कल्याण लोकसभा मतदारसंघ: मनसे कार्यकर्त्यांना आदेशाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 12:41 AM2019-03-15T00:41:08+5:302019-03-15T00:41:25+5:30

निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक

Kalyan Lok Sabha Constituency: MNS workers wait for the order | कल्याण लोकसभा मतदारसंघ: मनसे कार्यकर्त्यांना आदेशाची प्रतीक्षा

कल्याण लोकसभा मतदारसंघ: मनसे कार्यकर्त्यांना आदेशाची प्रतीक्षा

googlenewsNext

- मुरलीधर भवार

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते उत्सुक आहेत; मात्र पक्षाकडून आदेश मिळाला नसल्याने कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे. मनसे २० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे. तोपर्यंत कार्यकर्त्यांना धीरानेच घ्यावे लागणार आहे.

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी विरोधी पक्षात आहे; मात्र विरोधकाची भूमिका खऱ्या अर्थाने मनसेनेच बजावली. भाजपासोबत सत्तेत असतानाही शिवसेना नेहमीच विरोध करत राहिली; मात्र निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपाची युती झाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने मनसे हाच भाजपाचा मुख्य विरोधी पक्ष राहिला. मनसेने निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. त्यात मोदी सरकारला व राज्यातील भाजपा सरकारला नामोहरम करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले. निवडणुकीसाठी पक्षाने चांगली तयारी केली असल्याचे सांगण्यात येत होते.

कल्याण-डोंबिवलीवर ठाकरे यांचे जास्त प्रेम आहे. २००९ मध्ये मनसेने येथे प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी कल्याण पश्चिम व ग्रामीण मतदारसंघातून पक्षाचे दोन आमदार निवडून आले होते. राज्यातून या पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये वैशाली दरेकर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून डी.के. म्हात्रे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी दोघांचा विजय झाला नसला, तरी त्यांना प्रत्येकी एक लाख मते पडली होती. २०१४ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना राजू पाटील यांनी जवळपास एक लाख ४० हजार मते मिळवली. त्यांचा पराभव झाला; मात्र पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. यावेळीही शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ते सक्षम उमेदवार ठरू शकतात, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. मनसेचे लोकसभा निवडणूक लढवणे निश्चित नव्हते. मात्र, पक्षप्रमुखांचा आदेश असेल तर नक्की लढवू. त्यासाठी आमची तयारी असल्याचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले.

‘एकला चलो रे’ची भूमिकाच योग्य
डोंबिवली : मनसे हा शिवसेनेतून फुटून उभा राहिलेला स्वतंत्र पक्ष आहे. या पक्षात बहुतांश शिवसैनिक, हिंदुत्वाला मानणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशा स्थितीत लोकसभेसाठी आघाडीला साथ देणे योग्य नसून ही एक प्रकारे राजकीय आत्महत्याच म्हणावी लागेल, असा सूर कल्याण-डोंबिवलीतील मनसैनिकांमधून व्यक्त होत आहेत. मनसेचा पूर्वीपासूनचा ‘एकला चलो रे’चा नारा योग्य असून या निवडणुकीतही पक्षाने तेच धोरण कायम ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे १० नगरसेवक आहेत, त्याआधी २७ होते. आता पक्षश्रेष्ठींनी आघाडीसोबत जाण्याचा विचार केला, तर आगामी विधानसभा आणि त्यापाठोपाठ येणाºया महापालिका निवडणुकीत मतदारांसमोर जाताना स्थानिक उमेदवारांसमोर मोठा पेच होऊ शकतो. मुळातच कल्याण-डोंबिवली हा जनसंघाचा बालेकिल्ला आहे. सद्य:स्थितीला येथे युतीचे चार आमदार असून विद्यमान खासदारही युतीचेच आहेत. अशा स्थितीत मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आदी भागांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून तिथे मनसेला अच्छे दिन आलेले आहेत. लोकसभेत सहभाग न घेण्याचा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णयही स्वागतार्ह आहे. पण, आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेऊ नये, असे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
मनसेच्या नगरसेवकांचा त्यांच्या प्रभागांमध्ये पक्षापेक्षाही स्वत:चा ठसा जास्त असल्याने ते निवडून आल्याची पक्षांतर्गत चर्चा आहे. त्यामुळे आघाडीसोबत जाऊन पुढील निवडणुकीत स्वत:चे स्थान डळमळीत करणे पक्षाच्या नगरसेवकांनाही मान्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याऐवजी तटस्थ भूमिका घेऊन विधानसभेमध्ये योग्य तो निर्णय घेणे महत्त्वाचे असल्याची त्यांची भावना आहे.
स्थानिक पातळीवर पक्षामध्ये गटातटांचे राजकारण सुरू आहे. त्यामुळेही पक्षामध्ये धुसफूस सुरू असताना पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे गोंधळ वाढू शकतो. त्याचा फटकादेखील पक्षालाच बसणार असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Kalyan Lok Sabha Constituency: MNS workers wait for the order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.