ग्रामीणची आमदारकी पणाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 06:25 AM2017-11-13T06:25:52+5:302017-11-13T06:27:25+5:30

भिवंडी ग्रामीण हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार की भाजपा तो पुन्हा शिवसेनेकडून खेचून घेणार याचे गणित यावेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालातून समोर येणार असल्याने या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.

Legislative Legislature | ग्रामीणची आमदारकी पणाला 

ग्रामीणची आमदारकी पणाला 

Next
ठळक मुद्देभिवंडी तालुक्यात शिवसेनेला भाजपाचा शह दोन्ही काँग्रेस, मनसे, श्रमजीवीवर लक्ष

रोहिदास पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अनगाव : भिवंडी ग्रामीण हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार की भाजपा तो पुन्हा शिवसेनेकडून खेचून घेणार याचे गणित यावेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालातून समोर येणार असल्याने या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा असलेल्या भिवंडी तालुक्यातील ग्रामीण मतदारसंघावर कब्जा करण्यासाठी भाजपाने त्यांचा नेहमीचा ‘फोडा आणि राज्य करा’ हाच फॉर्म्युला वापरला आहे. त्याचवेळी शिवसेनेने दोन्ही काँग्रेस, मनसे, श्रमजीवी यांची मदत घेत भाजपाला धोबापछाड देण्याची तयारी चालवली आहे. 
भाजपाचा २५ वर्षांचा गड असलेल्या भिवंडी ग्रामीण मतदारसंघात नवखा, तुलनेने अपरिचित उमेदवार देत शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले. तेथील राजकारणावर शिवसेनेने प्रभाव निर्माण केला. तो प्रभाव अजून कायम आहे की नाही, हे दाखवण्यासाठी शिवसेनेची व्यूहरचना सुरू आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा दाखला देत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, श्रमजीवी यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत घेण्याची तयारी दाखवल्याची माहिती प्रकाश पाटील यांनी दिली. त्याचवेळी खासदार कपिल पाटील यांनी मात्र दोन्ही काँग्रेससह शिवसेना आणि अन्य पक्षांतील नेत्यांना फोडत भाजपाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे. भिवंडी ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून खेचून घेण्यासाठी या निवडणुकीतून भाजपाची चाचपणी सुरू आहे. भिवंडी तालुक्यात जो यश मिळवून देईल, तो भाजपाचा पुढील आमदारकीचा उमेदवार असेल, असे गाजर पक्षाने दाखवल्याने आमदारकीच्या स्पर्धेतील अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद-पंचायत समितीची निवडणूक भिवंडी तालुक्यासाठी तरी आमदारकीच्या स्पर्धेचे रणमैदान ठरणार आहे.  
शिवसेनेचे शांताराम मोरे यांचा आमदार म्हणून झालेला विजय भाजपाच्या जिव्हारी लागला होता. तेव्हापासूनच हा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी भाजपाने फिल्डींग लावली आहे. पराभवाचे उट्टे काढत या मतदारसंघातून पुढील निवडणुकीत शिवसेनेला कोण धक्का देईल, यासाठी वेगवेगळ्य़ा नावांची चर्चा सुरू आहे. पण पक्षात तेवढे वजनदार नाव नसल्याने भाजपाचे ठाणे विभागीय अध्यक्ष व खासदार कपिल पाटील यांनी शिवसेनेसह इतर पक्षांतील नेत्यांना पदाधिकार्‍यांना पक्षात प्रवेश दिला. राष्ट्रवादीचे महादेव घाटाल, शिवसेनेचे दशरथ पाटील या आमदारकीच्या स्पर्धेतील पदाधिकार्‍यांना पक्षात प्रवेश देत  पक्षातील जुन्या भाजपाच्या इच्छुकांना-निष्ठावंताना दणका दिला आहे. 
ठाणे जिल्हा परिषदेच्या १३ नोव्हेंबरच्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषदेचे २१ गट आणि पंचायत समितीचे ४२ गण आहेत. सर्वाधिक सदस्य भिवंडीतून निवडून जाणार असल्याने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार हे भिवंडी तालुका ठरवणार आहे. जो पक्ष येथे बाजी मारेल त्याचा विधानसभेचा मार्ग सूकर होणार असल्याने शिवसेना-भाजपामध्ये जोरदार चुरस आहे. 
भिवंडी पालिका निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मदतीला शिवेसना धावल्याने त्या दोन्ही पक्षांतील मैत्रीची चर्चा सुरू झाली. तशीच चर्चा मीरा-भाईंदर आणि मालेगावमध्येही रंगली. त्यामुले ग्रामीण भागातील राजकारणात भाजपाला रोखण्यासाठी हे दोन्ही पक्ष परस्परांना मदत करतील, असे मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे काम करणार की आतून भाजपाला मदत करणार याबाबत प्रचंड संदिग्धता आहे. त्यामुळे त्या पक्षाची प्रत्यक्ष मदत मिळाल्यावरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अन्य छोट्या पक्षांनीही भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाची धास्ती घेतल्याने तेही शिवसेनेच्या भाजपाविरोधी टीममध्ये सहभागी होतील, असा शिवसेनेच्या नेत्यांना विश्‍वास आहे. 
या निवडणुकीत युती करून जागावाटप केले तर आपल्या पक्षाचे नाव घेत दुसर्‍या पक्षासाठी मते कशी मागणार आणि पक्षाचे अस्तित्त्व संपण्याची धास्ती असल्याने एकत्र येणारे हे पक्ष युती-आघाडी न करता आतून परस्परांना मदत करण्याच्या तयारीत आहेत. 

