कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मेपासून बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:04 AM2019-05-22T00:04:53+5:302019-05-22T00:04:58+5:30

मध्य रेल्वेचे महापालिकेला पत्र : आयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार होणार डागडुजी

The flyover of the Kopar closed from 27th May? | कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मेपासून बंद?

कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मेपासून बंद?

डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील कोपर दिशेकडील उड्डाणपुलाच्या डागडुजीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे तो २७ मेपासून वाहतुकीसाठी बंद करावा, असे पत्र मध्य रेल्वेने सोमवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिले आहे. रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, पादचारी पूल यांचे आयआयटी मुंबईने स्ट्रक्चरल आॅडिट केले आहे. त्यात कोपर दिशेकडील पुलाची डागडुजी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पूल बंद झाल्यास त्याची दुरुस्ती कधीपासून कधीपर्यंत चालणार, ती कोण करणार, या संदर्भात महापालिका प्रशासनाला कोणतीही माहिती नसल्याचे समजते.


आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी पुलाच्या सुरक्षाविषयक अहवाल १३ मे रोजी मध्य रेल्वे प्रशासनाला दिला होता. त्यानुसार रेल्वेने तातडीने हा निर्णय घेतला आहे. शहरातील जाणकारांच्या माहितीनुसार १९८० दशकात हा उड्डाणपूल बांधण्यात आला. तेव्हापासून साधारणपणे दोनदा त्याची डागडुजी करण्यात आली होती. पुलावरील रस्त्यावर डांबरीकरणाचे थर साठल्याने ते कमी करून पुलावरचे वजन कमी करण्यात आले होते. त्यानंतर पुलाच्या संरक्षक भिंतींची डागडुजी, रेलिंग आणि रंगरंगोटी, अशी कामे करण्यात आली.


मध्य रेल्वे प्रशासनानेही या पुलाचे लोखंड गंजू नये, यासाठी काही वर्षांपूर्वी रंगकाम केले होते. मात्र, ३५ वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोणतेच काम झालेले नाही. त्यामुळे आता ते काम करावे लागणार असल्याने वाहतूक ठाकुर्लीतील नवीन उड्डाणपुलावरून वळवावी लागणार आहे. त्यामुळे पश्चिमेत ये-जा करण्यासाठी मोठा वळसा पडणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर पूल दुरुस्तीचा निर्णय घेतल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


मध्य रेल्वेच्या पत्राबाबत नगररचनाकार सपना कोळी म्हणाल्या की, रेल्वेला बुधवारी पत्र पाठवणार आहे. त्यात पुलामध्ये कोणते दोष आहेत? कुठे डागडुजी करावी लागणार आहे? ती रेल्वेने करायची की नाही? तसेच जोडरस्ते आहेत तेथे काही कामे सुचवली असतील तर ती केडीएमसीने करायची का? या सगळ्यासाठी किती दिवसांचा अवधी लागणार आहे? किती निधी लागणार, याबाबत विचारणा केली जाणार आहे.


यासंदर्भात वाहतूक नियंत्रण पोलीस निरीक्षक सतेज जाधव म्हणाले की, पूल बंद करण्याबाबत कोणतेही पत्र, सूचना आम्हाला आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या नाहीत. तसेच महापालिकेनेही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आताच काहीही भाष्य करता येणार नाही.

ठाकुर्ली उड्डाणपुलाचा पर्याय
च्कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मे पासून वाहतुकीसाठी बंद झाला तर पूर्व- पश्चिमेला ये-जा करण्यासाठी ठाकुर्ली येथील नव्या उड्डाणपूलाचा एकमेव पर्याय असेल. पण हा पूल दुपदरी असून आधीच अरुंद आहे. तसेच या पुलाचे ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दिशेने काम सुरू आहे.
च् वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवल्यास पूर्वेला मंजूनाथ शाळेपासून जोशी हायस्कूल शाळा- ठाकुर्ली पुलापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तेथील रस्ते अधिकच अरुंद आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करताना वाहतूक विभागावर मोठा ताण येण्याची शक्यता ाहे.

Web Title: The flyover of the Kopar closed from 27th May?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.