Leading office-bearers, absence of co-ordination among workers | आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत दिसतो समन्वयाचा अभाव
आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत दिसतो समन्वयाचा अभाव

उल्हासनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संभाव्य उमेदवार बैठका घेत आहेत. याउलट, दुसरीकडे आघाडीचा उमेदवार जाहीर होऊनही या पक्षांची मध्यवर्ती कार्यालये ओस पडली असून आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वयही नसल्याचे चित्र दिसत आहे.

उल्हासनगरात पाच लाखांपेक्षा जास्त मतदार असून उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ अशा तीन विधानसभा क्षेत्रांत शहर विभागले आहे. शहरातून जास्तीतजास्त मतदान पडण्यासाठी विद्यमान खासदार व शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून शहराकडे लक्ष केंद्रित केले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ते शहरात तळ ठोकून होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असून तिथे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने बंड पुकारले आहे. त्याचा धागा पकडून शहर भाजपाने भिवंडीतील शिवसेनेचे बंड प्रथम मोडून काढा, नंतरच आम्ही प्रचाराला लागू, असे श्रीकांत शिंदे यांना सुनावले होते; मात्र शिंदे यांच्या भेटीगाठीने स्थानिक भाजपा नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा राग निवळला असून शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे यांच्या प्रचाराला लागल्याचे चित्र आहे.

शिवसेनेने मराठा सेक्शन व गोलमैदान परिसरात मध्यवर्ती निवडणूक कार्यालय थाटले असून कार्यालय शिवसैनिकांनी बहरून गेले. भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडणूक विशेष बैठका होत आहेत; मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे खेमानी-कलानी महल येथील व काँग्रेसचे नेहरू चौकातील मध्यवर्ती कार्यालय ओस पडल्याचे चित्र आहे. काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतिया यांनी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार पूर्ण ताकदीनिशी करणार असल्याचे सांगितले असून शहरातून सर्वाधिक मतदान राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना मिळण्याचे संकेत राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्ष आमदार ज्योती कलानी यांनी दिले आहेत.

बुथ एजंटची वानवा
सेना-भाजपा युतीने प्रत्येक बुथ कार्यकर्त्याची बैठक यापूर्वीच घेतली आहे; मात्र त्यातुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी कमी पडत असल्याची चर्चा आहे. आघाडीचीही तयारी सुरू असून कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असल्याचे काँगे्रस शहर जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतिया, पदाधिकारी किशोर धडके, कुलदीपसिंग माथारू, राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती कलानी, पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी सांगितले.


Web Title: Leading office-bearers, absence of co-ordination among workers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.