रेल्वे फाटकामुळे नोकरदारांच्या पाचवीला पुजलाय रोजच लेटमार्क

By admin | Published: January 23, 2017 05:20 AM2017-01-23T05:20:58+5:302017-01-23T05:20:58+5:30

ठाकुर्ली येथील रेल्वे क्रॉसिंगमुळे अनेक वेळा गाड्या फाटकातच अडकून पडल्याने लांब पल्ल्यासह लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Let's mark the fifth day of the employers due to the train picket | रेल्वे फाटकामुळे नोकरदारांच्या पाचवीला पुजलाय रोजच लेटमार्क

रेल्वे फाटकामुळे नोकरदारांच्या पाचवीला पुजलाय रोजच लेटमार्क

Next

ठाकुर्ली येथील रेल्वे क्रॉसिंगमुळे अनेक वेळा गाड्या फाटकातच अडकून पडल्याने लांब पल्ल्यासह लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वारंवार वाहतूक विस्कळीत होत असल्याने रेल्वेने त्याठिकाणी दोन रेल्वे सुरक्षा जवान नेमले आहेत. त्यांच्याकडून वाहतूक आणि प्रवाशांच्या जाण्या-येण्यावर देखरेख ठेवली जाते. डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर पूल हा एकमेव असल्याने ज्यांना ठाकुर्ली, कल्याणला जायचे आहे ते हा लांबचा वळसा वाचविण्यासाठी रेल्वे फाटकाचा वापर करतात. कल्याण समांतर रस्त्याकडून ठाकुर्लीकडे येणारी वाहने, घरडा सर्कलहून ठाकुर्लीकडे येणारी, डोंबिवली पश्चिमेतून कल्याणकडे जाणारी वाहने येथून जात असल्याने रेल्वे फाटकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. कोपर पुलाचे आयुष्यही संपले असल्याने त्याची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. सध्या याच पुलावरून सतत वाहतूक होत असते. गेल्या काही वर्षात कल्याण-डोंबिवलीतील वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी या एकमेव कोपर पुलावर सर्व ताण येतो. यासाठी रेल्वे व कल्याण-डोंबिवली महापालिका ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल उभारत आहे. यासाठी २३ कोटी खर्च करण्यात येणार आहे. या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप गती मिळालेली नाही. केवळ खांब टाकण्याचे काम सुरु झाले आहे. त्याला जोड रस्ता हा ठाकुर्ली पश्चिमेला ५२ चाळीच्या वळणावर उतरवला जाणार आहे. हे काम पुढील वर्षी-२०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे करारनाम्यात म्हटले आहे. त्यामुळे क्रॉसिंग बंद होण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.
वीजनिर्मितीचा दोनदा विचार
ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला रेल्वेची १०० एकरहून अधिक जागा आहे. या जागेत ब्रिटीशांनी १९२९ मध्ये थर्मल पॉवर प्लांट उभारला होता. या प्लांटमधून रेल्वेला वीज पुरवठा केला जात होता. या प्लांटसाठी रेल्वेने गावकऱ्यांच्या जागा ही संपादित केल्या होत्या. त्यात ठाकुर्लीतील स्थानिक ग्रामस्थ मधुकर पाटील यांचीही जागा गेली होती. या प्लांटमध्ये नोकरीसाठी ग्रामस्थांना जबदरस्तीने भरती केले जात होते. त्यात पाटील यांच्या दोन भावांनाही नोकरी लागली होती. तेथे स्फोेट झाल्यानंतर हा प्लांट भंगारावस्थेत पडून आहे. ही जागाही पडून आहे.
या जागेलगतच असलेल्या मोकळ्या जागा रेल्वेने भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना भाडे तत्वावर दिल्या आहेत. यूपीए सरकारच्या काळात २०११ मध्ये रेल्वे मंत्री ममता बॅनजी यांनी ठाकुर्लीचा पॉवर प्लांट सुरु करण्याची घोषणा केली. तो गॅसवर आधारित प्रकल्प होता. त्यासाठी पाचशे कोटी खर्च करण्याचे जाहीर केले होते. त्यांची ही घोषणा हवेतच विरली. नंतर तेथे अणुऊर्जा प्रकल्पाचाही विचार झाला. मात्र भरवस्तीत जागा असल्याने तोही प्रत्यक्षात आला नाही. आता त्याच जागेत एलिव्हेटेड रेल्वे टर्मिनस होत असल्याने ठाकुर्लीला महत्व आले आहे.
पैसा कुठून आणणार?
कल्याण रेल्वे टर्मिनसची मागणी मी खासदार असताना लावून धरली होती. कल्याणला टर्मिनस करण्याऐवजी ठाकुर्लीला करण्याची घोषणा जरी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ही घोषणा पूर्णत्वास येण्याबाबत मी साशंक आहे. घोषणेनंतर खरोखरच ठाकुर्लीला टर्मिनस शक्य आहे की नाही याची शक्यता रेल्वेने तपासली आहे का. रेल्वे टर्मिनस तयार करण्यासाठी लागणारा पैसा कुठून आणणार, असा सवाल माजी खासदार आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे. टर्मिनसच्या नियोजित जागेचे सर्वेक्षण झाले आहे का. रेल्वे बोर्डाने सर्वेक्षणाचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाला दिले आहेत का. त्यामुळे केवळ राजकीय पत्रव्यवहार करुन काहीही भागणार नाही. ही केवळ घोषणाच ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे, याकडे परांजपे यांनी लक्ष वेधले.
