मीरा-भाईंदरचे पाणी भाजप आमदारामुळे ठाण्यातील विकासकाला दिल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:18 PM2019-06-19T23:18:06+5:302019-06-19T23:18:26+5:30

ठामपाच्या महासभेत शिवसेना आक्रमक; प्रशासनाची हिरानंदानीवर मेहरनजर

Mira-Bhayander's water is alleged to be given by BJP MLA from Thane | मीरा-भाईंदरचे पाणी भाजप आमदारामुळे ठाण्यातील विकासकाला दिल्याचा आरोप

मीरा-भाईंदरचे पाणी भाजप आमदारामुळे ठाण्यातील विकासकाला दिल्याचा आरोप

Next

ठाणे : एकीकडे मीरा-भाईंदर शहरांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असताना या शहराचे पाणी ठाण्यातील हिरानंदानी बिल्डरच्या प्रकल्पाला दिले जात असल्याची गंभीर बाब बुधवारी झालेल्या महासभेत उघड झाली आहे. विशेष म्हणजे मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी यासाठी पत्रव्यवहार केला असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी बुधवारी ठामपाच्या सभागृहात केला.

ठाणे महापालिकेने तर हिरानंदानीच्या भल्यासाठी चक्क सर्व्हिस रोडवरून जाणारी जलवाहिनी थेट त्यांच्या प्रकल्पातून नेल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर त्यासाठी टॅबही मारल्याचे पालिकेने कबूल केले आहे. त्यामुळे हिरानंदानी बिल्डरवर एवढी कृपादृष्टी कशासाठी, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के, राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह सर्वच सदस्यांनी केला. परंतु, यासंदर्भात प्रशासनाने केवळ उडवाउडवीचीच उत्तरे देण्यात धन्यता मानली.

बुधवारी महासभा सुरू होताच, नगरसेविका अर्चना मणेरा यांनी हिरानंदानी पार्कबाबत प्रश्नोत्तरे विचारली होती. यावेळी त्यांनी हिरानंदानीने आधी पार्क व रस्ता विकसित करणे अपेक्षित असतानाही ते केले नसल्याचा आरोप मणेरा यांनी केला. यावर सध्या विकसनाचे काम सुरूअसल्याने टप्प्याटप्प्याने ते केले जाईल, असे उत्तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले. तर, औद्योगिक विभागातून रहिवास विभागात रूपांतर करताना त्या भूखंडातून महापालिकेला सुविधा भूखंड मिळणे अपेक्षित होते. तो मिळालेला नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. परंतु, यावरही प्रशासनाने चालढकल केली.

नरेंद्र मेहतांनी दिले पत्र : विशेष म्हणजे, टाउनशिप उभारताना महापालिकेची त्या ठिकाणी असलेली आरक्षणे विकसित करणे अपेक्षित आहे. त्यातील किती आरक्षणे विकसित झाली, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. परंतु, त्याचेही उत्तर पालिकेला देता आले नाही. त्यातही याठिकाणाहून जी जलवाहिनी टाकली आहे, ती विकासकाच्या प्रकल्पातून का फिरवली, असा सवालही त्यांनी केला. त्यातही, ती मीरा-भार्इंदर महापालिकेची लाइन असताना ठाणे महापालिकेने त्याला कनेक्शन कसे दिले, असा सवालही म्हस्के यांनी केला.
यावर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अर्जुन अहिरे यांनी याबाबत मीरा-भार्इंदर महापालिकेशी सल्लामसलत केल्यानंतरच त्या वाहिनीवर टॅब मारला असून अद्याप कनेक्शन सुरू केले नसल्याचेही स्पष्ट केले. हा गोंधळ सुरू असतानाच शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी मीरा-भार्इंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी यासंदर्भात पत्र दिले असल्याचा धक्कादायक आरोप केला. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले.
ओसी नसतानाही जाहिराती दुसरीकडे विकासकाला ओसी देण्यात आली आहे का, असा सवालही म्हस्के यांनी उपस्थित केला. यावर शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्ट ओसी दिली असल्याची माहिती दिली.
पार्ट ओसी दिली असताना त्याने ओसी मिळाल्याच्या जाहिराती लावल्या कशा, ही ग्राहकांची फसवणूक नाही का? असा उलट सवालही त्यांनी केला. परंतु, याचेही उत्तर पालिका प्रशासनाला योग्य पद्धतीने देता आले नाही. त्यामुळे अखेर सभागृहातील सदस्यांनीच पालिकेच्या या चुकीच्या कारभाराला कंटाळून हा विषय आटोपता घेतला.

Web Title: Mira-Bhayander's water is alleged to be given by BJP MLA from Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.