डॉ. वरदा गोडबोले यांच्या गायनावर टाकला पडदा, आयोजकांचा उद्धटपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 04:27 AM2017-11-05T04:27:13+5:302017-11-05T04:27:25+5:30

पं. राम मराठे महोत्सवाच्या रंगमंचावर तब्बल १६ वर्षांनी गायला आलेल्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. वरदा गोडबोले यांना कार्यक्रम अर्ध्यावरच आवरता घ्यायला आयोजकांनी शनिवारी भाग पाडल्याने रसिकांचा रसभंग झाला, तर डॉ. गोडबोले यांना धक्का बसला.

Dr. Varadha Godbole's rendition of the screen, and the arrogance of organizers | डॉ. वरदा गोडबोले यांच्या गायनावर टाकला पडदा, आयोजकांचा उद्धटपणा

डॉ. वरदा गोडबोले यांच्या गायनावर टाकला पडदा, आयोजकांचा उद्धटपणा

Next

ठाणे : पं. राम मराठे महोत्सवाच्या रंगमंचावर तब्बल १६ वर्षांनी गायला आलेल्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. वरदा गोडबोले यांना कार्यक्रम अर्ध्यावरच आवरता घ्यायला आयोजकांनी शनिवारी भाग पाडल्याने रसिकांचा रसभंग झाला, तर डॉ. गोडबोले यांना धक्का बसला. या कार्यक्रमानंतर होणा-या ‘मत्स्यगंधा’ नाटकाच्या प्रयोगाकरिता नाट्यगृह मोकळे करून देण्याच्या घिसाडघाईमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
डॉ. गोडबोले यांनी एक राग आळवल्यानंतर दुसरा राग सादर करण्यापूर्वी अ.भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेच्या एका महिला पदाधिकाºयाने कार्यक्रम संपल्याची घोषणा केली आणि ठाणे महापालिकेच्या कर्मचाºयाने लागलीच पडदा टाकल्यामुळे डॉ. गोडबोले यांना नाइलाजाने कार्यक्रम अर्ध्यातच सोडावा लागला. उपस्थित रसिकांनी आयोजकांकडे तीव्र संताप व्यक्त करताना ठाण्यातील कलाकार हे कलाकार नाहीत का? बाहेरून आलेल्या कलाकारांबाबतीत हे असे वर्तन करण्याचे धारिष्ट्य आयोजकांनी दाखवले असते का, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
ठाणे महापालिका व अ.भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतन येथे मंगळवार, ३१ आॅक्टोबर ते शनिवार, ४ नोव्हेंबर या वेळेत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी १० वा. शेवटच्या दिवशीच्या पहिल्या सत्रास सुरुवात होणार होती. यात सकाळी पल्लवी नाईक यांचे भरतनाट्यम्, शास्त्रीय गायिका दीपिका भिडे यांचे व त्यानंतर शास्त्रीय गायिका डॉ. वरदा गोडबोले यांचे गायन, असे या पहिल्या सत्राचे स्वरूप होते. मुळात सकाळी १० वाजता सुरू होणारा भरतनाट्यम्चा कार्यक्रम सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास सुरू करण्यात आला आणि त्यानंतर दोन्ही शास्त्रीय गायिकांच्या कार्यक्रमास उशिराने सुरुवात झाली. सर्व कलाकार वेळेच्या अगोदर उपस्थित होते. नाईक यांचे भरतनाट्यम् आणि दीपिका भिडे यांचे गायन झाल्यानंतर डॉ. गोडबोले यांचा कार्यक्रम सुरू होण्यास दुपारचे १.१५ वाजले. त्यांनी ‘वृंदावनी सारंग’ या रागाने कार्यक्रमाची सुरुवात केली. हा राग आळवल्यानंतर दुसरा राग त्या सादर करणार तेवढ्यात नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या एका महिला पदाधिकाºयाने रंगमंचावर येऊन डॉ. गोडबोले यांना कोणतीही कल्पना न देता ‘हे सत्र इथेच संपत आहे, पुन्हा भेटू’ अशी घोषणा केली व लागलीच कर्मचाºयाने व्यासपीठावरील पडदा पाडला. अचानक झालेल्या या प्रकाराने डॉ. गोडबोले आणि त्यांचे सहकारी कलाकार यांचा एकच गोंधळ उडाला. नेमके काय चालले आहे, असे भाव त्यांच्या चेहºयावर उमटले. रसभंग झालेल्या रसिकांमध्येही अचानक पडदा पडल्याने गोंधळ व संतापाचे वातावरण निर्माण झाले. कलाकार रंगमंचावर असताना अशी घोषणा होणे म्हणजे कलाकारांचा अपमानच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांमधून उमटली. कार्यक्रम गुंडाळणे भागच असेल, तर निदान त्या कलाकाराला त्याची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. कलाकाराला गृहीत धरून केले गेलेले हे वर्तन निषेधार्ह व अवमानकारक असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केली. कलाकार दुसरा राग सादर करण्याकरिता वाद्यांची तयारी करत आहेत. गायक क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा रसिकांचे कान तृप्त करण्याकरिता सिद्ध होत असताना घडलेल्या या प्रकाराबद्दल रसिकांनी रंगमंचावर जाऊन डॉ. गोडबोले यांची भेट घेऊन नापसंती व्यक्त केली. कार्यक्रम सकाळी पाऊण तास उशिरा सुरू केला, ही कलाकारांची चूक नाही. त्याची शिक्षा एखाद्या गायिकेला अशी देणे सर्वस्वी गैर असल्याचे काही रसिकांनी नाट्य परिषदेच्या पदाधिकाºयांना आणि महापालिकेच्या अधिकाºयांनाही सुनावले.
याबाबत पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त होतो. तेथे काय घडले, याची सविस्तर माहिती घेऊन बोलतो. तर, याबाबत नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या पदाधिकाºयांना विचारले असता काहींनी आपण हे घडले तेव्हा हजर नव्हतो, असे सांगितले तर काहींनी असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा केला. ज्या मत्स्यगंधा नाटकाकरिता डॉ. गोडबोले यांना कार्यक्रम आवरता घेण्यास भाग पाडले, त्या नाटकातील एका नाट्यगीताच्या पंक्ती ‘ध्यास एक हृदयी धरूनी स्वप्न रंगवावे, वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे’, अशा आहेत. डॉ. गोडबोले यांना तोच अनुभव आला, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

रसिकांच्या उपस्थितीत रंगमंचावर कलाकार आपली कला सादर करत असताना त्याला किमान विश्वासात घेऊन कार्यक्र म संपला आहे वा तो संपवायचा आहे, असे जाहीर केले जावे, अशी कलाकाराची माफक अपेक्षा असते. मात्र, या घटनेत रंगमंचावर उपस्थित कलाकाराची दखल न घेता कार्यक्र म संपला, असे एका वाक्यात जाहीर करून पडदा पडतो. यावर काय बोलावे?
- डॉ. वरदा गोडबोले

Web Title: Dr. Varadha Godbole's rendition of the screen, and the arrogance of organizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे