कर्जबुडव्यांना पहिला धक्का!, ‘सीकेपी’च्या खातेदारासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 06:30 AM2017-11-11T06:30:41+5:302017-11-11T06:30:52+5:30

हेराफेरी करून सुमारे सात कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट घेऊन सीकेपी बँकेला लुबाडणाºया एका खातेदारासह बँकेच्या दोन शिपायांना आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली

The first shock to the debtors !, the three arrested with the CKP account holder | कर्जबुडव्यांना पहिला धक्का!, ‘सीकेपी’च्या खातेदारासह तिघांना अटक

कर्जबुडव्यांना पहिला धक्का!, ‘सीकेपी’च्या खातेदारासह तिघांना अटक

Next

ठाणे : हेराफेरी करून सुमारे सात कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट घेऊन सीकेपी बँकेला लुबाडणाºया एका खातेदारासह बँकेच्या दोन शिपायांना आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. खातेदारास कॅश क्रेडिट देण्याचे काम विकास कुबल आणि नरेंद्र जाधव या शिपायांनी केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
सीकेपी को-आॅपरेटिव्ह बँकेच्या लोकपुरम शाखेतील गैरव्यवहाराची तक्रार चितळसर पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर २०१६ रोजी करण्यात आली होती. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला. बँकेतील गैरव्यवहाराविरोधात एकाकी लढा देणारे संचालक राजेंद्र फणसे यांनी ठेवीदारांच्या न्यायासाठी पाठपुरावा केला. रिझर्व्ह बँक आणि सीकेपीच्या अहवालानुसार २०११ ते १४ या कालावधीत बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले.
बँकेचे खातेदार सत्येन सालवा यांना २ कोटी १५ लाख रुपयांचे कॅश क्रेडिट मंजूर करण्यात आले होते. सालवा यांना मुदतठेवीच्या ८५ टक्के या मर्यादेपेक्षा जास्त कॅश क्रेडिट देण्यात आले. आश्चर्य म्हणजे, बँकेच्या दोन शिपायांनी लिपिकांचे कोड वापरून त्यांच्या खात्यामध्ये वेळोवेळी मर्यादेपेक्षा जास्त कॅश क्रेडिटची उचल दिली.
बँकेवर प्रशासक नेमल्यानंतर ३१ मे २०१२ रोजी ठेवीदारांनी ठेवी परत घेण्यासाठी बँकेत गर्दी केली होती. त्या वेळी बँक कर्मचाºयांनी काही ठेवीदारांच्या रकमा सालवा यांच्या कॅश के्रडिट खात्यात परस्पर वळत्या केल्या. सालवा यांनी ६ कोटी ९२ लाख १९ हजार ४७ रुपयांनी बँकेची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बँकेच्या अधिकाºयांनी शिपायांच्या हाती जाणीवपूर्वक यंत्रणा सोपवून गैरव्यवहार केल्याचा आरोपही तक्रारीमध्ये केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासाअंती आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने जवळपास वर्षभरानंतर विकास आणि नरेंद्र या दोन्ही शिपायांसह खातेदार सत्येन सालवा यांनाही गुरुवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कर्ज वितरणात मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहारामुळे नावलौकिक असलेल्या सीकेपी बँकेला उतरती कळा लागली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे कर्जबुडव्यांना पहिला धक्का लागला आहे.

Web Title: The first shock to the debtors !, the three arrested with the CKP account holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.