प्रशांत माने 
कल्याण : एल्फिन्स्टन रोड येथील दुर्घटनेनंतर मोर्चा काढून दिलेल्या इशा-यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारपासून रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. पण हा स्टंट असल्याचा आणि जियेंगे भी यहाँ, और मरेंगे भी यहाँ असा पवित्रा घेत फेरीवाल्यांच्या नेत्यांनी न हटण्याचा निर्णय घेतल्याने हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. जेवढे अनधिकृत फेरीवाले वाढतील तेवढा हप्ता वाढतो म्हणून प्रशासन कारवाई न करता त्यांना आशीर्वाद देते, असा खळबळजनक आरोपही फेरीवाल्यांच्या नेत्यांनी केला असून हा प्रश्न चिघळण्यास आयुक्त आणि महापौर कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे; तर एकही फेरीवाला बसू देणार नाही, या भूमिकेवर मनसे ठाम आहे.
फेरीवाल्यांच्या अतिक्र मणाचा मुद्दा कल्याण डोंबिवली शहरात अधिक गहन बनत चालला आहे. याला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे निष्क्रिय प्रशासन जसे जबाबदार आहे, तसेच त्यांना पाठिशी घालणारे लोकप्रतिनिधीही जबाबदार आहेत. या विषय गेले वर्ष-दीड वर्ष सातत्याने गाजतो आहे. फेरीवाल्यांच्या प्रन हाताबाहेर गेल्याने, ते कुणालाच जुमानत नसल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांसह महापौरांवरही रस्त्यावर उतरण्याची नामुष्की ओढवली. मुंब्रा येथील गुंड टोळ््या यात सहभागी असल्याचा आरोप झाला. नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या युवा सेनेने आंदोलन केले. ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी दर सोमवारी उपोषण केले. पण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात तसूभरही फरक पडलेला नाही. मनसेने शनिवारपासून फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असताना फेरीवालेही प्रतिआव्हान देत आहेत. मनसेने रेल्वे स्थानक परिसरातील तसेच स्कायवॉकवरील फेरीवाले हटवले. पण कारवाईचा सोपस्कार उरकताच पुन्हा फेरीवाल्यांनी ठाण मांडले. आजवर असेच चित्र डोंबिवलीसह कल्याण शहरात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
एल्फिन्स्टनची घटना दुर्देवी आहे. पण फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला स्थानिक प्रशासनही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप फेरीवाला संघटनांचा आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच राज्य सरकारच्या सूचनेनुसार राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे स्थानिक स्वराज्य संस्थांवर बंधनकारक आहे. त्याकडे पालिका कानाडोळा करतात. कोणालाच फेरीवाले आपल्या भागात नकोत; त्यातही ज्या जागा नगरसेवक-पालिका अधिकारी सुचवतात त्याला फेरीवाल्यांचे नेते आक्षेप घेतात. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याची चिन्हे नाहीत.
भाजीपाला, फळ, फुले फेरीवाला कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत माळी यांनी फेरीवाला धोरण राबवण्यासाठी गेली अडीच ते तीन वर्षे पाठपुरावा सुरू आहे. पण विद्यमान आयुक्त पी. वेलरासू आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांचे त्याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेवला. याआधीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनीही याबाबत ठोस कार्यवाही केली नाही. माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळात काही प्रमाणात हालचाली सुरू झाल्या. तेव्हा बैठका होऊन धोरणही ठरले. पण आताच्या प्रशासकांकडून कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याचे माळी यांचे म्हणणे आहे. जर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झाली, तर अतिक्रमणाची स्थिती राहणार नाही. पण नोंदणी न झालेल्या फेरीवाल्यांचे चांगभले करण्यासाठी अंमलबजावणीत टाळाटाळ केली जात असल्याचा प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारला.
डोंबिवलीतील फेरीवाल्यांचे नेते प्रशांत सरखोत यांनीही प्रशासनावर तोंडसुख घेत मनसेच्या आंदोलनावर टीका केली. मनसेची आंदोलने ही स्टंटबाजी आहे. २०१४ ला फेरीवाल्यांच्या हिताचा जो कायदा बनला आहे, त्याकडे हप्तेबाजीमुळे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. जेवढे बेकायदा फेरीवाले राहतील, तेवढे हप्ते अधिक अशी प्रशासनाची भूमिका असल्याने अतिक्रमणाची गंभीर स्थिती ओढवली आहे. यात सर्वच राजकीय पक्षही वाटेकरी असल्याचा सरखोत यांचा आरोप आहे.
