नाट्यगृहांमध्ये रंगताहेत गैरसोयींचे ‘प्रयोग’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:03 AM2019-07-22T00:03:13+5:302019-07-22T00:03:30+5:30

समस्यांची भरमार : प्रेक्षकांसह कलाकारांनी व्यक्त केली नाराजी, भरत जाधवांच्या व्हिडीओने दिला उजाळा

Inauspicious use of inexpensive 'use'! | नाट्यगृहांमध्ये रंगताहेत गैरसोयींचे ‘प्रयोग’!

नाट्यगृहांमध्ये रंगताहेत गैरसोयींचे ‘प्रयोग’!

Next

ठाणे : ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहांमध्ये समस्यांची वानवा नाही. या समस्या कलाकारांसह प्रेक्षकांनी वेळोवेळी चव्हाट्यावर आणल्या. मात्र, त्याची तीव्रता तेवढ्यापुरती दिसते. सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांनी शनिवारी घाणेकर नाट्यगृहातील गैरसोयींचा ‘प्रयोग’ फेसबुकवर व्हिडीओच्या माध्यमातून सादर केल्यानंतर ठाण्यासारख्या सांस्कृतिक शहरातील या गंभीर समस्यांना पुन्हा उजाळा मिळाला.

ठाण्यातील दोन्ही नाट्यगृहांच्या समस्यांवर साहित्यिक - सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींनी ताशेरे ओढले आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगह या ना त्या कारणाने सातत्याने बंद असते. या ठिकाणी अद्याप साध्या कॅन्टीनची व्यवस्थाही केलेली नाही. गडकरी रंगायतन असो वा घाणेकर नाट्यगृह, दोन्ही ठिकाणी दुर्गंधीयुक्त प्रसाधनगृहे प्रेक्षकांच्या पाचवीलाच पुजलेली असतात. दोन्ही नाट्यगृहांतील सुरक्षारक्षकांकडून मिळणाऱ्या उर्मट वागणुकीवर प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

सांस्कृतिक शहर म्हणून ठाणे शहराची ओळख आहे. गडकरी रंगायतननंतर या शहरात डॉ. काशिनाथ नाट्यगृह उभे राहिले. परंतु, या दोन्ही नाट्यगृहांमध्ये कोणतीही दुरुस्ती कायमस्वरुपी न करता, केवळ तात्पुरत्या स्वरूपाची केली जाते. गेल्या काही वर्षांपासून छत कोसळणे, पाणी गळणे, मिनी थिएटर्सची दुरुस्ती अशा या ना त्या कारणांवरून घाणेकर नाट्यगृह दोन - तीन महिने सलग बंद ठेवले जाते. पालिका प्रशासनाकडूनही याबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने ठाण्यातील कलाकारांनी याबाबत वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. या दोन्ही नाट्यगृहांतील मेकअप रूममधील तसेच प्रेक्षकांसाठी असलेल्या प्रसाधनगृहांमध्ये दुर्गंधी आहे. घाणेकर नाट्यगृहात तर समस्यांची जंत्रीच आहे, असा आरोप कलाकारांकडून केला जात आहे. दोन्ही नाट्यगृहांत अतिरिक्त असलेल्या सुरक्षारक्षकांवरून दिग्दर्शक विजू माने यांनी अलीकडेच मुद्दा उपस्थित केला होता. पालिकेच्या सुरक्षारक्षकांपेक्षा आताचे मिलिटरीच्या कपड्यांमध्ये असलेले सुरक्षारक्षक प्रेक्षकांना घाबरविण्यासाठी ठेवलेत की काय, असा प्रश्न ठाणेकरांकडून केला जात आहे. हे सुरक्षारक्षक दमदाटी करून उद्धट वागणूक देत असतात, अशा तक्रारी प्रेक्षकांकडून केल्या जात आहेत. गडकरी रंगायतनच्या दरवाजांची अत्यंत दुरवस्था झाली असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची नीट दुरुस्तीही केली जात नाही. २०११ साली घाणेकर नाट्यगृह उभे राहिले. मग, इथे कॅन्टीन का नाही, असा प्रश्न विजू माने यांनी केला आहे. दोन्ही ठिकाणी पार्किंगच्या नावाने बोंब असल्याची नाराजीही साहित्यिक-सांस्कृतिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

घाणेकरमधील मुख्य नाट्यगृहात एखादा कार्यक्रम, नाटक सुरू असेल, तर त्याचा आवाज मिनी थिएटरमध्ये ऐकू येतो. रंगायतनमध्ये पार्किंगची मोठी समस्या आहे. मनोरंजनकर भरून पण योग्य सोयीसुविधा मिळत नाहीत. पालिकेचा किंवा एखादा राजकीय कार्यक्रम असेल, तर आम्हाला तारखाही मिळत नाही. रंगायतनशी भावनिकदृष्ट्या जोडले गेल्याने येथे प्रयोग करायला मजा येते. परंतु, तांत्रिक समस्या भरपूर आहेत. घाणेकरमध्ये टेक्निकल टीम जेथे बसते, तेथील आणि रंगमंच यातील अंतर भरपूर आहे. पहिल्या दोन रांगेत बसणाºया प्रेक्षकांना मान वर करून रंगमंचावरचे प्रयोग, कार्यक्रम पाहावे लागतात. त्यामुळे प्रेक्षक पहिल्या दोन रांगा सोडून मागच्या रांगेतच बसणे पसंत करतात. - संपदा जोगळेकर, अभिनेत्री

दोन्ही नाट्यगृहांत होणाºया नाटकांपेक्षा जास्त भाडे हे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना आकारले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम हे व्यावसायिक नसल्याने उलट त्यात सूट दिली पाहिजे. प्रत्येक वर्षी दोन ते तीन महिने नाट्यगृह या ना त्या कारणाने बंद ठेवण्याची प्रथा तातडीने बंद व्हावी. पूर्वी रंगायतनमध्ये कलेशी संबंधित व्यवस्थापक असायचा. आता मात्र कलेविषयी आस्था नसलेली माणसे इथे आहेत.
- अशोक बागवे, ज्येष्ठ कवी

घाणेकरमध्ये कडीकोयंड्यांपासून समस्यांची जंत्रीच आहे. एसीचे रिमोट उपलब्ध नसतात. रंगायतनमधील वरच्या मेकअप रूमची अत्यंत दुरवस्था झाली आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली फक्त खुर्च्याच बदलल्या जातात. मेकअप रूमच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले जाते. घाणेकरमध्ये पहिल्या वर्षीपासून पाणीगळतीची समस्या आहे, ती अजून सुटलेली नाही. आणखी पाच वर्षांत हे नाट्यगृह ओसाड होणार आहे. पार्किंगच्या ठिकाणी पाणी साचलेले असते. या नाट्यगृहात अमुुुक इथे आहे, हे दर्शविणारे नामफलक ठळकपणे दिसतही नाही. पालिका प्रशासनाला या दोन्ही नाट्यगृहांची देखभाल दुरुस्ती जमत नसेल, तर त्याचे खाजगीकरण करावे. घाणेकरमधील व्हीआयपी लिफ्ट दर तीन महिन्यांनी बंद असते. - विजू माने, दिग्दर्शक

घाणेकर नाट्यगृह सातत्याने बंद ठेवले जाते. या गोष्टीकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. - अशोक समेळ, ज्येष्ठ नाटककार

Web Title: Inauspicious use of inexpensive 'use'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.