निरागस बच्चे कंपनीच्या चेह-यावर फुलला बाल दिनाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 05:30 PM2017-11-14T17:30:38+5:302017-11-14T17:31:01+5:30

डोंबिवली- आजच्या बालदिनाचे औचित्य साधून कुणी विविध गाण्यांवर फेर धरत तर कुणी गाणी गुणगुणत त्या निरागसांनी हा दिवस साजरा केला.

Happy children enjoy the full-blown childhood day on the face of the company | निरागस बच्चे कंपनीच्या चेह-यावर फुलला बाल दिनाचा आनंद

निरागस बच्चे कंपनीच्या चेह-यावर फुलला बाल दिनाचा आनंद

googlenewsNext

डोंबिवली- आजच्या बालदिनाचे औचित्य साधून कुणी विविध गाण्यांवर फेर धरत तर कुणी गाणी गुणगुणत त्या निरागसांनी हा दिवस साजरा केला. निमित्त होते ते क्षितिज मतिमंद मुलांच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे. तर कुणी अनोखा उपक्रम राबवित हा दिवस साजरा केला.

क्षितीज मतिमंद मुलांच्या शाळेत आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील केअर ग्रुप, पूर्व प्राथमिक , प्राथमिक, पूर्व व्यवसायिक आणि व्यवसायिक ग्रुपमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. माऊली माऊली या गाण्यावर नृत्य सादर करीत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची टाळ्यांच्या कडाकडाटात दाद मिळविली. त्यानंतर हेरंब कदम आणि शुभम जैन यांनी बॉडीगार्ड या गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. सुजाता धुरी हिला कोणतीही अक्षरओळख नसताना केवळ गाणी पाठांतर करून सादर केली. त्यामध्ये तिने साज ये गोकुळी, माय भवानी तुझं लेकूरं, शंभो ये शिवा ही गाणी सादर करून उपस्थिताच्या वाहवाहची दाद मिळविली.

शाळेत केक कापून पंडित नेहरू यांचा वाढदिवस साजरा केला. पंडित नेहरू हे मुले काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर काय संस्कार केले जात आहे. याकडे पालक व शिक्षकांनी पाहिले पाहिजे, असे म्हणत. त्याप्रमाणे या मुलांवर चांगले संस्कार केल्यामुळे या मुलांना चांगला परफॉर्मन्स दिला. यावेळी केडीएमसी सभागृह नेते राजेश मोरे, अनिता दळवी, प्राची गडकरी, माधुरी महामुनकर, लक्ष्मी रंगनाथन, रजनी कदम, अनिल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

राजेश मोरे यांनी कोणत्याही मंदिरात जाण्यापेक्षा माझी आळंदी आणि पंढरपूर येथेच आहे. या मुलांची सेवा करणे हे खूप मोठे काम आहे. महापालिकेतर्फे अशा मुलांच्या शाळेसाठी जागा काढण्याचे काम सुरू आहे. ही जागा नाममात्र दराने देण्यात येणार आहे. तुम्ही त्यासाठी माझ्याकडे एक पत्रव्यवहार करून ठेवावा. त्या जागेसाठी देखील आम्ही आर्थिक सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले. 

डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेने मुलांना सोलर पॅनेलची भेट दिली. विद्यार्थ्यांना सोलर पॅनल दाखविण्यात आले. त्यांची माहिती देण्यात आली. तसेच शाळेतील दिवे, पंखे, एसी, डिजिटल क्लासरूम सोलर पॅनेलवर चालविण्यात येणार आहे. शाळेच्या सुट्टी काळात एमएसईबीला शाळा विद्युत देईल. तर कधी गरज भासल्यास आम्हीही एमएसईबीकडून विद्युत घेऊ असे आदान प्रदान सुरू राहणार असल्याचे शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले.

सोनारपाडा येथील शंकरा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून गरजेच्या वस्तू घरून आणल्या व त्या जननी आशिष संस्थेत भेट देऊन अनोख्या पद्धतीने हा दिन साजरा केला. त्यामध्ये साबण, टुथपेस्ट, टॉवेल, बिस्किटे, डबे, खेळणी इत्यादी वस्तूचा समावेश होता. पंडित नेहरू यांच्या जीवनावर आधारित एक स्लाईड शो दाखविण्यात आला. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी पार पाडले. अरविंद उबाळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता. डोंबिवलीतील सिस्टर निवेदिता स्कूलमध्ये आज विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुट्टी दिली होती. संपूर्ण दिवस केवळ डान्स , गाणी, स्कीट सादर करून बालदिनाचा मनमुराद आनंद लुटला.

यावेळी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे ट्रस्टी प्रभाकर देसाई, शाळेच्या मुख्याध्यापिका हषू बेल्लरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोळेगावातील इरा ग्लोबल स्कूलमध्ये चाचा नेहरू यांच्या वेशभूषा करून आलेल्या नेहरूसोबत मुलांनी अनेक गेम खेळत बालदिनाचा आनंद लुटला. कल्याणमधील बालकमंदिर पूर्व प्राथमिक शाळा मराठी माध्यम बालवाडीतील मुलांनी आपल्याच वर्गातील मुलांना अभ्यासाच मार्गदर्शन केले. तसेच चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. मुलांना शिक्षकांनी नेहरूंविषयी गोष्टीरूपाने माहिती दिली.

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरूणोदय माध्यमिक शाळेत पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या वतीने जैविक खत प्रकल्पाचे युनिट बसविण्यात आले आहे. शाळेने गो ग्रीन किप क्लीन हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे इको स्कूल होण्याचा शाळेला बहुमान मिळाला आहे. बालदिनानिमित्त माझी शाळा स्वच्छ शाळा या अंतर्गत ओला कच:यापासून खतप्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे इनरव्हील क्लब ऑफ वेस्टने प्रायोजकत्व स्वीकारले आहे. दोन वर्षासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थी आपल्या घरून भाजीचे देठ, फळांच्या साली आणून शाळेत जमा करणार आहेत. तसेच काच, कापड, ईवेस्ट आणि प्लॅस्टिक ही वेगळे जमा करण्यात येणार आहे. 

कागद रद्दीला आणि ई वेस्ट रिसायक्लींगला देण्यात येणार आहे. 11 नोव्हेंबर हा सलीम अली यांचा जन्मदिन पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शाळेत छायाचित्रचे प्रदर्शन आज भरविण्यात आले होते. त्यात अविनाश भगत , क्लारा कोरिया, मनिष केळकर या कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यातील छायाचित्रकारांनी आपल्या कॅमे:यात टिपलेले चित्र लावण्यात आली आहेत. शाळा कायम स्वच्छ असल्याने इनरव्हील क्लबतर्फे पुरस्कार देऊन शाळेचा गौरव करण्यात आला. यावेळी क्लबच्या अध्यक्षा कलप्ना देशमुख, प्रकल्पप्रमुख गीता कुलकर्णी, पर्यावरण दक्षतामंचच्या प्रकल्पप्रमुख रूपाली शाईवाले,शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा परळीकर उपस्थित होते. 

Web Title: Happy children enjoy the full-blown childhood day on the face of the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.