पुन्हा धनुष्यबाण की कमळ फुलवण्याचे प्रयत्न?
भाजपात तर आतापासूनच निष्ठावंत आणि नवभाजपावाद्यांत स्पर्धा सुरू आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात २0१४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार शांताराम तुकाराम मोरे यांनी भाजपाचे शांताराम दुदाराम पाटील यांच्या पराभवाचा धक्का संघटनात्मकदृष्ट्या भाजपाच्या जिव्हारी लागला. पूर्वीच्या वाडा व नव्याने निर्माण झालेल्या भिवंडी विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवाराचा, खास करून विष्णू सवरा यांचा कधीही पराभव झाला नव्हता. पण त्याच भूमीत शिवसेनेने भाजपाला पराभवाची धूळ चारली. त्याची दखल घेत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी ठाणे ग्रामीणचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. 

तेव्हापासून या मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलवण्याची जय्यत  तयारी सुरू आहे. ती जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून येणार आहे.भाजपा आणि शिवसेनेत दोन्ही काँग्रेस, मनसे या पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. भाजपात आमदार होण्यासाठी पक्षातील पूर्वीचे नेते आणि आश्‍वासन देऊन नव्याने घेतलेल्या नेत्यांची भाऊगर्दी आहे, तर शिवसेनेत आमदार शांताराम मोरे यांनाच पुन्हा संधी मिळणार आहे. भाजपात शांताराम पाटील यांचे भाऊ दशरथ पाटील, महादेव घाटाल, संतोष पाटील इच्छुक आहेत. ते कामालाही लागले आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीत जो पक्षाला यश मिळवून देईल, त्याचा विचार आमदारकीसाठी करण्याचे पक्षनेतृत्त्वाने जाहीर केल्याने इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू आहे. भाजपातर्फे खासदार कपिल पाटील, जिल्हाप्रमुख दयानंद चोरघे, देवेश पाटील, पी. के. म्हात्रे, मोहन अंधेरे, श्रीकांत गायकर आदी पदाधिकार्‍यांची फौज निवडणुकीत उतरली आहे. जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे, तालुकाप्रमुख विश्‍वास थळे, देवानंद थळे, कुंदन पाटील, वाडा तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, उपजिल्हाप्रमुख अरु ण पाटील, मजूर फेडरेशनचे संचालक पंडित पाटील यांची फौज शिवसेनेतर्फे रणांगणात आहे.

बाजार समितीचा फॉर्म्युला
शिवसेना, दोन्ही काँग्रेस, मनसे, श्रमजीवी संघटना यांना एकत्र आणत बाजार समिती निवडणुकीत भाजपाला सत्तेपासन दूर ठेवल्याचा फॉर्म्युला जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत वापरणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले. 

भाजपाकडून युतीचे पिल्लू
शिवसेनेचे नेते स्पष्टपणे भाजपाविरोधात अन्य पक्षांना एकत्र आणणार असल्याचे सांगत असूनही भाजपाचे खासदार कपिल पाटील मात्र शिवसेनेशी युती करणार असल्याचे संकेत वारंवार देत आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत जाणार्‍या पक्षांत गोधळ उडावा, असाच त्यांचा हेतू असल्याचे राजकीय वतरुळात मानले जाते. 

Web Title: Legislative Legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.