ठाण्यातील म्हाडाचा भूखंड बिल्डरच्या घशात जाण्याचा डाव स्थानिक रहिवाशांनी उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:46 PM2018-05-17T21:46:25+5:302018-05-17T21:46:25+5:30

म्हाडाच्या जागेतील भूखंड बिल्डरने कामगारांच्या झोपडया बांधून आणि बांधकामाची सामुग्री ठेवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेने कारवाई करुन हा डाव हाणून पाडला.

MHADA plot in Thane: The builders' apprehension was thwarted by local residents | ठाण्यातील म्हाडाचा भूखंड बिल्डरच्या घशात जाण्याचा डाव स्थानिक रहिवाशांनी उधळला

पत्रे उभारुन अडविली होती जागा

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिकेने केली कारवाईपत्रे उभारुन अडविली होती जागाएमआरटीपी अंतर्गत कारवाईची मागणी

ठाणे : वर्तकनगर येथील म्हाडाच्या जागेतील समाजमंदिराचा भूखंड बिल्डरने पत्रे लावून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक रहिवाशांच्या मागणीनंतर ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीने याठिकाणी कारवाई करून बिल्डरने उभारलेले बांधकाम आणि पत्रे उद्ध्वस्त केले. या बिल्डरविरुद्ध आता एमआरटीपीअंतर्गतही कारवाई करावी, अशी मागणी येथील राहिवाशांनी केली आहे.
वर्तकनगर विभागातील म्हाडा वसाहतीमध्ये १९६५ पासून समाजमंदिराची ही जागा आहे. त्याठिकाणी अण्णासाहेब वर्तक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून कला, क्र ीडा आणि सांस्कृतिक कार्यक्र म साजरे होतात. या समाजमंदिराचा भूखंड सर्वसामान्यांसाठी खुला करावा, यासाठी मंडळामार्फत १९९० पासून वर्तकनगर महासंघामार्फत म्हाडाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. हा भूखंड खुला होण्याचे प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे. एकीकडे ही प्रक्रिया सुरू असतानाच काही राजकीय पाठबळ मिळवून श्री सत्यदीप रियलेटर कंपनीचे मालक सत्येंद्र विश्वकर्मा या विकासकाने म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने भूखंड बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. त्याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून कामगारांसाठी पत्र्यांच्या झोपड्या उभारून संपूर्ण भूखंडाला पत्र्याचे कम्पाउंडही केले. तसेच बांधकामाची इतर सामग्रीही ठेवली. हळूहळू हा भूखंड ताब्यात घेण्याचा बिल्डरचा डाव ओळखून स्थानिक रहिवाशांनी तसेच अण्णासाहेब वर्तक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत सातपुते यांनी ठामपा अधिका-यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानुसार, ११ ते १६ मे या पाच दिवसांच्या कालावधीत वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त चारुशीला पंडित, अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रभाकर शिंदे आणि लिपिक महेंद्र भोईर आदींच्या पथकाने बिल्डरने केलेले संपूर्ण बांधकाम उद्ध्वस्त केले. तेथील सामग्रीही हटवण्यात येऊन हा भूखंड मोकळा करण्यात आला. यावेळी स्थानिक रहिवासी केतन सुर्वे, अशोक कुलकर्णी आणि मंडळाचे पदाधिकारी जयसिंग नाईक, अनंत राऊत, गिरीधर राऊत, एम.एस. राणा, मधू टक्के, दिलीप मिस्त्री, राजेंद्र परदेशी तसेच अ‍ॅड. उज्ज्वला सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

‘‘समाजमंदिराचा हा भूखंड इतर कोणत्याही कंपनी किंवा संस्थेला देण्यात आला अथवा याठिकाणी पुन्हा असे अतिक्रमण कोणी केले, तर तीव्र जनआंदोलन केले जाईल. याची सर्व जबाबदारी ही पूर्णत: म्हाडाचीच राहील. आताही अतिक्रमण करणा-या या विकासकावरही पालिकेने एमआरटीपीची कारवाई करावी.’’
प्रशांत सातपुते, अध्यक्ष, अण्णासाहेब वर्तक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाणे
 

‘‘म्हाडा वसाहतीमधील या समाजमंदिराच्या भूखंडावर पत्रे टाकलेले होते. कामगारांच्या काही झोपड्याही बनवल्या होत्या. पत्रे लावून जागाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत, ठामपाच्या मुख्यालयातून आदेश आल्यानंतर याठिकाणी कारवाई करून हा भूखंड मोकळा करण्यात आला.’’
चारुशीला पंडित, सहायक आयुक्त, वर्तकनगर प्रभाग समिती, ठाणे महापालिका
 


 

 

Web Title: MHADA plot in Thane: The builders' apprehension was thwarted by local residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.