मीरा-भार्इंदरमध्ये भाजपामुळे शिवसेना आली मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:52 AM2017-12-07T00:52:21+5:302017-12-07T00:52:36+5:30

स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून मीरा-भार्इंदर महापालिकेच्या माध्यमातून भाजपा नेतृत्त्वाकडून मनमानी आणि सुडाचे राजकारण सुरु आहे.

In Mira-Bhairindar, BJP came to power due to BJP | मीरा-भार्इंदरमध्ये भाजपामुळे शिवसेना आली मेटाकुटीला

मीरा-भार्इंदरमध्ये भाजपामुळे शिवसेना आली मेटाकुटीला

Next

मीरा रोड : स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून मीरा-भार्इंदर महापालिकेच्या माध्यमातून भाजपा नेतृत्त्वाकडून मनमानी आणि सुडाचे राजकारण सुरु आहे. आमदार प्रताप सरनाईकांसह शिवसेनेला सरसकट टार्गेट केले जात असून प्रशासनही त्यांना साथ देत असल्याने मेटाकुटीला आलेल्या शिवसेना नगरसेवकांनी अखेरचा पर्याय म्हणून पालकमंत्री एकनाथ श्ािंदे यांनाच साकडे घातले आहे. अधिवेशनानंतर ते पालिकेत येणार असल्याने नव्या वर्षात या दोन्ही पक्षातील संघर्षाला नवी धार मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मीरा-भार्इंदर मध्ये २०१२ च्या पालिका निवडणुकीच्या जागावाटपात त्यावेळी नगरसेवक असलेल्या नरेंद्र मेहतांनी आमदार प्रताप सरनाईकांना धक्का दिला होता. सोयीने काही ठिकाणी युती टाळली होती आणि भाजपाच्या जास्त जागा निवडून आणल्या. त्यानंतर पालिकेत भाजपा-शिवसेना युती असली तरी मेहतांनी पालिकेच्या कारभारात झोकून देत शिवसेनेला कात्रीत पकडणे सुरुच ठेवले. अनेक मुद्द्यांवर शिवसेनेनेही भाजपाला साथ न देता जशास तसे वागण्याचा प्रयत्न केला. मग मेहतांनी शिवसेनेचे नगरसेवक तसेच पदाधिकारी फोडत सरनाईकांना शह दिला. भाजपामध्ये मेहतांच्या नेतृत्त्वाला त्रासलेल्यांना आपल्याकडे खेचून घेत सरनाईकांनी काटशह दिला.
यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजपाने ६१ जागा जिंकून सर्वांनाच चकीत केले. आ. सरनाईकांना तर हा भाजपा नेतृत्त्वाचा जोरदार धक्काच होता. निवडणुकीनंतर शिवसेना नगरसेवक राजू भोईर आदींना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच भाजपात प्रवेश दिल्याचे भाजपाने जाहीर केले. पण भोईर यांनी त्याचा इन्कार केल्याने भाजपाची फजिती झाली.
पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला मिळणे अपेक्षित असताना जाणूनबुजून महापौरांनी ते जाहीर न केल्याने शिवसेनेत संताप उसळला. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. शिवसेनेच्या आंदोलनानंतर मेहता यांनी आणखीन आक्रमक भूमिका घेतली. पालिकेने नोटीस न देताच कमलेश, राजू व भावना भोईर या शिवसेना नगरसेवकांच्या कुटुंबीयांचे बांधकाम भुईसपाट केले. भोईर कुटुंबीयांनी आयोजित केलेली सर्कस बंद पाडण्यात आली.
खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भूमिपूजन केलेले नाट्यगृह रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत आणून आ. सरनाईकांपासून थेट ठाकरे यांनाच धक्का देण्याची खेळी आमदार मेहतांनी महापौरांच्या आडून केली आहे. शिवाय नवघर गावामागे स्थानिकांचा विरोध असताना दफनभूमीचा प्रस्ताव आणून शिवसेना नगरसेवकांची तारांबळ उडवली आहे.
महापालिका आयुक्तांसह प्रशासनही सत्ताधाºयांच्या तालावरच कारभार करत असून बदल्यांपासून जवळपास सर्वच कामकाज त्यांच्या मर्जीप्रमाणे चालवले जात आहे. अधिकारी व कर्मचारीही भाजपा नेतृत्त्वाच्या बंगल्यावर नियमित हजेरी लावत असल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. आमदार सरनाईक हे भाजपा नेतृत्वासह प्रशासनास प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करीत असले तरी ते अपुरे पडत असल्याचे सध्याच्या घटनाक्रमावरून दिसते. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष शहरात शिवसेनेचे आक्रमक नेतृत्त्व दिसत नाही. त्यामुळे सर्व भिस्त सरनाईकांवरच आहे. पण प्रशासनही दाद देत नसल्याने आणि भाजपा नेतृत्त्वाकडून एकापाठोपाठ एक दिल्या जाणाºया धक्क्यांमुळे शिवसेना मेटाकुटीला आली आहे. या अवस्थेमुळे शिवसैनिकांसह पदाधिकारी आणि नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे.

सेनेतील गटबाजीचा मेहतांना फायदा
प्रताप सरनाईकांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्याशी जमत नाही, ही राजकीय चर्चा नवीन नाही.
मीरा-भार्इंदरमध्येही शिवसेनेत सरनाईक यांचा एक गट आणि दुसरीकडे शिंदे-विचारे यांचा गट असल्याचे मानले जाते. जिल्ह्याचे नेते असले तरी आतापर्यंत ‘मातोश्री’चा वरदहस्त सरनाईक यांच्या पाठीशी असल्याने शिंदे यांनी मीरा-भार्इंदरमधील राजकारणात फारसे लक्ष घातलेले नाही.
शिवसेनेतील या गटबाजीमुळे पालकमंत्री, खासदार आणि आमदार असूनही पालिकेत शिवसेनेला किंमत राहिली नाहीच, शिवाय भाजपा आणि आमदार मेहता वरचढ ठरत असल्याची भावना शिवसैनिकांसोबतच आता नगरसेवकांमध्येही वाढीस लागली आहे.

शिंदे यांचा जनसंवाद
प्रताप सरनाईक यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाºया शिवसेना नगरसेवकांनी नुकतीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मीरा- भार्इंदरमधील हाताबाहेर चाललेली परिस्थिती त्यांच्या कानावर टाकली.
आमदार मेहता व भाजपाकडून चाललेले सुडाचे आणि मनमानी राजकारण मोडुन काढण्यासाठी तसेच पालिका प्रशासनावर शिवसेनेची जरब रहावी म्हणून मीरा-भार्इंदरमध्ये लक्ष घाला, असे साकडे या नगरसेवकांनी शिंदे यांना घातले आहे.
पालिकेत पालकमंत्री म्हणून ‘जन संवाद’ कार्यक्रम सुरु करा, असा आग्रह नगरसेवकांनी त्यांच्याकडे धरला आहे. अधिवेशनानंतर लक्ष घालतो, असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे त्या शिवसेना नगरसेवकांनी सांगितले.
यामुळे नव्या वर्षात शिवसेना भाजपाला जशास तसे उत्तर देण्यास तयार होणार हे नक्की. पण यातून शिवसेनेतील गटबाजी चिघळणार की शिवसेनेला आधार मिळणार, हेही स्पष्ट होईल.

Web Title: In Mira-Bhairindar, BJP came to power due to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.