी सार्वजनिक ठिकाणं अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई होईल व दिलासा मिळेल, अशी आशा लोकांना होती. परंतु आधीचे फेरीवाले, हातगाडीवाले हटवणं तर दूरच उलट नव्याने फेरीवाल्यांची संख्या झपाट्याने वाढायला लागल्याने लोक हैराण आहेत.

येथील संत झेव्हियर्स शाळेसमोरील परिसर, गोकूळ व्हिलेज, शांती दर्शन, ग्रीन व्ह्यू आदी इमारतींच्या बाहेर तर फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शाळा, धार्मिक स्थळ, रुग्णालय परीसरात फेरीवाल्यांना मनाई केली असली तरी या ठिकाणी सर्रास फेरीवाले बसत आहेत.

यामुळे शाळेच्या तसेच सायंकाळच्या वेळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. विद्यार्थी तसेच नागरिकांना रहदारीला अडथळा होत आहे. शिवाय चो-या वाढल्याचे शर्मा म्हणाल्या. रहिवाशांनी पालिकेसह स्थानिक सर्व भाजपा नगरसेवकांकडे देखील या वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबद्दल तक्रारी करून देखील कारवाईच केली जात नाही. सर्व नगरसेवक भाजपाचे असूनही हा प्रकार होत असल्याने शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील काही नगरसेवकांनी कारवाईसाठी खानापूर्ती म्हणून पत्र दिली आहेत. पण कारवाईसाठी मात्र पाठपुरावा केला जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Mira Road hawkers are increasing day by day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.