रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे प्रवासी तरुणीचा साखरपुडा झाला आनंदात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 08:29 PM2017-11-16T20:29:19+5:302017-11-16T20:30:44+5:30

मीरा रोड - साखरपुड्यासाठी बोरिवलीवरून भार्इंदरला उतरल्यानंतर नवरी मुलगी व तिचे मामा हे रिक्षात नवरी मुलीचे कपडे, रोख, दागिने व नव-या मुलास देण्यासाठीच्या भेटवस्तू आदी ठेवलेली बॅग काढण्यास विसरल्याने सर्व हवालदिल झाले होते

Due to the honesty of the autorickshaw driver, | रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे प्रवासी तरुणीचा साखरपुडा झाला आनंदात

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे प्रवासी तरुणीचा साखरपुडा झाला आनंदात

Next

मीरा रोड - साखरपुड्यासाठी बोरिवलीवरून भार्इंदरला उतरल्यानंतर नवरी मुलगी व तिचे मामा हे रिक्षात नवरी मुलीचे कपडे, रोख, दागिने व नव-या मुलास देण्यासाठीच्या भेटवस्तू आदी ठेवलेली बॅग काढण्यास विसरल्याने सर्व हवालदिल झाले होते. भार्इंदर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान प्रवासी बॅग विसरून गेल्याचे समजताच रिक्षा चालकाने बॅग परत आणून दिल्याने वधूसह नातलगांनी त्याचे आभार मानत साखरपुडा पार पाडला.

बोरिवलीच्या काजुपाडा भागात राहणा-या पूनम ठाकूर यांची मुलगी मेघना हिचा साखरपुडा आज गुरुवारी भार्इंदर पश्चिमेस उड्डणपुलाखालील एका हॉटेलमध्ये होता. मेघना ही मैत्रीण रिया व मामा मुकेश दवे यांच्यासह दुपारी काजुपाडा येथून रिक्षा पकडून भार्इंदर येथे आली. घाईगडबडीत रिक्षातून उतरताना मागे ठेवलेली बॅग काढण्यास विसरले. मेघना हिचे साखरपुड्यात घालण्यासाठीचे कपडे, सोन्याची चैन व अन्य दागिने, नव-या मुलाला देण्यासाठीच्या भेट वस्तू - मिठाई तसेच जेवण आदीसाठीच्या खर्चाकरिता म्हणून सुमारे २५ हजार रोख व मोबाईल बॅगेत होता. बॅग विसरल्याचे लक्षात येताच मेघना, तिची आई, भाऊ व अन्य नातलग साखरपुडा कसा होणार या चिंतेने हवालदिल झाले.

काहींनी भार्इंदर पोलीस ठाणे गाठले. पण रिक्षाचा नंबर वगैरे काहीच माहिती नव्हते. पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी बॅगेत असलेल्या मोबाईलवर फोन केला. परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने लागलीच मोबाईलच्या आधारे त्याचे लोकेशन शोधण्यास घेतले. अन्य पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी देखील रिक्षाचा शोध घेण्यास धापवळ सुरू केली.

मागे मोबाईल वाजत असल्याचे रिक्षाचालक अहमद सत्तार सय्यद (४६) रा. पाटील कंपाऊंड, काजुपाडा याला लक्षात आले. त्याने मागे पाहिले तर रिक्षात भार्इंदरला उतरलेले प्रवासी बॅग विसरून गेल्याचे समजले. त्याने रिक्षा वळवून मेघना हिला उड्डाणपुलाखालील ज्या हॉटेलजवळ सोडले होते तेथे आला व बॅग त्याने जशीच्या तशी परत केली. बॅग हरवल्याने सुमारे पाऊण तास मेघना व तिचे नातलग चिंतेत होते. पण बॅग परत घेऊन आलेल्या रिक्षाचालक अहमद याला पाहुन सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अहमद अगदी देवासारखा आमच्यासाठी धाऊन आला. नाही तर साखरपुडा कसा होणार या विवंचनेत आम्ही होतो, असे मेघनाची आई पूनम म्हणाल्या. पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी देखील अहमद याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे कौतुक करत आभार मानले.

Web Title: Due to the honesty of the autorickshaw driver,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.