ठाणे : दोन वर्षांनी होणाºया विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण मतदार, शेतकरी आणि आदिवासींचा कल स्पष्ट करणा-या आणि त्यामुळेच मिनी विधानसभा म्हणून चर्चेत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या १३ डिसेंबरच्या निवडणुकीत पुन्हा भाजपाच्या कोंडीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ग्रामीण राजकारणात आपले अस्तित्त्व कायम रहावे म्हणून कोणताही पक्ष युती करण्याची शक्यता नसली आणि स्वबळाचीच भाषा सुरू असली, तरी भाजपाविरोध हा छुपा अजेंडा राबवला जाण्याच्या हालचाली सुरू आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांची निवडणूकही होणार आहे. त्यातही भिवंडी, शहापूर आणि मुरबाडवरच सर्व पक्षांचे लक्ष केंद्रित आहे. भाजपाची थेट लढत शिवसेनेशी होईल. पण ग्रामीण राजकारणात अजूनही पाय रोवून असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कितपत लढत देऊ शकतील यावर निवडणुकीची रंगत अवलंबून आहे.
खासदार कपिल पाटील यांचा राजकीय प्रभाव भिवंडी महापालिका निवडणुकीत फारसा जाणवला नव्हता. त्यामुळे शहरी राजकारणापेक्षा ग्रामीण राजकारणावरील त्यांच्या प्रभावाचा अंदाज भाजपाला घेता येणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण भागाचा कल समजून घेता येणार आहे.
तीन वर्षांपूर्वी १ आॅगस्टला पालघर जिल्हा अस्तित्त्वात आल्यानंतर ठाण्याची जिल्हा परिषद बरखास्त झाली. त्यावेळेपासून नवी जिल्हा परिषद स्थापन करण्याचे प्रयत्न झाले. आता निवडणूक घोषित झाल्याने भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांच्या ग्रामीण भागातील राजकारण तापले आहे. भिवंडी, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातच सर्वाधिक जागा असल्याने भिवंडी ग्रामीणचे शिवसेनेचे शांताराम मोरे, मुरबाडमधील भाजपाचे आमदार किसन कथोरे आणि शहापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग बरोरा यांचे राजकारण पणाला लागणार आहे. खास करून भिवंडीत भाजपाचे खासदार आणि शिवसेनेचे आमदार असा संघर्ष आहे.
राष्ट्रवादीतून भाजपात आलेले कपिल पाटील यांनी आधीपासूनच फोडाफोडी करत ही निवडणूक किती प्रतिष्ठेची आहे त्याची चुणूक दाखवली आहे. त्यांच्यासोबत भाजपात आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच संधी देणे ही त्यांची राजकीय गरज आहे. पण तसे झाले तर डावलल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांतील नाराजी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.
शहापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला अस्तित्व टिकवण्याची शेवटची संधी आहे. तर शिवसेनेला पाय रोवण्याची. मुरबाडमध्ये भाजपातील गट-तट सांभाळून घेण्याची कसरत किसन कथोरे यांना पार पाडावी लागेल. सोबतच त्यांचे राजकीय विरोधक म्हणून कार्यरत असलेले गोटीराम पवार, प्रमोद हिंदुराव यांच्या राजकीय ताकदीचा अंदाजही येईल.
शिवसेना-भाजपातील तणाव, राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेनेने घेतलेली भेट आणि शिवसेनेला काँग्रेस करत असलेली मदत यांचा विचार करता या जिल्हा परिषद निवडणुकीत वेगवेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. छोट्या पक्षांची भूमिकाही यात महत्वाची ठरेल.

समृद्धीच गाजणार : समृद्धी महामार्गाचे भूसंपादन, त्याला भाजपाचा पाठिंबा आणि शिवसेनेची दुटप्पी भूमिका हा मुद्दा शहापूर तालुक्याच्या प्रचारात गाजेल. तर बडोदा महामार्गासाठीचे भूसंपादन, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या भूसंपादनाचा असंतोष हा मुद्दा अन्य तालुक्यांत गाजण्याची चिन्हे आहेत. अंबरनाथ तालुक्यात नेवाळीच्या आंदोलकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

रणमैदान भिवंडीतच : जिल्हा परिषेदच्या ५३ जागांपैकी २७ जागांचे काठावरचे बहुमत मिळवण्यासाठी ही लढाई आहे. भिवंडी तालुक्यात २१ असल्याने तो तालुका निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. १४ जागा असलेला शहापूर त्या खालोखाल, तर आठ जागा असलेला मुरबाडच्या तालुका तिसºया क्रमांकाचा महत्वाचा तालुका आहे.