जितेंद्र आव्हाड हे तर फार जुने मित्र - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 03:15 AM2018-08-14T03:15:10+5:302018-08-14T03:15:36+5:30

जितेंद्र आव्हाड हे माझे जुने आणि फार पूर्वीपासूनचे मित्र आहेत. त्यांच्या मतदारसंघातील कळवा, मुंब्य्राच्या विकासाच्या फाइल असतील, त्या कधीच थांबवून ठेवल्या नाहीत. कामाला मंजुरी आम्ही दिली तरी आव्हाडांना बॅनरबाजी चांगलीच जमते, ते त्यात हुशार आहेत, अशा कोपरखळ्या सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी लगावल्या.

 Jitendra Awhad is my old friend - Eknath Shinde | जितेंद्र आव्हाड हे तर फार जुने मित्र - एकनाथ शिंदे

जितेंद्र आव्हाड हे तर फार जुने मित्र - एकनाथ शिंदे

Next

ठाणे : जितेंद्र आव्हाड हे माझे जुने आणि फार पूर्वीपासूनचे मित्र आहेत. त्यांच्या मतदारसंघातील कळवा, मुंब्य्राच्या विकासाच्या फाइल असतील, त्या कधीच थांबवून ठेवल्या नाहीत. कामाला मंजुरी आम्ही दिली तरी आव्हाडांना बॅनरबाजी चांगलीच जमते, ते त्यात हुशार आहेत, अशा कोपरखळ्या सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी लगावल्या. त्यावर लागलीच आव्हाड यांनी शिंदे, तुम्ही आहात म्हणून आम्हाला कशाची फिकीर नाही. मात्र, आम्ही केलेल्या कामांचे श्रेय दुसरे घेत असतील, तर त्यासाठी बॅनरबाजी हाच पर्याय असल्याचे प्रत्युत्तर दिले. या दोन्ही नेत्यांच्या गुफ्तगूची चर्चा सुरू असताना त्यांनी जाहीरपणे परस्परांवर उधळलेली स्तुतिसुमने व एकमेकांना दिलेल्या कोपरखळ्या हाही चर्चेचा विषय ठरला आहे.
ठाण्याचे पालकमंत्री शिंदे आणि राष्टÑवादीचे आ. आव्हाड यांच्या अगदी अलीकडेच दोनवेळा भेटीगाठी झाल्या व त्यांनी बंद दरवाजाआड चर्चा केल्याची चर्चा रंगली होती. सोमवारी पारसिक चौपाटी येथील सेवारस्त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते दोघे पुन्हा एकत्र आले. यावेळी एकमेकांनी केलेली स्तुती पाहता येत्या काळात ठाण्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची चिन्हे पुन्हा जोर धरू लागली आहेत.
रेतीबंदर विसर्जन घाट ते मुंब्रा बायपास या मुख्य रस्त्याच्या बाजूला नव्याने तयार करण्यात आलेल्या सेवारस्त्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी दुपारी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे निमंत्रण ऐनवेळी दिल्याने आव्हाड नाराज होते. त्यांनी पत्रकार परिषदेत आपली नाराजी जाहीरपणे प्रकट केली. आपण केलेल्या कामाची उद्घाटने सत्ताधारी शिवसेना आणि पालकमंत्री शिंदे करत असल्याची टीका त्यांनी लोकार्पण सोहळ्याच्या अर्धा तास अगोदर केली. शहरातील विविध विकासकामांसंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठका होतात. मात्र, विरोधी पक्षाच्या स्थानिक आमदारांना या बैठकांना कधीच बोलावले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्या सेवारस्त्याचे लोकार्पण केले जात आहे, त्याचा पाठपुरावा आपणच केला होता. मात्र, तरीही या कार्यक्रमाला आपल्याला बोलवण्यात आले नसल्याची खंत आव्हाड यांनी व्यक्त केली.
प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी पालकमंत्री शिंदे यांनी तोच धागा पकडून आम्ही कळवा, मुंब्य्राच्या विकासाच्या फाइल कधीच थांबवून ठेवल्या नसल्याचे सांगितले. यावर आव्हाडांनी तुम्ही आहात म्हणून आम्हाला कशाची फिकीर नसल्याची कोपरखळी लगावली. आव्हाडांना बॅनरबाजी चांगलीच जमते, ते त्यात हुशार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. यावर आम्ही केलेल्या कामांचे श्रेय दुसरे घेत असेल, तर त्यासाठी हा पर्याय पत्करावाच लागतो, असे प्रत्युत्तर आव्हाडांनी दिले.
पालकमंत्र्यांनी ठाण्यात होत असलेल्या आणि होऊ घातलेल्या विविध प्रकल्पांचे तोंडभरून कौतुक केले. या कामांचे सर्व श्रेय हे पालिका प्रशासन आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनाच असल्याचे सांगितले. त्यामुळे आयुक्त जयस्वाल ठाण्यातच राहावेत, म्हणून तसा एकमुखी ठराव करा, अशी सूचना आव्हाडांनी केली.

कार्यक्रमाच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आव्हाडांचे बॅनर झळकत होते. यावर आपल्यामुळेच हे काम झाल्याचे त्यांनी जाहीर केले होते. बॅनरवर शरद पवार, आव्हाड आणि महापालिका आयुक्तांचेच छायाचित्र होते. हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरले होते. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणामध्ये आव्हाडांच्या या बॅनरबाजीवर चांगलेच फटके लावले.

Web Title:  Jitendra Awhad is my old friend - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.