केडीएमसी निवडणूक : युतीची पोळी, की ठाकरेबंधूंची टाळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 11:54 PM2019-02-11T23:54:59+5:302019-02-11T23:56:31+5:30

केडीएमसीतील परिवहन समिती सदस्यांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तीन उमेदवारांसह भाजपाचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. संख्याबळानुसार भाजपाचे दोन सदस्य निवडले जाऊ शकतात.

KDMC elections: Alliance of coalition, that's the thackeray | केडीएमसी निवडणूक : युतीची पोळी, की ठाकरेबंधूंची टाळी!

केडीएमसी निवडणूक : युतीची पोळी, की ठाकरेबंधूंची टाळी!

googlenewsNext

कल्याण : केडीएमसीतील परिवहन समिती सदस्यांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तीन उमेदवारांसह भाजपाचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. संख्याबळानुसार भाजपाचे दोन सदस्य निवडले जाऊ शकतात. मात्र, दररोज भाजपावर तोंडसुख घेणारी शिवसेना भाजपाचा तिसरा उमेदवार विजयी व्हावा, याकरिता मदत करून युतीची पोळी भाजणार की, मनसेच्या उमेदवाराला विजयी होण्याकरिता साथ देऊन भाजपाविरोधात ठाकरेबंधू एकमेकांना टाळी देणार, याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
केडीएमसीतील पक्षीय बलाबलानुसार, शिवसेनेचे ५५ सदस्य आहेत. त्यामुळे परिवहन समितीवर त्यांचे तीन सदस्य सहज निवडून जातात. भाजपाचे संख्याबळ ४७ आहे. त्यामुळे त्यांचे दोन सदस्य निवडून जातात. त्यांचा तिसरा सदस्य विजयी होण्याकरिता त्यांना शिवसेनेकडील अतिरिक्त मतांची गरज आहे. परिवहन समितीत शिवसेना व भाजपाचे प्रत्येकी तीन सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. सध्या स्थायी समितीचे सभापतीपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेचे चार सदस्य आहेत. आता भाजपाचे दोनऐवजी तीन सदस्य समितीमध्ये गेल्यास समितीच्या सदस्यांची संख्या समसमान होईल. साहजिकच, प्रत्येकवेळी निर्णय घेताना स्थायी समिती अध्यक्षांचे निर्णायक मत गरजेचे ठरू शकते. सध्या शिवसेना भाजपाला खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडत नाही. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे हातमिळवणी करून भाजपाचा तिसरा सदस्य निवडून आणणार का, याचीही चर्चा सध्या सुरू आहे.
दुसरीकडे मनसेचा उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीने समितीवर जाऊ पाहत आहे. राज्यात भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्याचे दोन्ही काँग्रेस, मनसे यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना मनसेचा सदस्य परिवहन समितीवर येण्याकरिता सहकार्य करून भाजपाला कात्रजचा घाट दाखवणार का, अशी चर्चा आहे. शिवसेनेने मनसेला साथ दिल्यास भाजपाविरोधात ठाकरेबंधूंनी परस्परांना टाळी दिली, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.

बंडोबा झाले थंडोबा, सेनेच्या भूमिकेकडे मनसेचे लक्ष
कल्याण पूर्वेतील शाखाप्रमुख गणपत घुगे यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबावतंत्र अवलंबले जाण्याची शक्यता व्यक्त करणारे ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरून सोमवारी घुगे यांनी अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे गजानन व्यापारी यांनीही माघार घेतली. दोघांनी अर्ज मागे घेतल्याने येत्या शुक्रवारी, दि. १५ फेब्रुवारीला परिवहन समितीच्या सहा जागांसाठी पार पडणाऱ्या निवडणुकीत सात उमेदवार उभे ठाकले आहेत.
शिवसेनेचे सुनील खारूक, अनिल पिंगळे, बंडू पाटील तर भाजपाचे संजय मोरे, स्वप्नील काठे, दिनेश गोर, मनसेचे मिलिंद म्हात्रे हे सात उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहेत. काँगेसच्या उमेदवाराने माघार घेतल्याने त्याचा लाभ मनसेला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना काय करते, याकडे मनसे मोठ्या आशेने पाहत आहे.
आपल्यावर कोणाचाही दबाव नाही, असा दावा करणाºया घुगे यांनी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होताच केडीएमसी मुख्यालयात येऊन माघार घेत असल्याचे पत्र सचिव संजय जाधव यांना सादर केले. ज्यावेळेस ते सचिव कार्यालयातून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या चेहºयावरील नाराजी स्पष्ट दिसत होती. त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले.
कालांतराने घुगे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता पक्ष आदेश पाळल्याचे सांगत २०२० मध्ये पार पडणाºया परिवहनच्या सहा जागांच्या निवडणुकीत संधी दिली जाईल, असे आश्वासन पक्षाकडून दिल्याचे सांगितले. घुगे यांच्या बंडखोरीला पाठिंबा देणारे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. काँग्रेसचे उमेदवार गजानन व्यापारी यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला असून पक्ष आदेशाचे पालन केल्याचे सांगितले.

वंजारी समाज सेनेवर नाराज
कल्याण वंजारी समाज सेवा मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबवणाºया घुगेंच्या उमेदवारीला वंजारी समाजाचा पाठिंबा मिळाला होता. परंतु, घुगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वंजारी समाज नाराज झाला असून सायंकाळी पूर्वेकडील भागात समाजाच्या पार पडलेल्या बैठकीत शिवसेना पक्षाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. घुगेंना शिवसेनेने माघार घ्यायला लावल्याने वंजारी समाजाची नाराजी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत सेनेला भोवण्याची शक्यता आहे.

Web Title: KDMC elections: Alliance of coalition, that's the thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.