Illegal slaughter of big trees in Kashimira area; Avoid to file criminal cases | काशिमीरा भागात मोठ्या झाडांची बेकायदा कत्तल; पालिकेची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ  

मीरारोड : काशिमीरा भागातील पांडुरंग वाडी येथील मोठया झाडांची बेकायदेशीर पण कत्तल करण्यात आल्याचा प्रकार स्थानिक भाजपा नगरसेविकेने महापालिकेस लेखी तक्रारी द्वारे कळवुन देखील पालिकेकडून गुन्हा दाखल करण्यास टोलवाटोलवी केली जात आहे. कारवाई झाली नाही तर धरणं धरु असा इशारा नगरसेविकेने दिलाय.

पेणकरपाड्या जवळ असलेल्या पांडुरंग वाडीत काकड पॅरेडाईज मार्गावर मोठ मोठी हिरवीगार झाडं होती. सोमवारी स्थानिक भाजपा नगरसेविका वीणा भोईर यांना स्थानिक रहिवाशां कडुन येथील मोठी झाडं तोडण्यात येत असल्याची तक्रार आली. 

भोईर ह्या घटनास्थळी गेल्या असता तेथे झाडं कापण्याच्या कटरने मोठी ७ ते ८ झाडं कापण्यात आल्याचे दिसुन आले. त्या ठिकाणी झाडांच्या लाकडांचे तुकडे करुन ठेवले होते व ते नेण्यासाठी मोठा टॅम्पो देखील होता. भोईर यांनी झाडं कापणारयाांना पालिकेची परवानगी विचारली असता ती दाखवली नाही. 

भोईर यांनी या प्रकरणी पालिका आयुक्त बी.जी.पवार सह सबंधित अधिकारयांना संपर्क करुन झाडं तोडण्यात आल्याचा प्रकार सांगीतला. दरम्यान झाडं कापणारे मजुर व सबंधित लोकं कटर, टॅम्पो आदी सोडुन पळुन गेले. 

पालिका आयुक्तांसह उपायुक्त डॉ. संभाजी पानपपट्टे यांना लेखी तक्रार दिली असता पानपट्टे यांनी उद्यान अधिक्षक हंसराज मेश्राम यांना घटनास्थळाची पाहणी करुन चौकशी करा व तत्काळ गुन्हा दाखल करा असे निर्देश देखील दिले. 
तर मेश्राम यांनी घटनास्थळी पाहणी केली परंतु टॅम्पो, कटर आदी साहित्य जप्त करुन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ चालवल्याचा आरोप वीणा भोईर यांनी केलाय. 

पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी आमचे मुख्यमंत्री झाडं लावा झाडं जगवा अशी मोहिम राबवत असताना दुसरी कडे अशा मोठमोठ्या डेरेदार झाडांची बेकायदा कत्तल कोणी करत असेल तर कारवाई झालीच पाहिजे असं भोईर म्हणाल्या. 

उष्णतेच्या झळा आता पासुनच तिव्र होऊ लागल्या असुन थंडाव्यासाठी झाडांची नितांत गरज आहे. शिवाय प्रदुषणकारी कार्बन शोषुन आॅक्सीजन मिळतो. विविध जातीचे पक्षी, जीवांचा निवारा झाडांवर असतो. पर्यावरणासह नागरीकांसाठी झाडं ही उपयुक्त असुन पालिकेने कारवाई केली नाही तर धरणं धरु असा इशारा भोईर यांनी दिलाय. 


Web Title: Illegal slaughter of big trees in Kashimira area; Avoid to file criminal cases
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.