Launch of Dombivli-Panvel Bus: From Kopar | डोंबिवली-पनवेल बसचा शुभारंभ: कोपरहून सुटणार
डोंबिवली-पनवेल बसचा शुभारंभ: कोपरहून सुटणार

ठळक मुद्देलवकरच अन्यत्र मार्गावर सेवा देणार- सभापती पावशे

कल्याण: अपु-या बस आणि चालक-वाहकांची कमतरता यामुळे बंद झालेली केडीएमसीची परिवहन उपक्रमाची डोंबिवली-पनवेल बस शुक्रवारी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. सभापती संजय पावशे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना सदस्यांसह मनसेच्या सदस्याने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. परंतू पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेल्या बस शुभारंभ कार्यक्रमाला भाजपच्या पाचही सदस्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले.
प्रवाशांच्या मागणीनुसार तीन वर्षापुर्वी डोंबिवली-पनवेल बस केडीएमटी उपक्रमाने सुरू केली होती. परंतू पुढे कालांतराने ती बंद पडली. परिवहन सदस्य संतोष चव्हाण यांनी ही बस चालू करावी यााबाबत पाठपुरावा केला होता. दरम्यान ही बस शुक्रवारी पुन्हा सुरू झाल्याने चव्हाण यांनी परिवहन उपक्रमाचे प्रभारी व्यवस्थापक उपायुक्त सुरेश पवार यांचे आभार मानले आहेत. सभापती पावशे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बस ला हिरवा कंदील दाखविण्यात आला. यावेळी शिवसेनेचे परिवहन सदस्य संतोष चव्हाण यांच्यासह मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव, राजीव दिक्षित, मनसेचे प्रल्हाद म्हात्रे आदिंसह शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा डोंबिवली विधानसभा संघटक तात्या माने, उपक्रमाचे अधिकारी उपस्थित होते.

बसची मार्ग क्रमिका व फेरी

कल्याण शीळ फाटा मार्गे ही बस चालविली जाणार आहे. पहिली बस सकाळी ८ ला सुटणार आहे. पुढे सकाळी ९, ११:३५, दुपारी १२:३५, सायंकाळी ४:२०, ५:२०, रात्रौ ७:५५ आणि ९:५५ अशी ही बस डोंबिवली ते पनवेल धावणार आहे. तर पनवेलहून पहिली बस सकाळी ९:३५, १०:३५, दुपारी १:२०, २:२०, सायंकाळी ५:५५, ६:५५, रात्रौ ९:३०, १०:३० अशी चालणार आहे. तर डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोड परिसरातून ही बस सुटेल तेथून ती चाररस्ता, गांवदेवी मंदिर, शिवाजी उद्योगनगर, स्टार कॉलनी, सागांव, पिंपळेश्वर, मानपाडा, प्रिमीयर कॉलनी, पाईपलाईन, काटई, लोढा, देसईगांव, म्हात्रेवाडी, उत्तरशिव फाटा, दहिसर मोरी, तळोजा रेल्वे स्थानक, नावडे फाटा, कळंबोली कॉलनी, आसुड गांव, पनवेल बस स्थानक आणि पनवेल रेल्वे स्थानक अशी ही बस धावेल.

लवकरच अन्यत्र मार्गांवर बस चालविणार

डोंबिवली-पनवेल ही बस कोपरहून सुटेल. लवकरच अन्यत्र मार्गावरही बस चालु करण्यात येणार आहे. डोंबिवली पश्चिमेला तीन बस चालू करण्यात येणार आहे. परंतू रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने थोडा विलंब लागतोय असे सभापती संजय पावशे म्हणाले. 


Web Title: Launch of Dombivli-Panvel Bus: From Kopar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.