- जान्हवी मोर्ये,  पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)

केंद्र शासनाची धोरणे हिंदीधार्जिणी आहेत. त्यांचा इतर भारतीय भाषांनादेखील धोका आहे. मराठी भाषेची होणारी गळचेपी पाहून तिला मानाचे स्थान मिळावे, यासाठी ‘मराठी बोला’ चळवळीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यंदाच्या साहित्य संमेलनात मराठी बोला चळवळीने पहिल्यांदाच स्टॉल लावला आहे. साहित्य संमेलनातून ‘मराठी बोला’ चळवळीची माहिती मिळाल्याने आता ६० ते ७० लोक या चळवळीशी जोडले जाणार आहेत.
विशाल नवेकर आणि प्रसन्न कुलकर्णी यांनी मराठीची गळचेपी होत असल्याची आणि मराठीला स्वतंत्र स्थान दिले जात नाही, हे लक्षात आल्यावर २००२ मध्ये ‘मराठी बोला’ चळवळीचा प्रारंभ केला. त्यानंतर, ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे धनराज पवार यांनी फेसबुकवर एक ग्रुप तयार केला. त्याला लाइक जास्त मिळाले. त्याची सदस्यसंख्या वाढत आहे. त्यातून याची चळवळ उदयास आली. या चळवळीच्या माध्यमातून कौशिक लेले यांनी इतर भाषेतील ज्ञान मराठीत आणण्यासाठी युनिकोडिंग सुरू केले. या उपक्रमांतर्गत लोकांना भाषांतर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून लोकांचे गट तयार केले आहेत. इतर भाषिक साहित्य मराठी भाषेत आणण्यासाठी त्यांच्यामार्फत प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यांचा वापर शोध निबंध भाषांतरित करण्यासाठी होऊ शकतो. या चळवळीचा सर्व कारभार फेसबुक व टिष्ट्वटर यांच्यामार्फत चालतो. मराठीची गळचेपी होत आहे, हे लक्षात आल्यावर त्या ठिकाणी पत्रव्यवहार करण्याचे काम चळवळीमार्फत केले जाते. त्यामुळे नया अमरावती या शहराचे नाव बदलून नवीन अमरावती, नेरूळचे नेरूळ, तर ब्रांदाचे वांद्रे असे नामकरण केले आहे.

कौशिक लेले यांनी अमराठी आणि परदेशी नागरिकांना मराठी शिकवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांनी दोन ब्लॉग तयार केले आहेत. हे काम त्यांनी २ वर्षांपासून सुरू केले आहे. या माध्यमातून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त विदेशी नागरिक मराठी बोलू लागले आहेत. कोणत्याही शिक्षकांविना हे अमराठी नागरिक उत्तम मराठी बोलू लागले आहेत. हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य दिले जाते.