डोंबिवली घुसमटतेय! , वायूप्रदूषण धोकादायक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 06:55 AM2018-01-31T06:55:07+5:302018-01-31T06:55:23+5:30

हवेच्या प्रदूषणामुळे दर क्षणाला डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरत असून राज्यातील प्रदूषित शहरातील दुसरा क्रमांक या शहराने कायम ठेवल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘ग्रीनपीस’च्या ताज्या अहवालातून समोर आला आहे.

 Dombivali enters! , Air pollution dangerous | डोंबिवली घुसमटतेय! , वायूप्रदूषण धोकादायक  

डोंबिवली घुसमटतेय! , वायूप्रदूषण धोकादायक  

Next

ठाणे : हवेच्या प्रदूषणामुळे दर क्षणाला डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरत असून राज्यातील प्रदूषित शहरातील दुसरा क्रमांक या शहराने कायम ठेवल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘ग्रीनपीस’च्या ताज्या अहवालातून समोर आला आहे.
डोंबिवलीपाठोपाठ अंबरनाथ, बदलापूर, ठाणे आणि कल्याण या शहरांनी प्रदूषणकारी शहरांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
आतापासूनच हे वायूप्रदूषण रोखण्याचे प्रयत्न जाले नाहीत, तर या शहरांचीही दिल्ली होण्यास वेळ लागणार नाही, एवढे येथील पर्यावरण दूषित असेल, असा इशाराही या अहवालाने दिला आहे.
महाराष्ट्रातील ६७ लाख मुलांना प्रदूषित हवेचा फटका बसत असल्याचा निष्कर्ष या अहवालाने मांडला आहे. त्यातील १७ लाख मुले तर अशा भागात राहतात, जेथे प्रदूषणाची पातळी धोक्याच्या दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. देशात साडेचार कोटी मुलांना दरवर्षी अशा वायुमुळे जीवघेणे आजार जडत असल्याचे समोर आले आहे. पाच वर्षांखालील मुलांना या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसतो. त्यातून श्वसनाचे आजार जडतात. त्यांच्या शारीरिक, मानसिक वाढीवर त्याचा परिणाम होतो.
डोंबिवलीतील कारखानदारीमुळे या शहराच्या वायू-जलप्रदूषणात भर पडते. त्यासोबतच अरूंद रस्ते, वाहतूक वळवण्यात होणारे राजकारण, त्यातून सतत ठिकठिकाणी होणारी कोंडी, वृक्षांची घटती संख्या, सर्वत्र सुरू असलेली बांधकामे, शहरात ठिकठिकाणी ओसंडून वाहणारा कचरा, तो जाळून नष्ट करण्याचे प्रकार यामुळे डोंबिवलीतील प्रदूषणाचा धोका वाढतो आहे.
बदलापूर शहर हे आतापर्यंत राहण्यास योग्य मानले जात होते. मात्र सर्रास सुरू असलेली बांधकामे, खोदकाम, वाहनांची वाढलेली संख्या यामुले त्या शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे.
अंबरनाथ पूर्वीपासूनच औद्योगिकरणामुळे वायू प्रदूषणाच्या छायेत होते. शहरातील शहराच्या पश्चिम भागातील मोठे कारखाने बंद पडले किंवा कमी झालेले असले तरी औद्योगिक वसाहतीमुळे या शहराचे आरोग्य सतत बिघडते आहे.
उल्हासनगर, भिवंडीत दाट लोकवस्ती, वाहतुकीची कोंडी आणि भरवस्तीतील कारखानदारी ही प्रदूषणाची ठळक कारणे समोर आली आहेत. ठाणे आणि कल्याणमध्येही वाढत्या वाहनांची कोंडी, रस्त्यातील धूळ आणि वाढती बांधकामे हवेची गुणवत्ता खराब करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हवा खराब होण्याची वेगवेगळी कारणे

वाहनांची बेसुमार वाढणारी संख्या, त्या तुलनेने वाहतुकीचे आणि रस्त्यांचे न झालेले नियोजन हे याचे प्रमुख कारण आहे. त्यातून प्रदूषणकारी वायू वाढतात. हवेतील कार्बनचे प्रमाण वाढते. वाहनांचे प्रदूषण मोजणारी आणि त्यावर कारवाई करणारी तुटपुंजी यंत्रणा हे त्याचे आणखी एक कारण. पेट्रोल, डिझेलवरील वाहनांचे प्रमाण कमी करून सीएनजीवरील वाहनांचे प्रमाण कमी करण्यासाठी मोहीम आखण्याची गरज. कल्याण-डोंबिवलीत सीएनजीचे पंप वाढले, त्यावर आधारित रिक्षांची संख्या वाढली, पण भाडे कमी- प्रसंगी निम्मे करावे लागेल म्हणून या रिक्षांचा तपशील जाहीर केला जात नाही.

डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, तळोजा येथे कारखान्यांतून जसे पाण्याचे प्रदूषण होते तसेच हवेचे प्रदूषणही वाढते. त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. त्यासाठीची मानके पाळावी म्हणून कठोर निर्बंध आणले जात नाहीत. सतत सुरू असलेली बांधकामे, तोडफोड, मातीचे ढिगारे उपसून होणारे अतिक्रमण यातूनही हवेची गुणवत्ता बिघडते. रस्ते डांबरी असोत की काँक्रिटचे त्यावरील धुळीचे प्रमाण भरपूर आहे. माती, दगड, कचरा यासारख्या वस्तुंची वाहतूक वाहनावर आच्छादन नसतानाच केली जाते. त्यातूनही ते साहित्य सर्वत्र सांडते.

दगड खाणी, कचरा जाळणे, स्वयंपाकासाठी जळणाचा वापर, कचºयाचे योग्य विघटन न केल्याने त्यातून बाहेर पडणारे वायू, प्लास्टिकचा कचरा जाळणे यातूनही हे प्रदूषण वाढत जाते. इलेक्ट्रिक वाहने मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे त्यांना सार्वजनिक वाहने म्हणून परवानगी देण्यास विरोध. त्यामुळे प्रदूषणात वाढ. बेसुमार वृक्षतोडीमुळेही कार्बनडायआॅक्साईडचे प्रमाण संतुलित राहण्यास अडथळा. तसेच आॅक्सिजननिर्मितीवरही त्याचा परिणाम.

फक्त मोजणी, उपाय शून्य!
डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, ठाणे या शहरातील वायू प्रदूषण आठवड्यातून दोनवेळा फक्त एका ठिकाणी मोजले जाते. मात्र ती ठिकाणे वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. औद्योगिक वसाहती गृहीत धरून पूर्वी ही ठिकाणे ठरवण्यात आली होती. मात्र वाहतूक कोंडीची- सार्वजनिक वर्दळीची ठिकाणेही त्यात समाविष्ट केली, तर या शहरांचा वाढता धोका स्पष्ट होऊ शकतो. प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका यांच्याकडून ही मोजणी केली जाते. त्याचे निष्कर्ष येतात. ते जाहीर केले जातात. पण त्यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने प्रदूषण कमी होत नसल्याचे दिसून आले आहे.

Web Title:  Dombivali enters! , Air pollution dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.