डोंबिवली-  दिवसाढवळया घरफोडया आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला असताना सोने चांदिचे दागिने विक्रिचा धंदा करणा-या सुरेश आणि अमित जैन या पिता-पुत्राच्या धाडसामुळे ज्वेलर्सच्या दुकानात घुसून चाकुच्या धाकाने चोरी करण्याचा दोघा चोरटयांचा प्रयत्न फसला. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद झाली असली तरी अशाप्रकारे दिवसाढवळया वाढलेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांसह व्यापा-यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पश्चिमेकडील सम्राट चौक परिसरात राहणा-या सुरेश जैन यांचे नजीक असलेल्या ठाकुरवाडीकडे जाणा-या रोडलगत अमर सोसायटीमध्ये प्रगती ज्वेलर्स दुकान आहे. सोमवारी ते नेहमीप्रमाणे मुलगा अमितसह दुकानात असताना सायंकाळी चारच्या सुमारास 18 ते 20 वयोगटातील दोन तरूण दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. मला तीन ते चार ग्रॅमची सोन्याची चेन दाखवा असे यातील एकाने जैन यांना सांगितले. काही वेळाने सोन्याच्या चेन असलेला पुर्ण बॉक्स दाखवा असेही सांगण्यात आले. बॉक्स दाखविण्याच्या तयारीत असताना एकाने त्याने कमरेत खोचलेला चाकू काढला आणि त्याचा धाक दाखवित दुकानाचे शटर बंद करण्यास सांगितले. यावेळी अमित जैन हे पोलिसांना मोबाईलवरून फोन लावत असताना त्यालाही चाकूच्या धाकाने दमदाटी करण्यात आली. अमितकडे मोबाईलची मागणी करण्यात आली परंतू त्याने मोबाईल न देता खाली ठेवून दिला. दरम्यान दोघेही चोरटे जेव्हा चेन असलेला बॉक्स हिसकावण्याच्या प्रयत्नात असताना त्यावेळी अमितने त्यांना मारायला खुर्ची उचलली असता दोघांनी दुकानाबाहेर धुम ठोकली. जैन पिता-पुत्राने आरडाओरडा केल्यावर नागरिकांनी धाव घेतली यात दोघेही चोरटे त्यांच्यासोबत आणलेली मोटारसायकल तिथेच टाकून ठाकुरवाडीकडे जाणा-या रोडने पळुन गेले. याप्रकरणी जैन यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे. 

घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
दरम्यान ही घटना ज्वेलर्स दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यावरून चोरटयांचे छायाचित्र पोलिसांना मिळाले आहे. विष्णुनगर पोलिसांसह या घटनेचा कल्याण क्राईम ब्रँच देखील समांतर तपास करीत असून त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत माहीती घेतली. घटनास्थळी पोलिसांना चोरटयांनी गुन्हयात वापरलेली मोटारसायकल आढळुन आली आहे. ती ताब्यात घेण्यात आली आहे. त्या गाडीवर मागे-पुढे कुठेही नंबर नाहीये.