The Mhasa Yatra started in enthusiasm, and even bought it | म्हसा यात्रेला उत्साहात सुरूवात, खरेदीलाही आला वेग

मुरबाड - म्हसा येथील प्रसिद्ध म्हसोबा-खांबलिंगेश्वराची विश्वस्तांच्या हस्ते पूजा करून यात्रेला मंगळवारी उत्साहात सुरूवात झाली. पहिल्या दिवशीच यात्रेला चांगली गर्दी झाली. सुरूवातीचे दोन-तीन दिवस गाजणाºया जनावरांच्या बाजारात चांगली गर्दी आहे. थंडी छान पडल्याने तेथे घोंगड्यांच्या खरेदीला वेग आला आहे.
यंदा प्रथमच देवाची पूजा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होती . परंतु सिद्धगडावर जाऊन हुतातम्यांना अभिवादन करून येण्यास त्यांना उशीर झाल्याने विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली सकाळी शिंदे यांनी मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेतले. यात्रेची गर्दी आता वाढत जाईल, असे देवस्थानचे अध्यक्ष दशरथ पष्टे यांनी सांगितले.
नारळाची तळी फोडणे, गळ लावणे यासाठी येथे भाविक येतात. तसेच काही जण नवसपूर्तीसाठीही येतात. शिवाय बैल बाजार, सुप-टोपली, घोंगडी, चादरी, ब्लँकेट, भांडी, पोळपाट-लाटणे, लाकडी परात यांची विक्र ी मोठ्या प्रमाणात होते.

शासकीय अनुदानाची प्रतीक्षाच

म्हासा यात्रेत येणाºया भाविकांना सेवा-सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायतीला मदत व्हावी म्हणून राज्य सरकारकडून निधी दिला जातो. यात्रा सुरू होण्यापूर्वी हा निधी ग्रामपंचायतीला मिळणे अपेक्षित असते. परंतु यात्रा सुरू झाल्यानंतरही तो न मिळाल्याने ग्रामपंचायतीला आपल्याच निधीच्या आणि अन्य मदतीच्या आधारे सेवा पुरवाव्या लागत आहेत.

याबाबत तहसीलदार सचिन चौधर यांना विचारता ते म्हणाले, शासनाकडून ग्रामपंचायतीला थेट निधी दिला जातो. त्यामुळे आमचा त्याच्याशी काही संबंध येत नाही . ग्रामसेवक यशवंत म्हाडसे यांनी सांगितले, शासनाकडून यात्रेसाठी येणारा निधी न आल्याने उसनवारी करून भाविकांना सुविधा पुरवाव्या लागत आहेत. निधी नसल्याने यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यासाठी अग्निशमन यंत्रणाही उपलब्ध करता आलेली नाही.

म्हसा यात्रेत मिठाईचे वेगवेगळे पदार्थही तयार केले जातात. त्यातील काही पदार्थ फक्त यात्रेतच मिळतात. हातावर, कपाळावर गोंंदवून घेण्यासाठीही गर्दी होते. लोखंडी भांडी, शेतीची अवजारे, काही प्रमाणात धान्याचीही खरेदी होते. बांबूच्या वस्तुही विक्रीसाठी असतात.

रास्ता रोकोमुळे बस खोळंबल्या

भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी गटाच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत पुकारलेला बंद आणि प्रमुख रस्ते अडवून चक्का जाम केल्याने कल्याण, भिवंडीतून येणाºया बस, मुरबाड आगारातून सुटणाºया बस आगारातच खोळंबल्या. त्यामुळे म्हसा यात्रेत काही काळ शुकशुकाट होता.

व्यापाºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आंदोलनानंतर मात्र बस सुटल्याने दर्शनासाठी जाणाºयांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर काही जणांनी यात्रेत पहिल्या दिवशी जाऊन नारळ फोडण्याचा संकल्प पूर्ण केला. या आंदोलनामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते.