Dombivli pollution has decreased | शुद्ध हवा येऊ द्या; हिरवा पाऊस पडलेल्या डोंबिवलीतील प्रदूषण घटले होss!
शुद्ध हवा येऊ द्या; हिरवा पाऊस पडलेल्या डोंबिवलीतील प्रदूषण घटले होss!

- मुरलीधर भवार 
डोंबिवली : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या अहवालात राज्यातील प्रदूषणकारी शहरात दुस-या क्रमांकावर असलेल्या डोंबिवलीतील प्रदूषण घटत असल्याची माहिती पुढे आली आहे. सीएनजी वाहनांची वाढलेली संख्या, हरीत लवादाने रासायनिक कारखान्यांवर आलेले निर्बंध यासारख्या प्रयत्नांचा हा परिणाम असल्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.
२००९ साली प्रदूषणाचा इंडेक्स ७८.४१ टक्के होता. तो २०१६ साली ५० टक्यांवर आला आहे. सध्याचा आकडा समाधानकारक नसला, तरी तो आणखी घटावा, यासाठी विविध यंत्रणा प्रयत्न करत आहेत. कॉन्प्रिहेन्सिव्ह इन्व्हायर्नमेंट पोल्यूशन इंकेक्स (सीईपीई) २००९ साली ७८.४१ टक्के इतका होता. २०१३ ला त्यात वाढ झाली. प्रदूषण वाढल्याने तो ८९.९० टक्के झाला. २०१६ साली मात्र तो ५० टक्क्यांवर आल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी दिली.
२००९ साली डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न बराच गाजला. डोंबिवली प्रदूषणाच्या फास्ट ट्रॅकवर होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, डोंबिवलीतील प्रदूषणाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. पुन्हा २०१० सालीही प्रदूषित शहरांच्या यादीतील डोंबिवलीचा क्रमांक कायम होता. औद्योगिक कारखान्यातून सोडण्यात येणाºया रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात नसल्याने प्रदूषणाचा प्रश्न तीव्र बनला. रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या अपग्रेडेशनवर आतापर्यंत जवळपास पाच कोटी खर्च करण्यात आले. टेक्सटाईल इंडस्ट्रिजच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या अपग्रेडेशनवर हा खर्च करण्यात आला. डोंबिवली फेज दोनमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्यात आले होते. या प्रक्रिया केंद्रात यापूर्वी बायो टॉवरच्या माध्यमातून रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात होती. तेथे २५ टक्के सांडपाण्यावर प्रक्रियेस मुभा दिली गेली. तेथे बायो रिअ‍ॅक्टरचा वापर करुन सांडपाणी प्रक्रिया सुरू झाली. रासायनिक सांडपाणी वाहून नेणाºया वाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्या होत्या. त्यांची दुरुस्ती करण्यात आली. फुटलेले चेंबर व्यवस्थित केले. काही कारखान्यांनी स्वत:च्या सांडपाण्यावर प्रक्रियेची यंत्रणा उभारली. प्रदूषण नियंत्रण मंडळाची गस्त वाढली. तक्रारीची दखल घेऊन त्याच्या निवारणासाठी घटनास्थळी धाव घेतली जाऊ लागली. त्याचबरोबर पिंपळेश्वर येथे प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने आधारवाडी, बारावे आणि चिंचपाडा येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारली. त्यामुळेही प्रदूषणाची मात्रा कमी होण्यास मदत झाली असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला.
>सीएनजीचा परिणाम
२००९ साली कल्याण-भिवंडी रोडवर कोन गावाजवळ आणि शीळ येथे सीएनजी पंप होता. त्यातही आता वाढ झाली आहे.
शीळ रोड, मानपाडा पोलीस स्टेशनजवळ, अंबरनाथ पश्चिमेला पोलीस स्टेशनजवळ, विम्को नाका, फॉरेस्टनाका, उल्हासनगरात कॅम्प नंबर चार येथे सीएनजी पंप सुरु झाले आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा १०० टक्के सीएनजीवर परावर्तीत झाल्याने वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.
>अमृत योजनेंतर्गत निधी : कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाठपुरावा सुरु आहे. सरकारने त्याची दखल घेत अमृत योजनेअंतर्गत मलनिस्सारण प्रक्रियेसाठी विविध महापालिकांना निधी मंजूर केला आहे. त्याद्वारे महापालिका सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारणार आहेत.


Web Title: Dombivli pollution has decreased
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.