गावदेवी मैदानावर पार्किंग प्लाझा नको!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:44 AM2019-04-20T05:44:24+5:302019-04-20T05:44:33+5:30

ठाणे येथील गावदेवी मैदानात पार्किंग प्लाझा बनविण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

Do not want parking plaza at village! | गावदेवी मैदानावर पार्किंग प्लाझा नको!

गावदेवी मैदानावर पार्किंग प्लाझा नको!

Next

मुंबई : ठाणे येथील गावदेवी मैदानात पार्किंग प्लाझा बनविण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देत उच्च न्यायालयाने या पार्किंग प्लाझाचे काम थांबविण्याचे अंतरिम आदेश देण्यास गुरुवारी नकार दिला.
ठाण्यात रेल्वे स्टेशनजवळ वाहने पार्क करण्यास जागा नसल्याने स्टेशनपासून ६०० मीटर अंतरावर असलेल्या गावदेवी मैदानात पार्किंग प्लाझा उभारण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला. या निर्णयाला विरोध करीत सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायाने डॉक्टर असलेले महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे होती.
याचिकेनुसार, ठाण्यातील नौपाडा परिसरात केवळ एकच मोकळी जागा आहे ती म्हणजे गावदेवी मैदान. ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात हे मैदान मनोरंजन पार्क, खेळाचे मैदान म्हणून राखीव आहे.
या मैदानावर आधीच महापालिकेने अतिक्रमण केले आहे. या मैदानात पाण्याची टाकी, सार्वजनिक शौचालय आणि ठाणे महापालिकेच्या अभियंत्यांची कार्यालये आहेत. या बांधकामामुळे ३० टक्के मैदानाचा आकार कमी झाला आहे. आता या मैदानावर पार्किंग प्लाझा उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. अंडरग्राउंड पार्किंगची सुविधा सुरू करण्यात येणार असली तरी त्याचे रॅम्प मैदानावर बांधण्यात येणार. नैसर्गिक मैदानाचे रूपांतर अनैसर्गिक मैदानात करण्यात येणार आहे. मात्र, अनैसर्गिक मैदान खेळायला येणाऱ्या मुलांसाठी हानिकारक आहे, असे बेडेकर यांनी याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, बेडेकर यांच्या वकिलांनी ही याचिका प्रलंबित असेपर्यंत पार्किंग प्लाझाच्या बांधकामाला स्थगिती द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. तर ठाणे महापालिकेला या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.
>गर्दीत भर पडेल
नौपाडा भागातील एकुलते एक मैदान वाचले आहे. परंतु, पार्किंगसाठी त्याचा बळी जाईल. त्याशिवाय पार्किंगसाठी मैदानावरील झाडांचीही कत्तल होईल. हे मैदान नष्ट झाले तर मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा मिळणार नाही. गावदेवी मैदानाच्या आजूबाजूला मार्केट असल्याने या भागात खूप गर्दी आहे. आता पार्किंगची सुविधा उपलब्ध केली तर या गर्दीत आणखी भर पडेल. त्यामुळे हे मैदान वाचवावे. महापालिकेला गावदेवी मैदानाऐवजी अन्य ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी बेडेकर यांनी याचिकेद्वारे केली आहे.

Web Title: Do not want parking plaza at village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.