धरणाच्या माथ्यावरील गावात पाण्यासाठी जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:24 AM2019-05-20T00:24:38+5:302019-05-20T00:24:43+5:30

वेटागाव आजपर्यंत दुर्लक्षित : रस्ता नसल्याने करावी लागते टँकरची प्रतीक्षा

Fatal travel for water in the village on the dam | धरणाच्या माथ्यावरील गावात पाण्यासाठी जीवघेणा प्रवास

धरणाच्या माथ्यावरील गावात पाण्यासाठी जीवघेणा प्रवास

Next

जनार्दन भेरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भातसानगर : शहापूर तालुक्यातील वेटापाड्याच्या चारही बाजूंनी उंच डोंगर, दऱ्या असल्यामुळे शहापूर, कसारा, डोळखांब, वासिंद यापैकी कोणत्याच बाजारपेठांशी या पाड्यांचा सहसा संबंध येत नाही. या गावासाठी ना रस्ता ना काही सुविधा. गावासाठी वनविभागाची विहीर बांधली असली, तरी तिला प्यायला घोटभर पाणी नसल्याने पाड्यातील महिलांना थेट दीड किमी खोल दरीत उतरून भातसा धरणातील पाणी आणावे लागत आहे.


शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची तीव्र टंचाई असून या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते आहे. वेटापाडा येथे टँकर सुरू आहे, पण तेथे टँकर येण्याची वाट पाहावी लागते आहे.


शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या आतील विस्थापित झालेले गाव म्हणजेच वेटागाव. भातसा धरणाच्या बांधणीस सुरुवात झाली आणि त्यावेळी धरण क्षेत्रातील घोडेपाऊल, पाचीवरा, पाल्हेरी ही तीन गावे विस्थापित झाली. या गावांतील काही कुटुंबे आपापल्या नातेवाइकांच्या आसºयाला गेली, तर काहींनी आपल्याला जेथे रानावनात जागा मिळेल, तेथे आपले बस्तान ठेवले.


यातीलच एक गाव म्हणजे आजचा वेटा हा पाडा.
भातसा धरणातून विस्थापित झालेल्या घरांपैकीच चारपाच घरे धरणाच्या डोंगरमाथ्यावर येऊन आपले बस्तान धरणाच्या उंच अशा टेकडीवर वस्ती केली आहे. आज या पाड्यात तब्बल १९ घरे झाली असून त्यावेळच्या १० ते १२ लोकसंख्येची ९० लोकसंख्या झाली आहे. आज गाव जरी कोठेरा ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असला, तरी या पाड्याला सुविधा देणेच कठीण असल्याचे स्वत: गावकरी तुळशी गोमा कैवारी, वसंत पांडुरंग भगत, शंकर राम कैवारी, अनंता वाळकू भगत सांगत आहेत. कोठेरा गावापासून तीनसाडेतीन किमी अंतरावर दºयाखोऱ्यांतून पायवाट करून डोंगराच्या टोकावर हे गाव वसले आहे. या गावात कोणतेही वाहन जाऊ शकत नसल्याने येथे सुविधा मिळणेच अशक्य होऊन बसले आहे.


येथील लोक विटा पाडून आपली घरे बांधत आहेत. येथे चारचाकी वाहनच येत नसल्याने गावाची मोठी पंचाईत झाली आहे. पाणी आणल्यानंतर मगच दिवसभराचे कामकाज, असा या गावकºयांचा नित्याचा कार्यक्रम आहे. जोपर्यंत घरात पाणी नाही, तोपर्यंत कोणत्याच कामाला सुरुवात होतच नाही. केवळ पाण्यासाठी महिला आणि पुरुष यांचा बराच वेळ जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.
 

आता या गावाचे भविष्य बदलणार आहे, ते मुमरी धरणामुळे. या धरणामुळे आता थेट सारंगपुरीमधून मुरबीचापाडा आणि थेट वेटा या रस्त्याने पाणी येथे पोहोचणार आहे. या गावात रस्ताच नाही, त्यामुळे चारचाकी वाहन येथे जात नसतानाही त्यांच्यासाठी विहीर बांधण्यात आली आहे. मात्र, त्यात पाणी नसल्याने त्यांना धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते आहे. आम्हाला जितक्या सुविधा देणे शक्य होते, तितक्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
- भाऊ दरोडा, सदस्य, ग्रामपंचायत कोठारा

या पाड्याला पाणी पुरवठा करणे शक्य नाही. मात्र, पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ठराव आल्यास त्यावर विचार करता येऊ शकेल.
- एम. बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

Web Title: Fatal travel for water in the village on the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.