शिवसेनेने फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केले. इशारा दिला, महासभेत याबाबत सविस्तर चर्चा झाली. पण नंतर काहीही झाले नाही. शिवसेनेच्या आंदोलनात, कृतीत सातत्य राहिले नाही. वीस वर्षे सत्ता उपभोगूनही शिवसेना एकही प्रश्न सोडवू शकली नाही, अशी टीका त्या पक्षावर सुरू झाली. त्यानंतर त्यांनी मनसेचे स्थानिक नगरसेवक आणि विरधी पक्षनेते मंदार हळबे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. नंतर मवाळ महापौर राजेंद्र देवळेकर यांना टार्गेट करण्यासाठी शिवसेनेतील जहाल गटाने जाणिवपूर्वक हे आंदोलन केल्याचे आरोप झाल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले. एवढे रामायण घडूनही शिवसेना हा विषय हाताळण्यात कमी पडली. भाजपाही सातत्याने सत्तेत आहे. पण त्या पक्षानेही फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कधीही ठोस भूमिका घेतल्याचे दिसून आले नाही. उलट त्या पक्षाच्या काही नेत्यांनी शिवसेनेवर टीका करण्यात वेळ कर्ची केला, तर उरलेल्यांनी कायमच शिवसेनेशी जुळवून घेतल्याने भाजपा कधीही फेरीवाल्यांच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेत समोर आल्याचे दिसले नाही. सत्तेतील दोन्ही पक्ष भूमिका घेत नसल्याचे गौडबंगाल काय, हा प्रश्न दरवेळी उपस्थित होत गेला.
>प्रभागक्षेत्र अधिकाºयांना कारवाईचे निर्देश : मनसेच्या खळ्ळखट्टयाकनंतर केडीएमसी प्रशासनाला जाग आली असून शहरातील तसेच स्कायवॉकवर बसणाºया फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी रविवारी प्रभाग क्षेत्र अधिकाºयांना दिल्या. नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी ९ आॅक्टोबर २०१७ ला जारी केलेल्या पत्रान्वये सर्व महापालिका आयुक्तांना रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाºयांनी फेरीवाल्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर व स्कायवॉकवर फेरीवाले बस्तान बसवत असून, पालिकेच्या पथकाने वारंवार कार्यवाही करूनही फेरीवाले दाद देत नसल्याचे निदर्शनास आल्याकडे लक्ष वेधत घरत यांनी फेरीवाल्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
>‘लवकरच अंमलबजावणी’
फेरीवाला धोरणाला नुकत्याच पार पडलेल्या महासभेत मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारनेही परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. आयुक्त वेलरासू यांना यासंदर्भात लवकरच अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले जातील आणि ठोस कृती होईल, असे महापौर राजेंद्र देवळेकर म्हणाले.
>‘मनाची तरी लाज बाळगा’
रेल्वेच्या हद्दीतील फेरीवाले हटले. पण हप्तेबाजीमुळे केडीएमसी क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही. रेल्वेने पालिकेकडे पत्रव्यवहार केला. तरीही स्थानिक प्रशासन ढीम्म आहे. प्रशासनाला जनाची नाही पण मनाचीही लाज न राहिल्याने पुढील टार्गेट हे केडीएमसी राहणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिली.
>‘भीमसैनिक उत्तर देतील’
फेरीवाल्यांवर हल्ला झाला; तर मनसैनिकांना भीमसैनिक चोख उत्तर देतील, असा इशारा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्याने डोंबिवलीतील रिपाइंचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी रिपाइंचे कार्यकर्ते रस्त्यात उतरणार असल्याची माहिती पक्षाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकूश गायकवाड यांनी दिली. फेरीवाले एकटे आहेत, असे मनसेने समजू नये. यापुढे फेरीवाल्यांवर हल्ला कराल, तर याद राखा असा इशारा त्यांनी दिला.
>आंदोलनकर्ते आज हजर होणार
डोंबिवलीत शनिवारी फेरीवाल्यांविरोधात छेडलेल्या आंदोलनात सात मनसैनिकांवर गुन्हा झाला आहे. यात शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्यासह मनसेचे केडीएमसीचे गटनेते प्रकाश भोईर, परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, सागर रवींद्र जेधे, रवींद्र गरूड आणि सिध्दार्थ मातोंडकर आदी कार्यकर्त्यांवर रामनगर पोलीस ठाण्यात तोडफोड, जमावबंदी आदेश तोडणे, शांतताभंग करणे आदी गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व जण सोमवारी पोलीस ठाण्यात हजर होणार आहेत.
>मराठी टक्का घसरल्याचा राग का काढता?
मीरा रोड : मुंबईत मराठी भाषकांचा टक्का कमी होतोय म्हणून त्याचा राग फेरीवाल्यांवर काढू नये, असा टोला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांना हाकलून हा प्रश्न सुटणार नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगले असले, तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांसोबत जे केले ते भारतीय संविधानाविरोधात आहे. तसे होत राहिल्यास आम्ही त्याचे उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी शनिवारी दिला आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे सांगितले. फेरीवाल्यांच्या त्रासाची तक्र ार मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस अथवा प्रशासनाकडे करावी. मात्र स्वत: कायदा हातात घेऊ नये. फेरीवाल्यांवर हल्ला केलास भीमसैनिक चोख उत्तर देतील. गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत हल्ला करण्याच्या मनसेच्या वृत्तीवरही आठवले यांनी टीका केली. देशातील ७० टक्के लोक फेरीवाल्यांकडून वस्तू विकत घेतात.