ठळक मुद्देअखेर दोन महिन्यानंतर खऱ्या अर्थाने क्लस्टरच्या विकासाला होणार सुरवातसल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्यातस्टेशन परिसर आणि वागळे पट्यात होणार क्लस्टरचा पहिला प्रयोग


ठाणे - ठाणेकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर लागू करण्यात आली असून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या ठाणेकरांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरिक्षत घरे विनामूल्य मिळणार आहेत. त्यानुसार आता या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरवात केली आहे. ठाणे स्टेशन आणि वागळे पट्टा या भागाचा आता पहिल्या टप्यात सामुहीक विकास केला जाणार आहे. त्यानुसार या कामासाठी आवश्यक असलेल्या सल्लागारांची नेमणूकीची प्रक्रिया अंतिम टप्यात असून पुढील दोन महिन्यात प्रत्यक्षात या भागाच्या सर्व्हेला सुरवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
उच्च न्यायालयाने नुकताच योजनेला हिरवा कंदिल दिल्यानंतर राज्य शासनाने याबाबतची अंतिम अधिसूचना जारी केली होती. या योजनेसाठी किमान ८ हजार चौरस मीटर भूखंडाची आवश्यकता असून क्लस्टरमध्ये झोपडपट्टी आणि अधिकृत इमारती असल्यास त्यांची कमाल मर्यादा अनुक्रमे २५ टक्के आणि ४० टक्के असणार आहे. दरम्यान आधी ३०० चौरस फुटांची घरे ही भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता ही घरे मोफत देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. क्लस्टर योजनेत ४ एफएसआयला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार पालिकेने याआधीच त्या दृष्टीने क्लस्टरचा अभ्यास सुरु केला आहे. या वाढीव एफएसआयनुसार झोपडपट्टी भागाला अधिक फायदा होणार असला तरी काही जुन्या योजना बंद कराव्या लागणार आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजना देखील काहीशी रखडणार असल्याचे दिसत आहे. असे असले तरी आता पालिका पुन्हा या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अर्बन रिन्युव्हल प्लॅन तयार करणार असून ही योजना कोणत्या भागात कशा पध्दतीने राबविता येऊ शकते याचा अभ्यास करणार आहे. परंतु हा अभ्यास करीत असतांनाच उर्वरित ठिकाणी क्लस्टरची योजना राबविण्यास सुरवात केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
त्यानुसार पहिल्या टप्यात ठाणे स्टेशन परिसर आणि वागळे पट्टा यांची निवड करण्यात आल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. त्यानुसार स्टेशन परिसरात काही बदल देखील करण्यास सुरवात झाली आहे. परंतु सध्या या दोन्ही भागातील असलेली गजबज पाहता आणि नव्या सोई सुविधा कशा पध्दतीने पुरविल्या जाऊ शकतात. याचा अभ्यास करणे पालिकेला थोड्याफार प्रमाणात कठीण होणार आहे. त्यामुळेच या भागाचा योग्य पध्दतीने विकास करण्यासाठी पालिका येथे सल्लागारांची नेमणूक करणार आहे. या सल्लागार नियुक्तीचे टेंडर देखील अंतिम झाले असून येत्या एक ते दिड महिन्यात या कामी सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. त्यानंतर या सल्लगाराच्या माध्यमातून या दोनही भागांचा अभ्यास करुन सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे. यामध्ये काही प्लॉट बदलावे लागणार आहेत, तसेच काही ठिकाणी एमआयडीसीची देखील जागा असल्याने त्या भागाचा विकास कशा पध्दतीने करता येऊ शकतो याची देखील चाचपणी केली जाणार आहे. शिवाय पालिकेच्या विविध विभागांकडून देखील सल्लागारांना मालमत्ताकर, पाणी पुरवठा आकार आदींसह इतर माहिती पुरविली जाणार आहे. त्यानंतर या भागाचे जीओ टॅगींग करुन बायोमेट्रीक सर्व्हे केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात क्लस्टर योजना अंमलात येईल असा विश्वासही पालिकेने व्यक्त केला आहे.