Local trouble at Kalyan railway station | कल्याणमध्ये लोकल खाली येऊन महिलेचा मृत्यू, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम 

डोंबिवली - मध्य रेल्वे मार्गावर मुंबईहून बदलापूरच्या दिशेनं लोकलखाली येऊन एका महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (26 डिसेंबर) घडली आहे. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली आहे.  प्लॅटफॉर्म क्रमांक चारदरम्यान हा अपघात झाला

दरम्यान, या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या महिलेचं नाव सीताबाई सोळंकी (वय 45 वर्ष) असे असून त्या परभणी जिल्ह्यातील रहिवासी होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी व दिर असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक साठे यांनी लोकमतला दिली आहे.  लोकलखालून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला होता. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक प्रभाविक झाली असून सेवा 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावत आहे. शिवाय, इंद्रायणी एक्स्प्रेसदेखील रखडली होती.

प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची तोबा गर्दी
जलद मार्गावरील वाहतूक सुरू आहे. मात्र कल्याण व डोंबिवली तसेच दिवा स्थानकातील धीम्या मार्गावरील प्रवासी जलद मार्गावरील प्लॅटफॉर्मवर आल्याने कल्याण स्थानकातील 5 व 7 फलाट आणि डोंबिवली प्लॅटफॉर्म  क्रमांक 5 तर दिवा स्थानकातील प्लॅटफॉर्म  क्रमांक 4 वर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती.

तांत्रिक बिघाड झाल्याची सुरुवातीला मिळाली माहिती
सुरुवातीला मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण रेल्वे स्टेशनवर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर बदलापूर लोकलमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत होते.