राजू काळे
भाईंदर - राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मीरा-भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्याच्या कराराला नुकतीच अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रुग्णालयाचा हस्तांतरणाचा तिढा अखेर सुटल्याने पालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पालिकेने २०१२ मध्ये बांधलेले हे सर्व साधारण रुग्णालय राज्य सरकारमार्फत चालविण्याचा ठराव तत्कालीन महासभेत मंजूर करण्यात आला होता. परंतु त्याचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाने हस्तांतरणाला परवानगी नाकारून ते रुग्णालय पालिकेनेच चालवावे, असा आदेश दिला. त्यामुळे अद्यापपर्यंत हे रुग्णालय पालिकेकडून चालविले जात असले तरी ते राज्य सरकारकडेच हस्तांतरीत व्हावे, यासाठी प्रशासकीय व राजकीय पाठपुरावा सुरू होता. त्याची दखल घेत राज्याचे महसूलमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी १० जानेवारी २०१६ रोजीच्या रुग्णालय लोकार्पण सोहळ्यात हे रुग्णालय लवकरच सरकारकडे हस्तांतरीत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यात अनेकदा तांत्रिक अडचणी आल्यानंतर अखेर ३० नोव्हेंबर २०१६ रोजीच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत रुग्णालय हस्तांतरणाला मान्यता देण्यात आली.

रुग्णालय हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते, पालिका -उपायुक्त (आरोग्य विभाग) डॉ. संभाजी पानपट्टे व उपसंचालक, (आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे) डॉ. रत्ना रावखंडे यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. त्यासाठी मे २०१७पर्यंतची मुदत देण्यात आली. परंतु तांत्रिक अडचणीत सापडलेल्या या रुग्णालयाचे हस्तांतरण रखडले. त्यातच रुग्णालयातील रुग्णसेवा पुरेशी नसल्याचा खटला न्यायप्रविष्ट करण्यात आल्याने रुग्णालयाच्या हस्तांतरणाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु आरोग्य संचालकांमार्फत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होताच पालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालय हस्तांतरणाचा करारनामा ९ आॅगस्ट रोजी राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला. अखेर त्याला काही किरकोळ दुरुस्तीनंतर ३१ आॅक्टोबरला अंतिम मान्यता देण्यात आली. त्याचे पत्र पालिकेला दोन दिवसांपूर्वीच प्राप्त झाल्याने पालिकेच्या डोक्यावरील ओझे ठरलेल्या या रुग्णालयाच्या हस्तांतरणाचा तिढा सुटल्याची प्रतिक्रिया प्रशासकीय अधिका-यांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

एकूण चार मजली रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया व अतिदक्षता विभागाचे काम सध्या सुरू असून त्यासाठी सुमारे ३ कोटींची तरतूद पालिकेकडून करण्यात आली आहे. तिस-या मजल्यावरील काम अद्याप अपूर्णावस्थेत असले तरी पालिकेने या मजल्यावर कुपोषित बालकांवरील उपचारासाठी पोषण पुनर्वसन केंद्र काही महिन्यांपूर्वी सुरू केले आहे.

रुग्णालय हस्तांतरणासाठी पालिकेला आरोग्य उपसंचालकांसोबत अंतिम सामंजस्य करार करावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार असून त्यानंतरच रुग्णालयाच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेचा शेवट होणार आहे. हस्तांतरणानंतर मात्र त्यातील कर्मचारी व अधिका-यांना पालिकेकडून पुढील वर्षभरासाठीचे वेतन दिले जाणार आहे. तसेच पालिकेच्या नावे असलेला रुग्णालय जागेचा सातबारा व मालमत्ता पत्र पालिकेला राज्य सरकारच्या नावे करावे लागणार आहे.