Jaswandi, Mogra went 'Bhokhokhane' | जास्वंदी, मोगरा गेला ‘भावखाऊन’
जास्वंदी, मोगरा गेला ‘भावखाऊन’

- मुरलीधर भवार 
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या फुलबाजारात गणेशोत्सवानिमित्त बुधवारी तुफान गर्दी उसळली होती. फुलांचे दर दररोजच्या तुलनेत बºयापैकी चढे असले, तरी सर्वाधिक ‘भावखाऊन’ गेलाय तो मोगरा. गणेशमूर्तीच्या मुकुटावर शोभून दिसणारे जास्वंदीचे फुल चांगलेच महागले आहे. अर्थात दर चढे असले, तरी भाविकांनी कोट्यवधी रुपयांच्या फुलांची खरेदी केली.
फुलविक्रेते विलास कसबे यांनी सांगितले की, फुलांचे भाव फारसे वाढलेले नाही. पण, या मोसमात मोगºयाची फुले कमी येतात. त्यामुळे स्थानिक फुलशेती करणाºयांकडून मोगरा कमी येतो. गणेशोत्सवासाठी बाजारात बंगळुरू व हैदराबाद येथून मोगरा विक्रीसाठी आला आहे. गणेशोत्सवापूर्वी मोगºयाचा दर एक किलोला ३०० ते ४०० रुपये होता. आज बाजारात त्याच मोगºयाची फुले १५०० ते १६०० रुपये किलो दराने विकली गेली. मोगरा सर्व फुलांच्या तुलनेत भावखाऊन गेला आहे. गणेशाला जास्वंदीचे फुल आवडते. त्यामुळे जास्वंदी फुलाची एक पुडी ४०० रुपये दराने विकली गेली. एका पुडीत ६० जास्वंदीच्या कळ्या होत्या. जास्वंदी फुलाला एरव्ही इतकी मागणी नसते. चायनीज गुलाब हा १२० रुपये दराने विकला गेला. साध्या गुलाबाचा भाव एका डझनला ५० ते ६० रुपये होता. काल आणि आज फुलांचा बाजार तेजीत होता. आणखी दोनतीन दिवस बाजारात फुलांचे दर चढे राहतील.
फुलविक्रेते नितीन तांबे यांनी सांगितले की, यंदा फुलांच्या भावात फार वाढ झालेली नाही. यंदा बाजारात आवक चांगली असल्याने मोठी भाववाढ नाही. मागच्या वर्षी पावसामुळे फुले भिजलेली आली होती. त्यामुळे मागच्या वर्षी फुलांचे दर जास्त होते व दर्जाही तितकासा चांगला नव्हता.
>फुलांचे दर
झेंडू- ३० ते ४० रुपये किलो
शेवंती- १०० ते १२० रुपये किलो
गुलछडी- २४० रुपये किलो
अष्टर- १०० ते १२० रुपये किलो
जरबेरा- ५० ते ६० रुपये एक बंडल
लीली- ४०० रुपये एक बंडल
चायनीज गुलाब- १०० ते १२० रुपये २० नग
साधा गुलाब- ५० ते ६० रुपये एक डझन
जास्वंदी- ४०० रुपये एक पुडी (६० कळ्या)
मोगरा- १५०० ते १६०० रुपये किलो


Web Title: Jaswandi, Mogra went 'Bhokhokhane'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.