एलिव्हेटेड रेल्वे टर्मिनस
कल्याणला रेल्वे टर्मिनस व्हावे ही मागणी माजी खासदार आनंद परांजपे यांनी लावून धरली होती. त्यांच्या मते कल्याण रेल्वेस्थानक हे जंक्शन आहे. त्याठिकाणी रेल्वेची ६५ एकर जागा आहे. त्याचा वापर करावा असे त्यांनी सुचविले होते. त्यांच्या मागणीचा विचार सरकारने तेव्हा केला नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देशातील पहिले एलिव्हेटेड टर्मिनस ठाकुर्लीला उभारण्याची घोषणा केली आहे. या टर्मिनसचा लांबपल्याच्या गाड्यांना उपयोग होईल. त्यासाठी एक हजार २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जागेत मध्य रेल्वेने यापूर्वी सायडिंग लोकल यार्ड तयार केले होते. त्याचा वापर लोकल गाड्यांसाठी केला जातो. याठिकाणी वापरात नसलेल्या तीन लोकल उभ्या करुन ठेवल्या आहेत. त्याच्याबाजूला टर्मिनसची जागा विकसित केली जात आहे. त्याकरिता ट्रॅक टाकून ठेवले असून त्याच्याबाजूने साईड पाथ तयार करुन ठेवला आहे.
जलद लोकल थांबवा
दिव्याची लोकसंख्या वाढत असल्याने तिथे जलद लोकल थांबायला लागल्या. प्रवाशांच्या आंदोलनामुळे प्रशासनाला दखल घ्यावी लागली. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातही जलद गाड्यांना थांबा देण्यात यावा. ठाकुर्लीची वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील टर्मिनस पाहता ही मागणी रास्त आहे. स्थानकात होम प्लॅटफॉर्म बांधण्यात आला. मात्र, त्याचवेळी रुळांचे शिफ्टिंग करून येथे जलद गाड्यांसाठी फलाट बांधता आला असता.
कनेक्टिव्हिटीचा मुद्दा दुर्लक्षितच
रेल्वे टर्मिनस होत आहे ही आनंदाची बाब असली तरी टर्मिनसला इतर पूरक गोष्टी ठाकुर्लीत कुठे आहेत? ठाकुर्लीला कल्याणसारखी कनेक्टिव्हिटी नाही. आताच नियोजन करून ठाकुर्ली पूर्वेत रिक्षा, टॅक्सी, बस तळ, ठाणे, पनवेलकडे जाण्यासाठी सुविधा तयार करायला हवी. त्यानंतरच टर्मिनसच्या प्रकल्पाला हात घालणे आवश्यक आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाला सोयी सुविधा पुरविण्यासाठी १९९८ पासून पाठपुरावा केल्यावर त्याची पूर्तता होण्यास २०१७ उजाडले. इतकी मोठी प्रतीक्षा प्रवाशांच्या नशिबी असेल, तर टर्मिनससाठी किती प्रतीक्षा करावी लागेल?
- श्रीकर चौधरी, माजी नगरसेवक
पॉवर हाउस काळाची गरज
रेल्वेचे वाढते जाळे व भविष्याची गरज ओळखून रेल्वे प्रशासनाने ठाकुर्लीतील पॉवर हाऊस पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. रेल्वेला टाटा पॉवरकडून वीज मिळत असली तरी रेल्वेने विजेसाठी ब्रिटिशांप्रमाणे स्वावलंबी व्हायला हवे. १७ जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, मस्जिद आणि घाटकोपर स्थानकाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. ही बाब विचारात घेऊन रेल्वेचा स्वत:चा वीज निर्मिती प्रकल्प असला पाहिजे. पॉवर हाऊस सुरू व्हावे, यासाठी मी २० वर्षांपासून रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते या पॉवर हाउससाठी अनुकूल होते. ममता बॅनर्जी यांनीही येथे ७५० मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर आता रेल्वे टर्मिनसचा मुद्दा पुढे आला आहे. सध्या तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. अत्याधुनिक थर्मल पॉवर प्रोजेक्ट उभारता येऊ शकतो. त्यादृष्टीने रेल्वेने प्रयत्न केले पाहिजेत. - पुरुषोत्तम (मामा) लिमये, निवृत्त अधिकारी, चोळा पॉवर हाउस
पुलाला आताच जोड द्या : ठाकुर्लीतील रेल्वे टर्मिनसकडे थेट वाहन घेऊन जायचे असेल तर सध्याच्या काळात ते जसे कठीण आहे, तसेच भविष्यातही त्रासदायक होईल. सध्या उभारल्या जात असलेल्या पुलालाच ठाकुर्ली टर्मिनसच्या दिशेने जोडरस्ता किंवा उतार देण्याची गरज आहे.

Web Title: Let's mark the fifth day of the employers due to the train picket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.