ठाण्यात यंदा दुप्पट पाऊस, ५० वृक्षांचाही बळी :  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 04:23 AM2018-07-12T04:23:28+5:302018-07-12T04:23:39+5:30

सलग चार दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर बुधवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. परंतु, मागील १५ दिवसांत त्याने दमदार हजेरी लावून दोन महिन्यांचा कोटा आधीच भरून काढला आहे.

double rain in Thane | ठाण्यात यंदा दुप्पट पाऊस, ५० वृक्षांचाही बळी :  

ठाण्यात यंदा दुप्पट पाऊस, ५० वृक्षांचाही बळी :  

Next

ठाणे - सलग चार दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर बुधवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. परंतु, मागील १५ दिवसांत त्याने दमदार हजेरी लावून दोन महिन्यांचा कोटा आधीच भरून काढला आहे. मागील वर्षी जुलैअखेरपर्यंत १३८९ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र १० जुलैलाच २१५०.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील १० दिवसांत पावसाच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन विभागाला ३२५ तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये पाणी तुंबण्याच्या ६९ तक्रारींचा समावेश आहे. ४९ वृक्ष उन्मळून पडले असून आगीच्या १९ तक्रारी प्राप्त झाल्या.
ठाण्यात मागील दोन वर्षांत प्रथमच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील चार दिवस तर पावसाने शहरात धुवाधार बॅटिंग करून सर्वांची त्रेधातिरपीट उडवली. ठाण्यात २०१६ या वर्षात जून ते आॅक्टोबर या कालावधीत ३३९०.५० मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, २०१७ मध्ये शहरात याच कालावधीत ३६४० मिमी पावसाची नोंद झाली होती. परंतु, यंदा मात्र त्याने दमदार हजेरी लावून सर्वांनाच सुखद धक्का दिला. यंदा जून महिन्यात शहरात १०९९.८० मिमी पाऊस पडला. जुलै १० पर्यंत तो २१५०.६० मिमी एवढा झाला आहे. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत एकूण पडलेल्या पावसाचा विचार करता आताच पावसाने मागील १५ दिवसांत अर्ध्याहून अधिक कोटा पूर्ण केला आहे. तर, २०१६ मध्ये जुलै महिन्यात १३८९.५० मिमी पाऊस झाला होता. २०१७ मध्ये याच कालावधीत १०६४ मिमी पावसाची नोंद झाली होती. परंतु, यंदा मात्र याच कालावधीत २१५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत शहरात दुप्पट पाऊस पडला. मागील चार दिवसांची नोंद पाहता ७ जुलै रोजी १४०.०३ मिमी, ८ तारखेला १८२.३७ मिमी, ९ जुलै रोजी १८६.२० मिमी आणि १० जुलै रोजी १५१.२७ मिमी पाऊस ठाण्यात बरसला आहे. या चार दिवसांच्या पावसानेसुद्धा मागील दोन वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक केले.
दरम्यान, यंदा पावसाळ्याच्या काळात पाणी तुंबण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या असून आपत्ती व्यवस्थापन विभागाला १ ते १० जुलै या कालावधीत ६९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच कालावधीत ४९ वृक्ष उन्मळून पडले. १९ ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्या. १९ आगीच्या घटना, २५ तक्रारी या वृक्ष धोकादायक स्थितीत असल्याच्या आल्या आहेत. १३ ठिकाणी संरक्षक भिंती, तर चार ठिकाणी नाल्याच्या भिंती पडून नुकसान झाले आहे. दोन ठिकाणी घरे पडल्याची घटना घडली आहे. या तक्रारींसह इतर मिळून १ ते १० जुलै या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन विभागाला तब्बल ३२५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

अंबरनाथ : गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बारवी धरण ५८ टक्के भरले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या धरणात पाच टक्के कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी १२ जुलै रोजी बारवी धरण ६२ टक्के भरले होते. दि. १० जुलै रोजी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८४ मिमी एवढा पाऊस झाला. पावसाने उशिरा हजेरी लावल्याने बारवी धरण अपेक्षेपेक्षा कमी भरले आहे. गेल्या सात दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ४२ टक्क्यांवरून ५८ टक्के इतका वाढला आहे. पाणीसाठ्यात अवघ्या एका आठवड्यात तब्बल १६ टक्के वाढ झाली. गतवर्षी १२ जुलैपर्यंत बारवी धरण क्षेत्रात ९७२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत एक हजार २७ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी धरणाची पातळी ६३.३२ मीटर होती. यंदा ती ६२.५९ मीटर आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आॅगस्टमध्येच धरण भरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Web Title: double rain in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.