निष्काळजीपणा करणारे पाच बिल्डर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 02:21 AM2018-06-17T02:21:32+5:302018-06-17T02:21:32+5:30

अथर्व वारंग या सात वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृतदेह देसलेपाडा येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या सात मजली इमारतीच्या ड्रेनेज टाकीत मिळून आल्याच्या घटनेला तब्बल २० दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी ड्रेनेज टाकीवर झाकण न बसवून निष्काळजीपणा केल्याबद्दल पाच बिल्डरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Five builders arrested for negligence | निष्काळजीपणा करणारे पाच बिल्डर अटकेत

निष्काळजीपणा करणारे पाच बिल्डर अटकेत

Next

डोंबिवली : अथर्व वारंग या सात वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृतदेह देसलेपाडा येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या सात मजली इमारतीच्या ड्रेनेज टाकीत मिळून आल्याच्या घटनेला तब्बल २० दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी ड्रेनेज टाकीवर झाकण न बसवून निष्काळजीपणा केल्याबद्दल पाच बिल्डरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. कल्याण न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्या बिल्डरांची नावे सय्यद हसन अहमद, मोनिस अहमद, ऐमान खान, नागेंद्र सिंग आणि विशाल सिंग अशी आहेत. अथर्वचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता किंवा कसे, याबाबतचा तपास अजून सुरू असून मानपाडा पोलीस ठाण्यात प्राथमिक निष्कर्षांच्या आधारे तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, अपहरणकर्त्याचा अजून तपास लागलेला नाही. तत्पूर्वी पाच बिल्डरांना निष्काळजीपणाकरिता अटक झाली आहे.
दि. २४ मे रोजी दुपारच्या सुमारास अथर्व बेपत्ता झाला. त्याच्या आईवडिलांनी त्याचा शोध घेतला असता तो कुठेही मिळून आला नाही. अथर्व हरवल्याची तक्रार त्याच्या आईवडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली.
पोलिसांनी शोध घेतला असता देसलेपाडा येथील अथर्वच्या घरानजीक नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या ड्रेनेजच्या टाकीत त्याचा मृतदेह मिळून आला. ड्रेनेज टाकीवर झाकण नसल्याने खेळताखेळता त्यात पडून अथर्वचा मृत्यू झाला की, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याचा खून करून त्याचा मृतदेह ड्रेनेज टाकीत फेकून देण्यात आला, या दोन्ही शक्यतांच्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात पाठवला असता त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यामुळे अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या सरकारी रुग्णालयात पाठवला होता. पोलिसांनी अथर्वच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मात्र, तब्बल २० दिवसांनी ड्रेनेजलाइनचे झाकण उघडे ठेवल्याबद्दल पाच बिल्डरांना अटक केली गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस एवढे दिवस गप्प का बसले, असा सवाल नागरिक करत आहेत. ही इमारत अधिकृत की अनधिकृत, याचाही तपास पोलीस करणार आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना सात बेकायदा मजले नियमित करण्याकरिता आठ लाखांची लाच घेताना दोन दिवसांपूर्वी अटक केली. देसलेपाडा येथील या इमारतीलाही महापालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्यांनी संरक्षण दिले होते किंवा कसे, या दृष्टिकोनातूही तपास केला जाणार आहे.
अथर्ववर लैंगिक अत्याचार झाले नाही व त्याचा अगोदर खून करून त्याला ड्रेनेजमध्ये टाकले नाही, असा शवविच्छेदन अहवाल मुंबईहून आला, तर हे बिल्डरच त्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे निष्पन्न होईल.
>पोलीस खरे कारण शोधू शकलेले नाही
अथर्वचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे व त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले, तर केवळ निष्काळजीपणाकरिता बिल्डरांना दोषी धरले जाईल. मुलाच्या मृत्यूला २० दिवस उलटले, तरी पोलीस मृत्यूचे खरे कारण शोधू शकलेले नाहीत, हे पोलिसांचे सपशेल अपयश असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मुंबईहून येणाºया शवविच्छेदन अहवालामध्ये नेमके काय असेल याकडे अथर्वचे पालक आणि त्याच्या कुटुंबीयांचे लक्ष लागलेले आहे. तो आल्यानंतरच नेमका प्रकार पुढे येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
>दि. २५ रोजी माझ्या मुलाचा, अथर्वचा मृतदेह ड्रेनेज टाकीत मिळून आला. ड्रेनेजलाइन उघडी ठेवणे, त्यावर झाकणे न बसवणे, याकरिता बिल्डरांना अटक करायचीच होती, तर त्याच वेळी का केली नाही? तब्बल २० दिवस थांबण्याची गरज काय होती? पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात दिरंगाई का केली जात आहे. माझ्या मुलाचा खरा मारेकरी अद्याप शोधलेला नाही. त्याच्या मृत्यूचे खरे कारण उघड झालेच पाहिजे व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
- रोशना वारंग, अथर्वची आई

Web Title: Five builders arrested for negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक