नरेंद्र मोदींसाठी केलेल्या मतदानाचा विचारेंना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 01:04 AM2019-05-27T01:04:58+5:302019-05-27T01:05:26+5:30

ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून खासदार राजन विचारे यांनी ६९ हजार २६८ मतांची आघाडी घेतली आहे.

The idea of voting for Narendra Modi is advantageous | नरेंद्र मोदींसाठी केलेल्या मतदानाचा विचारेंना फायदा

नरेंद्र मोदींसाठी केलेल्या मतदानाचा विचारेंना फायदा

Next

- धीरज परब
ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून खासदार राजन विचारे यांनी ६९ हजार २६८ मतांची आघाडी घेतली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा विचारेंना या मतदारसंघातून मिळालेल्या मतांमध्ये तब्बल २७ हजार मतांची वाढ झाली आहे. यात भाजपच्या स्थानिकांनी केलेल्या प्रचारापेक्षा गुजरात, राजस्थानवासीयांसह उत्तर भारतीय व जैन मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहूनच मतदान केल्याचे स्पष्ट दिसत आहे. विधानसभेत शिवसेनेशी युती नसताना २०१४ मध्ये भाजपचे नरेंद्र मेहता यांनी तत्कालीन आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा ३२ हजार मतांनी पराभव केला होता. आता सेनेशी युती असून मेंडोन्साही सेनेतच आहेत. शिवाय, या विधानसभा मतदारसंघात भाजपचे तब्बल ४२ नगरसेवक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचा वरचष्मा आहे. असे असले तरी भाजपच्या इच्छुक गीता जैन आणि मेंडोन्सा यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याचे शरद पवारांनी जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसचे मुझफ्फर हुसेनही भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती झाल्यानंतर आमदार मेहतांनी विचारेंना एक लाख मतांची आघाडी मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली होती. सुरुवातीला भाजपकडून विचारेंच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली. पण, भाजपच्या नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख नेत्यांना प्रचारासाठी अर्थपूर्ण साहित्य न मिळाल्याने भाजपने प्रचारातून अंग काढून घेतले की काय, असे वाटू लागले. पण, सेनेच्या वरिष्ठांनी भाजपच्या नगरसेवक व प्रमुख मंडळींची आपुलकीने विचारपूस केल्यावर भाजपकडून प्रचाराला सुरुवात झाली. पण, त्यातही फारसा उत्साह नव्हता. सेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी जमेल तेवढे काम केले.
त्यातही, मीरा-भार्इंदरमध्ये मोठ्या संख्येने असलेले गुजराती, राजस्थानी, उत्तर भारतीय तसेच जैन मतदारांना विचारेंबद्दल नाराजी असली, तरी मोदींसाठी म्हणून त्यांनी उत्स्फूर्त मतदान केले. त्यामुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदर मतदारसंघातून विचारेंना एक लाख ३३ हजार ९८८ मते मिळाली. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांना ६४ हजार ७२० मते पडली. विचारेंनी ६९ हजार २६८ मतांची आघाडी या मतदारसंघातून परांजपेंवर मिळवली. एकूण दोन लाख २० हजार २९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातील तीन लाख २४ हजार ८६८ मतदारांपैकी एक लाख ६७ हजार ३४७ मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे खासदार संजीव नाईक यांना ५३ हजार ६९८ मते मिळाली, तर विचारे यांना ९६ हजार ४६ मते मिळाली होती. लोकसभेत विचारेंनी तब्बल ४२ हजार ३४८ मतांची आघाडी घेतली होती. तर, सध्या सेनेत असलेल्या सलमान हाश्मीनेही सात हजार ७६९ मते मिळवली. यावरून २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये विचारे यांच्या मतांमध्ये तब्बल २७ हजार मतांची झालेली वाढ ही भाजपसाठी विधानसभेत खूपच फायद्याची ठरेल.
मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ हा २००९ मध्ये अस्तित्वात आला, तेव्हा विधानसभा निवडणुकीत मेंडोन्सा यांनी ६२ हजार १३ मते मिळवत मेहतांचा पराभव केला होता. मेहतांना तेव्हा ५१ हजार ४०९ मते मिळाली होती. त्या पराभवानंतर मेहतांनी जोरदार मोर्चेबांधणी करत २०१४ च्या निवडणुकीत मेंडोन्सांचा पराभव केला. आता मेंडोन्सा युतीधर्म म्हणून मेहतांना मदत करतील की, अन्य पक्षात जाऊन मेहतांना आव्हान देतील, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
>विधानसभेवर काय परिणाम?
भाजपच्या माजी महापौर गीता जैन या विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे. विचारे यांनी घेतलेली आघाडी सुखावणारी असली, तरी जैन यांनी बंडखोरी केल्यास ती डोकेदुखी ठरू शकते. मेंडोन्सा यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच परांजपे यांना पडलेली ६४ हजार ७२० मते काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांची विधानसभेसाठी आशा पल्लवित करणारी आहेत. भाजपचा असलेला वरचष्मा आणि मेहतांनी निर्माण केलेली ताकद यामुळे त्यांना लढत देणे तेवढे सोपे नसले, तरी अंतर्गत नाराजी तसेच मेंडोन्सा, जैन यांची गणिते सोडवावी लागतील.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपला ६९ हजार मतांची आघाडी मिळाल्याने भाजपचे पारडे जडच आहे. मीरा-भार्इंदरमध्ये राष्ट्रवादी केवळ नावापुरतीच शिल्लक आहे. जे काही पदाधिकारी आहेत, त्यांचे आपसात जमत नाही. अशा स्थितीतदेखील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या परांजपेंना पडलेली ६४ हजार ७२० इतकी मते निश्चितच दुर्लक्षून चालणार नाही. कारण, सदरची पडलेली मते ही मुख्यत्वे काँग्रेसने केलेल्या अथक मेहनतीचे फळ आहे. येणाºया विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आल्याने मुझफ्फर यांच्यासाठी यंदाची लोकसभा रंगीत तालीम होती. स्थानिक उमेदवार नसतानादेखील परांजपेंना इतकी मते पडणे, हे विधानसभा निवडणुकीसाठी मुझफ्फर यांच्या आशा पल्लवित करणारे आहे. असे असले तरी भाजपचे आव्हान सोपे नाही, एवढे निश्चित.
>की फॅक्टर काय ठरला?की फॅक्टर काय ठरला?
गुजराती, राजस्थानी, उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठी असून नरेंद्र मोदींकडे पाहून विचारे यांना यंदाही मतदान केले. मोदीलाटेचा फायदा यंदाही विचारे यांना झाला.
महापालिका निवडणुकीत जैनमुनी नयपद्मसागर महाराज यांनी सेनेविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने असणारी जैन मते सेनेच्या विरोधात जाण्याची भीती होती. पण, भाजपसोबत युती, मोदींचा चेहरा आणि शेवटच्या क्षणी नयपद्मसागर यांचे सेनेला मतदान करण्याचे आवाहन करणारी व्हिडिओ क्लिप विचारेंच्या पथ्यावर पडली. शिवसेनेची पारंपरिक मते मिळालीच, पण उत्तन परिसरात मच्छीमारांसाठी केलेली कामे यामुळेही तेथे चांगली मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसची खिळखिळी झालेली संघटना आणि काँग्रेसचा विशिष्ट भागातीलच शिल्लक प्रभाव याचाही विचारेंना फायदा झाला.

Web Title: The idea of voting for Narendra Modi is advantageous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.