Dump Bank Guarantee to Parking Policy | पार्किंग धोरणाला बँक गॅरंटीचा खोडा

ठाणे : मागील कित्येक वर्षे कागदावर असलेले पार्किंग धोरण आतापर्यंत अमलात येणे अपेक्षित होते. कारण, पार्किंगचे दर निश्चित झाले असून स्पॉट अंतिम झाल्यानंतर आखलेले पिवळे पट्टेही पुसले जाऊ लागले आहेत. अपुºया मनुष्यबळाचा मुद्दादेखील मार्गी लागला आहे. परंतु, ज्या ठेकेदाराला पार्किंगचे काम देण्याचे निश्चित झाले आहे, त्याने अद्याप बँक गॅरंटीच भरली नसल्याने आता हे धोरण आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
या धोरणानुसार शहरातील १७७ रस्त्यांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणी तब्बल नऊ हजार ८५५ वाहने पार्क होऊ शकणार आहेत. त्यानुसार, आता या पार्किंगचे दरही मागील वर्षीच महासभेत मंजूर झाले आहेत. तसेच पार्किंगचे स्पॉट अंतिम झाल्यावर बहुतेक ठिकाणी पालिकेने पिवळे पट्टेदेखील मारले आहेत. तसेच रात्रीच्या पार्किंगची संकल्पनादेखील पालिकेने पुढे आणली असून त्याची सुरुवात १ नोव्हेंबरपासून झाली आहे. परंतु, रात्रीच्या पार्किंगच्या ठिकाणी दिवसादेखील ती होताना दिसत आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार आता हे स्पॉट सर्व वेळेसाठीच आहेत. त्यामुळे रात्रीचे पार्किंग सुरू असले तरीदेखील त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही.
अशाप्रकारे पालिकेने पार्किंग धोरण तयार केल्यानंतर त्याला लागणाºया मनुष्यबळाचा मुद्दादेखील काही अंशी का होईना मार्गी लागला. परंतु, हे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे, त्याने अद्यापही बँक गॅरंटी भरली नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यात आता जीएसटी लागल्याने खर्चातही फरक पडणार आहे. तसेच दरही बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेदेखील संबंधित ठेकेदार बँक गॅरंटी भरत नसावा, असाही कयास लावला जात आहे. या सर्व प्रकारामुळे मागील कित्येक वर्षांपासून अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असलेले पार्किंग धोरण अद्यापही खºया अर्थाने मार्गी लागले नाही.