बनावट सोने गहाण ठेवून ‘मुथ्थुट’ला लावला चुना, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 04:15 AM2018-07-12T04:15:05+5:302018-07-12T04:15:27+5:30

बनावट सोने गहाण ठेवून मुथ्थुट फायनान्सच्या चार शाखांसह रत्नागिरी जिल्ह्यातील दोन पतपेढ्यांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी बुधवारी केला.

 Fake gold mortgages, 'Muththut' was chosen, and arrested all four | बनावट सोने गहाण ठेवून ‘मुथ्थुट’ला लावला चुना, चौघांना अटक

बनावट सोने गहाण ठेवून ‘मुथ्थुट’ला लावला चुना, चौघांना अटक

Next

ठाणे - बनावट सोने गहाण ठेवून मुथ्थुट फायनान्सच्या चार शाखांसह रत्नागिरी जिल्ह्यातील दोन पतपेढ्यांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी बुधवारी केला. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका सोनाराचाही समावेश आहे.
चिपळूण येथील रासबिहारी नीता इमन्ना आणि अनिकेत चंद्रकांत कदम, ऐरोली येथील लियाकत अब्दुल कादीर शेख ऊर्फ राजू शहानी आणि कळवा येथील सुशांत निशिकांत साळवी ही या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. इमन्ना हा सोनार आहे. लियाकत अब्दुल कादीर शेख हा मूळचा सावंतवाडीचा रहिवासी आहे. रासबिहारी याला दागिने बनवण्याची कला अवगत होती. वरून सोन्याचा जाड थर आणि आतमध्ये चांदी टाकून या मिश्र धातूचे तो दागिने बनवायचा. या दागिन्यांना सोन्याचा आणखी मुलामा चढवला की, ते अस्सल सोने असल्यासारखे भासते. रासबिहारीने सोन्याचा मुलामा चढवलेले एक किलो वजनाचे दागिने त्याच्या चिपळूण येथील घरामध्ये तयार करून ठेवले होते. इतर आरोपींच्या मदतीने त्याने हे दागिने रत्नागिरी, मुंबई आणि ठाणे परिसरातील फायनान्स कंपन्या आणि पतपेढ्यांमध्ये तारण ठेवले. आरोपींनी कंपनीच्या कळवा, नौपाडा, दादर, माझगाव शाखांमध्येही हे बनावट सोने गहाण ठेवून १३ लाख ४० हजारांचे कर्ज उचलले. चिपळूण येथील लक्ष्मी बाळासाहेब नागरी सहकारी पतसंस्था आणि दहिवलीतील यादवराव घाग सहकारी पतसंस्थेकडूनही आरोपींनी अशा प्रकारे कमी रकमेच्या सोन्यावर जास्त कर्जाची उचल केली. आरोपींनी रत्नागिरी, मुंबई, ठाणे परिसरांत फसवणुकीचे सात गुन्हे केले.

वित्तीय कंपन्यांसोबतच सामान्यांचीही फसवणूक

मुथ्थुट फायनान्स कंपनी आणि काही पतपेढ्यांप्रमाणेच आरोपींनी सामान्यांचीही फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया एका महिलेकडे आरोपींनी याच भागातील त्यांचा साथीदार सुशांत निशिकांत साळवी याच्या मदतीने ११ तोळे सोने गहाण ठेवले होते.

तिच्याकडून आरोपींनी एक लाख ७० हजार रुपये हातउसने घेतले होते. सोन्याच्या किमतीपेक्षा दिलेली ही रक्कम अतिशय कमी असल्याने महिलेने विश्वास ठेवला. मात्र, ते सोने सोनाराकडे तपासले असता ते चांदीमिश्रित असल्याचे समजले.

महिलेने याबाबत कळवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी सुशांत साळवीला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून मोठ्या टोळीचे बिंग फुटले.

पाच वर्षांपासून गोरखधंदा सुरू
कमी किमतीचे चांदीमिश्रित सोन्याचे दागिने गहाण ठेवून जास्त कर्ज उचलण्याचा आरोपींचा गोरखधंदा जवळपास २०१३ पासून सुरू आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून १० गुन्हे उघडकीस आले आहेत. आणखी काही साथीदार बाहेर असण्याची शक्यता कमी असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले.

कोकणातून लढवली शक्कल
कोकणातील स्थानिकांना भरजरी दागिने घालण्याची आवड आहे. मात्र, सोन्याचे दागिने विकत घेण्याची ऐपत नसते. त्यामुळे चांदीच्या तारेला सोन्याचा जाड थर देऊन त्याद्वारे दागिने बनवण्याची पद्धत कोकण रूढ आहे. याचा वापर बँका आणि पतपेढ्यांना फसवण्यासाठी होऊ शकतो, अशी कल्पना सर्वप्रथम सोनार रासबिहारी याला सुचली होती.

सोने गहाण ठेवून कर्ज देण्यापूर्वी सोन्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधित बँक अथवा पतपेढीची असते. आरोपींनी मुथ्थुट कंपनीमध्ये सोने गहाण ठेवून कर्ज घेतले, त्यावेळी मुथ्थुटच्या सर्व संबंधित शाखांनी सोन्याची गुणवत्ता तपासली होती. त्यामुळे प्रथमदर्शनी कर्मचाºयांवरही संशय निर्माण होतो. आवश्यकतेनुसार त्यांचीही चौकशी केली जाईल.
- डॉ. डी. एस. स्वामी
पोलीस उपायुक्त, झोन १, ठाणे
 

Web Title:  Fake gold mortgages, 'Muththut' was chosen, and arrested all four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.